• Home
  • »
  • News
  • »
  • news
  • »
  • बंगल्यावर नेवून तरुणाला 15-20 जणांकडून अमानुष मारहाण, जितेंद्र आव्हाडांवर गंभीर आरोप

बंगल्यावर नेवून तरुणाला 15-20 जणांकडून अमानुष मारहाण, जितेंद्र आव्हाडांवर गंभीर आरोप

या तरुणाने जितेंद्र आव्हाड यांच्याबद्दल सोशल मीडियावर एक आक्षेपार्ह पोस्ट टाकली होती.

  • Share this:
ठाणे, 07 एप्रिल : राष्ट्रवादी काँग्रेसचे  आमदार तथा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर ठाण्यात राहणाऱ्या एका सिव्हील इंजीनिअर तरुणाने गंभीर आरोप केल्यामुळे खळबळ उडाली आहे.  सुरक्षारक्षकांनी जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यावर नेवून त्यांच्यासमोर अमानुष मारहाण केल्याचा आरोप या तरुणाने केला आहे. या प्रकरणी वर्तकनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 5 एप्रिल रोजी रात्री 9 वाजून 9 मिनिटांनी दिवे लावण्याचं आवाहन केलं होतं. मोदी यांनी हे आवाहन केल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या या भूमिकेवर सडकून टीका केली होती. आव्हाड यांनी आपली भूमिका ट्वीट करून प्रसिद्धही केली होती. त्यांच्या या प्रतिक्रियेनंतर पीडित तरुणाने आव्हाड यांच्याबद्दल सोशल मीडियावर एक आक्षेपार्ह पोस्ट टाकली होती. या तरुणाने पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, '5 एप्रिलच्या रात्री 11.50 च्या सुमारास दोन पोलीस साध्यावेशात माझ्या घरी आले होते. या पोलिसांनी 'पोलीस स्टेशनला तुम्हाला बोलवलं आहे', असं सांगून मला येण्यास सांगितलं. मी त्यांना कशासाठी घेऊन जाताय असं विचारले असता त्यांनी कारण सांगितले नाही. माझ्या पत्नीला चौकशी करून 10 निटांमध्ये आणून सोडतो, असं त्यांनी सांगितलं. त्यानंतर या पोलिसांनी मला त्यांच्या पांढऱ्या रंगाच्या स्क्रॉपिओ गाडीने नेलं. यावेळी त्यांनी माझ्याकडील मोबाईल फोनही हिसकावून घेतला होता. त्यानंतर मला जितेंद्र आव्हाड यांच्या विवियाना मॉल येथील नाथ बंगल्यावर नेलं. हेही वाचा - Coronavirus: जगभरात 70 हजार लोकांचा मृत्यू; भारतात 4,281 संक्रमित, 111 मृत्यू या बंगल्यावर जितेंद्र आव्हाड सुद्धा हजर होते. तिथे आधीच उपस्थितीत असलेल्या 15-20 जणांनी मला पोलिसांच्या फायबर काठीने तुटेपर्यंत पाठीवर, कंबरेवर, मांड्यावर मारहाण केली. काठी तुटली म्हणून त्यानंतर लाकडी काठी आणि लोखंडी पाईपने चक्कर येईपर्यंत बेदम मारहाण केली.' असा आरोप या तरुणाने केला. त्यानंतर आव्हाड यांनी जखमी अवस्थेत असलेल्या या तरुणाला पोस्ट का टाकली, असं विचारलं. यावेळी, त्या तरुणाने आपण अतिउत्साहात आणि भावनेच्या भरातही पोस्ट टाकली असं सांगत माफी मागितली. त्यानंतर आव्हाड यांनी एका कार्यकर्त्यांच्या मोबाईलवरून या तरुणाच्या घरी फोन करून त्याच्या पत्नीला ही पोस्ट काढण्यास सांगितले. हे संपल्यानंतर या तरुणाला पुन्हा मारहाण करण्यात आली आणि 'मी ही पोस्ट चुकून केली आहे. त्याबद्दल माफी मागतो,' असा व्हिडिओ रेकॉर्ड करुन घेतला, असंही या तरुणाने सांगितलं. मारहाण झाल्यानंतर पोलिसांनीच या तरुणाला रुग्णालयात नेलं आणि तिथे उपचार केल्यानंतर घरीही सोडलं. त्यानंतर या तरुणाने वर्तकनगर पोलीस स्टेशन गाठलं. या तरुणाच्या तक्रारीवरून वर्तकनगर पोलीस स्टेशनमध्ये अनोळखी व्यक्तींविरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. तसंच, या तक्रारारदार तरुणावरही देखील आयटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Published by:sachin Salve
First published: