रुग्णालयात मृत्यूशी झुंज देतोय हा माजी क्रिकेटर, कुटुंबाने BCCI कडे मागितली मदत
मार्टिन यांच्या उपचारांसाठी दररोज ७० हजार रुपयांचा खर्च येतो. आता त्यांच्या कुटुंबियांना उपचारांसाठी पैशांची अत्यंत आवश्यकता आहे.

४६ वर्षांच्या मार्टिन यांनी भारतासाठी १० एकदिवसीय सामने खेळले. २८ डिसेंबरला स्कूटरवरुन जाताना त्यांचा अपघात झाला. यानंतर त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले. या अपघातात त्यांच्या लिवर आणि आतड्यांना दुखापत झाली. तेव्हापासून ते व्हेंटिलेटरवरच आहेत.

मार्टिन यांच्या पत्नीने BCCI कडे उपचारांसाठी आर्थिक मदतीची मागणी केली आहे. आतापर्यंत त्यांच्या कुटुंबाने मार्टिन यांच्या उपचारांवर ५ लाख रुपये खर्च केले आहेत. बीसीसीआयनेही बेनेवॉलेन्ट योजनेअंतर्गत ५ लाख रुपये अजून दिले.

माजी बीसीसीआय अधिकारी आणि वडोदरा क्रिकेट असोसिएशनचे सेक्रेटरी संजय पटेल म्हणाले की, ‘जसं मला या अपघाताबद्दल कळलं मी जॅकबच्या कुटुंबाची सर्वोतोपरी मदत करण्याचा प्रयत्न केला. मी काही लोकांशी बोललोही. बडोद्याचे महाराज समरजीतसिंग गायकवाड यांनी १ लाख रुपयांची मदत केली. याशिवाय अतिरिक्त ५ लाख रुपयेही जमवले.’

ते पुढे म्हणाले की, ‘रुग्णालयाचं बिल याआधीच ११ लाखांच्या वर गेलं होतं. रुग्णालयाने औषधं देणंही बंद केलं होतं. मात्र बीसीसीआयने तातडीने पैसे पाठवले आणि उपचार सुरु ठेवले. बीसीएने ३० हजार रुपये टीडीएस कापून २ लाख ७० हजारांची मदत केली. त्यांच्याकडून जास्तीची अपेक्षा आहे.’

‘जेकॉब यांच्या नेतृत्वाखाली वडोदराच्या संघाने रणजी ट्रॉफी जिंकली होती. काही दिवसांपूर्वी असोसिएशनने दिवंगत माजी खेळाडूच्या पत्नीला २२ लाख रुपये मदत म्हणून दिले होते.’

माजी भारतीय क्रिकेटर जॅकब मार्टिन यांची तब्येत नाजूक असून त्यांच्यावर वडोदरा येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मार्टिन यांच्या उपचारांसाठी दररोज ७० हजार रुपयांचा खर्च येतो. आता त्यांच्या कुटुंबियांना उपचारांसाठी पैशांची अत्यंत आवश्यकता आहे.

पटेल यांनी सांगितलं की, ते आधीच राज्याच्या माजी खेळाडू जहीर खान आणि पठान बंधूंकडे यासंदर्भात बोलले आहेत. दोघंही आर्थिक मदत करायला तयार आहेत. पटेल अन्य स्टार खेळाडूंशी बोलणार असून त्यांच्याकडून आर्थिक मदत मिळते का ते पाहणार आहेत.
First Published: Jan 20, 2019 05:59 PM IST