अॅडिलेड, 15 जानेवारी : दुसऱ्या एकदिवसीय मालिकेत भारताने ऑस्ट्रेलियावर सहा गडी राखून विजय मिळवला. या विजयामुळे भारत आणि ऑस्ट्रेलिया तीन सामन्यांच्या या मालिकेत १-१ अशा बरोबरीत आहेत. भारतासाठी कर्णधार विराट कोहलीने १०४ धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळत भारताचा डाव सावरला. त्याला महेंद्रसिंग धोनीचीही उत्तम साथ मिळाली. विराट बाद झाल्यानंतर धोनीने फलंदाजीची कमान आपल्या हातात घेतली. यावेळी महेंद्र सिंग धोनीने ५४ चेंडूत २ षटकारांच्या मदतीने नाबाद ५५ धावा केल्या. ऑस्ट्रेलियासाठी जेसन बेहरेनडोर्फ, ग्लेन मॅक्सवेल, जे रिचर्डसन आणि मार्कस स्टोइनिस यांनी प्रत्येकी एक गडी बाद केले.
जेसन बेहरेनडोर्फने शिखर धवनला उस्मान ख्वाजाकरवी झेल बाद करत भारताला पहिला धक्का दिला. शिखरने २८ चेंडूत चार चौकार लगावत ३२ धावा केल्या. मार्कस स्टोइनिसने रोहित शर्माला बाद केले. रोहित षटकार लगावण्याच्या नादात बाद झाला. त्याने ५२ चेंडूत दोन चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ४३ धावा केल्या. अंबाती रायडुच्या स्वरुपात भारताची तिसरी विकेट ग्लेन मॅक्सवेलने घेतली. रायडूने ३६ चेंडूत दोन चौकार लगावत २४ धावा करुन बाद झाला.
भुवनेश्वर कुमारने आपल्या नवव्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर ग्लेन मॅक्सवेलला आणि पाचव्या चेंडूनर शॉर्न मार्शला बाद करत भारताला मोठा दिलासा दिला. मॅक्सवेल ४८ धावांवर असताना दिनेश कार्तिकने त्याला डीप लाँग ऑफवर झेलबाद केले. शॉर्न मार्शने १२३ चेंडूत १३१ धावांची खेळी खेळली. मात्र भुवनेश्वर कुमारने त्याला रवींद्र जडेजाकरवी झेल बाद केले. हे त्याच्या करिअरमधील सातवे शतक आहे. मार्शने भारताविरुद्ध दुसऱ्यांदा शतकी खेळी खेळली. याआधी मार्शने २००९ मध्ये हैदराबादमध्ये ११२ धावां केल्या होत्या.
भुवनेश्वर आणि मोहम्मद शमीच्या जोडीने ऑस्ट्रेलियाची सलामीची जोडी फोडली. भुवनेश्वरने चौथ्या षटकात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार एरॉन फिंचला त्रिफळाचीत केले. एरॉन फक्त सहा धावा करुन तंबूत परतला. तर नंतरच्या षटकात मोहम्मद शमीने एलेक्स कॅरीला शिखर धवनकरवी झेल बाद केले. एलेक्सने २७ चेंडूत १८ धावा केल्या. त्यानंतर रवींद्र जडेजाने उस्मान ख्वाजाला रन आऊट केले तर जडेजाच्या गोलंदाजीवर धोनीने हँड्सकॉम्बला (२२) त्रिफळाचीत केले. तर शमीच्या गोलंदाजीवर धोनीने मार्कस स्टोइनिसला झेल बाद केले.
भारतासाठी भुवनेश्वर कुमारने १० षटकांत ४५ धावा देत चार गडी बाद केले. तर मोहम्मद शमीने १० षटकांत ५८ धावा देत तीन गडी बाद करण्यात यश मिळवलं. रवींद्र जडेजाने एक गडी बाद केला. त्याने १० षटकांत एक मेडन ओव्हर देत ४९ धावा दिल्या.
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार एरॉन फिंचने नाणेफेक जिंक प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मोहम्मद सिराज भारताकडून पदार्पण करत आहे. या सामन्यात भारतासाठी करा किंवा मरा अशी परिस्थिती आहे. हा सामना भारताने हरला तर मालिकाही हातातून जाईल. तसेच भारताने हा सामना जिंकला तर तीन सामन्यांच्या या मालिकेत भारत ऑस्ट्रेलिया १-१ अशा बरोबरीत राहतील आणि शेवटचा सामना निर्णायक होईल. चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताने २-१ ने ऑस्ट्रेलियाला हरवत ऐतिहासिक विजय मिळवला होता. एकदिवसीय सामन्यातही ‘विराट सेने’ला त्याच कामगिरीची पुनरावृत्ती करावी लागणार आहे.
आतापर्यंत दोन्ही संघांनी एकमेकांविरुद्ध ४९ एकदिवसीय सामने खेळले आहेत. यातील फक्त ११ सामन्यात भारताला यश मिळालं असून ३६ सामने ऑस्ट्रेलियाने जिंकले आहेत. एडिलेट मैदानावर आतापर्यंत दोन्ही संघ पाचवेळा आमने सामने आले आहेत. त्यातील चार सामन्यात ऑस्ट्रेलिया जिंकली आहे तर भारताला फक्त एकदाच सामना जिंकता आला आहे.
भारतीय संघ: विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, अंबाती रायडू, दिनेश कार्तिक, महेंद्र सिंह धोनी, कुलदीप यादव, रविंद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.
ऑस्ट्रेलियाचा संघ: एरॉन फिंच (कर्णधार), एलेक्स कॅरी, उस्मान ख्वाजा, शॉन मार्श, पीटर हँड्सकोम्ब, मार्कस स्टोइनिस, ग्लेन मॅक्सवेल, नाथन लायन, पीटर सिडल, जे रिचर्डसन आणि जेसन बेहरेनडोर्फ.
VIDEO : एका चेंडूत हव्या होत्या 6 धावा, तरीही 1 चेंडू राखून जिंकला सामना