पुलवामा हल्ल्याला एक वर्ष: शहीद सैनिकांच्या स्मरणार्थ बांधलेल्या स्मारकाचे आज होणार उद्घाटन

पुलवामा हल्ल्याला एक वर्ष: शहीद सैनिकांच्या स्मरणार्थ बांधलेल्या स्मारकाचे आज होणार उद्घाटन

सीआरपीएफचे अतिरिक्त महासंचालक जुल्फिकार हसन यांनी गुरुवारी स्मारकाच्या ठिकाणी भेट दिल्यानंतर सांगितले की, यातून हल्ल्यात प्राण गमावलेल्या शूर सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे.

  • Share this:

श्रीनगर, 14 फेब्रुवारी : जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथे 14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या हल्ल्यामुळे संपूर्ण देश हादरला होता. या घटनेला आज एकवर्ष पूर्ण झाले. वर्षभरापूर्वीच्या या दिवसाचा इतिहास जम्मू-काश्मीरमधील एक अतिशय दुःखद घटना म्हणून नोंदविला गेला आहे. गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात पुलवामा दहशतवादी हल्ल्यात (Pulwama Terror Attack)शहीद झालेल्या सीआरपीएफच्या 40 जवानांच्या स्मृतीस्थानी बांधलेल्या स्मारकाचे शुक्रवारी लेथपुरा कॅम्पमध्ये उद्घाटन होणार आहे.

सीआरपीएफचे अतिरिक्त महासंचालक जुल्फिकार हसन यांनी गुरुवारी स्मारकाच्या ठिकाणी भेट दिल्यानंतर सांगितले की, यातून हल्ल्यात प्राण गमावलेल्या शूर सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. स्मारकामध्ये शहीद जवानांच्या नावासोबत त्यांचे फोटोही लावण्यात येतील. तसेच, केंद्रीय राखीव पोलीस दलाचे  (Central Reserve Police Force) ध्येय वाक्य "सेवा आणि निष्ठा" असेल.

'या दुर्दैवी घटनेतून आम्ही शिकलो'

"निश्चितच ही दुर्दैवी घटना होती आणि आम्ही यातून शिकलो आहोत. आम्ही आमच्या चळवळीच्या वेळी नेहमी जागरूक होतो, पण आता दक्षता वाढली आहे," असं हसन म्हणाले. ते म्हणाले की, '40 सैनिकांच्या बलिदानामुळे देशातील शत्रूंचा खात्मा करण्याचा आपला संकल्प दृढ झाला आहे. दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीच्या वेळी आम्ही अतिरिक्त जोमाने लढा देत आहोत आणि म्हणूनच आमच्या जवानांवर हल्ला झाल्यानंतर जैश-ए-मोहम्मदच्या सेनापतींना संपविण्यात आम्ही यशस्वी झालो.'

हल्ल्यानंतर सैनिकांच्या हालचालीदरम्यान घेतल्या जाणाऱ्या खबरदारीबाबत विचारलं असता सुरक्षेचा भाग म्हणून त्याबद्दल माहिती देण्यास हसन यांनी स्पष्ट नकार दिला. परंतु अधिकाऱ्यांनी सांगितले की सैनिकांची हालचाल आता इतर सुरक्षा दलांसह आणि सैन्याच्या समन्वयाने होत असते. कोणत्याही हल्ल्यापासून वाचण्यासाठी गृहमंत्रालयाने सीआरपीएफला आपल्या सैनिकांना हवाई मार्गावरून नेण्याची परवाणगी दिली होती.

जम्मू-काश्मीर सरकारने जवानांच्या हालचाली सुलभ करण्यासाठी आठवड्यातून दोन दिवस खासगी वाहनांच्या वाहतुकीवर बंदी घातली होती. परंतु परिस्थिती पूर्वस्थितीवर आल्यानंतर नंतर हा आदेश रद्द करण्यात आला.

बुलेट प्रूफ तयार करण्याची प्रक्रिया वेगवान

सैनिकांना घेऊन जाणारी वाहने बुलेट प्रूफ करण्याची प्रक्रिया वेगवान झाली. त्यामुळे रस्त्यावर बंकरसारखी वाहने दिसली. जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद डार यांनी स्फोटकांनी भरलेल्या कारमध्ये सुरक्षा दलाच्या ताफ्याशी धडक दिली. त्या जागेजवळ सीआरपीएफ छावणीच्या आत हे स्मारक तयार केले गेले आहे. या हल्ल्यात 40 जवान शहीद झाले होते. या हल्ल्यातील जवळपास सर्व कट रचणारे ठार झाले असून गेल्या महिन्यात जैश-ए-मोहम्मदचा स्वयंभू प्रमुख कारी यासिर याला ठार मारण्यात यश आले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 14, 2020 07:00 AM IST

ताज्या बातम्या