India vs Australia 2nd Test, Day 2: भारताकडून चोख उत्तर, १७२/ ३ कोहली शतकाच्या जवळ

India vs Australia 2nd Test, Day 2: भारताकडून चोख उत्तर, १७२/ ३ कोहली शतकाच्या जवळ

कोहली सध्या ८२ धावांवर खेळत आहे तर रहाणेही ५१ धावांवर नाबाद आहे.

  • Share this:

पर्थ. १५ डिसेंबर २०१८- दुसऱ्या दिवसाचा खेळ संपताना भारताने तीन गडी गमावत १७२ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावातील स्कोअरपासून १५४ धावांनी पिछाडीवर आहेत. भारताने तिसऱ्या सत्रात दमदार खेळी खेळली. ३७ षटकांत टीम इंडियाने १०२ धावा करत फक्त १ विकेट गमावली. कोहली सध्या ८२ धावांवर खेळत आहे तर रहाणेही ५१ धावांवर नाबाद आहे. दोघांमध्ये आतापर्यंत ९० धावांची भागीदारी झाली आहे.


गोलंदाजांबद्दल बोलायचे झाले तर स्टार्कने सर्वाधिक दोन गडी बाद केले. तर हेजलवुडने एक गडी बाद केला. ऑस्ट्रेलियाने केलेल्या ३२६ धावांचा पाठलाग करताना भारताने पहिल्या ८ धावांमध्ये दोन विकेट गमावल्या. अशावेळी कोहली आणि पुजाराने डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला आणि खेळपट्टीला अनुसरुन ८० धावा केल्या. या जोडीला स्टार्कने तोडलं. लेग स्टंपच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूला फ्लिक करण्याच्या नादात पुजाराने टिम पेनला कॅच दिली.


पुजाराने २४ धावा केल्या कोहली- पुजाराने ७४ धावांची भागीदारी केली. आजच्या दिवसाच्या पहिल्या सत्रात २१.३ षटकांनंतर ५५ धावा झाल्या आणि ५ गडी बाद झाले. दुसऱ्या सत्रात २९ षटकांमध्ये ६४ धावा झाल्या आणि फक्त १ गडी बाद झाला.  भारताकडून इशांत शर्माने ४, बुमराह, उमेश यादव आणि हनुमा विहारीने प्रत्येकी २ गडी बाद केले. तर ऑस्ट्रेलियासाठी एरॉन फिंच (५०), मार्कस हॅरिस (७०) आणि ट्रॅविस हेड (५८), शॉन मार्श (४५), पेनने (३८) धावा केल्या.


ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या दिवसाची सुरुवातही दमदार केली. सातव्या विकेटसाठी पेन आणि कमिंसने ५९ धावांची भागीदारी केली आणि ऑस्ट्रेलियाचा धावफलक ३०० धावांच्या पुढे नेला. टीम इंडियाची अवस्था बिकट होत चालली आहे असे वाटत असताना उमेश यादवने कमिंसला (१९) त्रिफळाचित केले आणि सातवा गडी बाद केला. यानंतर भारताने ऑस्ट्रेलियाला मान वर काढण्याची संधीच दिली नाही. पुढच्या षटकात बुमराहने पेनला (३८) त्रिफळाचीत केले. ३२० धावांवर ऑस्ट्रेलियाचे ८ गडी बाद झाले.


पर्थच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाने पहिल्या दिवशी ६ गड्यांच्या मोबदल्यात २७७ धावा केल्या आहेत. पर्थच्या पिचनुसार ही धावसंख्या चांगली आहे. कारण जसा दिवस पुढे सरकेल पर्थच्या मैदानावर फलंदाजी करणं कठीण होणार आहे. टीम इंडियाच्या सलामीच्या जोडीला धावा करणं फार आवश्यक आहे. मुरली विजय आणि के.एल. राहुल यांना उत्कृष्ट फलंदाजी करावी लागेल. मात्र तसं होताना दिसत नाही. एकही धाव न काढता विजय तंबूत परतल्यामुळे भारताच्या उर्वरीत फलंदाजांवर त्याचा दबाव आला आहे.


आता एडिलेड कसोटी सामन्यात सपशेल अपयशी ठरलेल्या कर्णधार विराट कोहलीलाही जबाबदारीपूर्ण फलंदाजी करावी लागणार आहे. तसेच पुजारा आणि अजिंक्य रहाणेवर भारताची खरी मदार असणार आहे. पर्थ कसोटीचा पहिला दिवस ऑस्ट्रेलियाच्या नावावर राहिला. नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीला उतरलेल्या ऑस्ट्रेलियाच्या संघाने पहिल्या दिवशी ६ गडी गमावत २७७ धावा केल्या. खेळ संपेपर्यंत कर्णधार टिम पेन १६ आणि कमिंस (११) खेळत होते.


ऑस्ट्रेलियाच्या तीन फलंदाजांनी अर्धशतकी खेळी खेळल्यामुळे त्यांनी २७७ पर्यंत सहज मजल मारता आली. एरॉन फिंच (५०), मार्कस हॅरिस (७०) आणि ट्रॅविस हेड (५८)  धावा करुन बाद झाला.  भारतीय गोलंदाजांबद्दल बोलायचे झाले तर इशांत शर्मा आणि हनुमा विहारीने प्रत्येकी दोन गडी बाद केले. तर जसप्रीत बुमराह आणि उमेश यादवला प्रत्येकी एक गडी बाद करण्यात यश आले.


भारतीय संघ- विराट कोहली (कर्णधार), मुरली विजय, लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रविंद्र जडेजा, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार आणि उमेश यादव.


ऑस्ट्रेलियाचा संघ- टिम पेन (कर्णधार/ यष्टीरक्षक), एरॉन फिंच, मार्कस हैरिस, उस्मान ख्वाजा, शॉन मार्श, पीटर हैंड्सकॉम्ब, ट्रेविस हेड, मिशेल स्टॉर्क, पैट कमिंस, नाथन ल्योन और जोश हेजलवुड.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 15, 2018 03:50 PM IST

ताज्या बातम्या