नवी दिल्ली, 15 मार्च : देशात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची वाढती संख्या चिंतेत भर टाकणारी आहे. त्यामुळे आता केंद्र सरकार वेगानं पावलं उचलंत आहे. कोरोना व्हायरसमुळे बाजारात मास्कची मागणी वाढली होती. आता सरकारने मास्कचा समावेश अत्यावश्यक वस्तूंमध्ये केला आहे. त्यामुळे आता मास्कचा काळाबाजार आणि साठेबाजी करणाऱ्यांवर कारवाई होणार आहे. ग्राहक संरक्षण आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाने याबाबत आदेश जारी केला आहे. मास्कसह सॅनिटायझरचासुद्धा यामध्ये समावेश करण्यात येणार आहे.
करोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांकडून वेगवेगळ्या पातळीवर उपाययोजना करण्यात येत आहेत. मुंबईत गर्दीच्या ठिकाणी मास्क आणि सॅनिटायझर पुरवण्याचा मोठा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. यानंतर केंद्र सरकारने मास्क आणि सॅनिटायझरचा काळा बाजार आणि साठेबाजी रोखण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे.
मास्क आणि सॅनिटायझरचा अत्यावश्यक वस्तूंमध्ये समावेश केला आहे. यामध्ये सर्जिकल मास्क, एन 95 मास्क यांचा समावेश होतो. करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी तात्पुरत्या कालावधीसाठी हा निर्णय घेतला असल्याचंही केंद्राने स्पष्ट केलं आहे.
Ministry of Consumer Affairs and Public distribution: In view of #Coronavirus, masks (2-ply and 3-ply surgical masks, N95 masks) and sanitizers have been declared Essential Commodities temporarily.
— ANI (@ANI) March 13, 2020
आता बाजारात जर तुम्हाला मास्क मिळाला नाही तर तक्रार करता येणार आहे. यासाठी तुम्हाला राष्ट्रीय ग्राहक क्रमांकावर तक्रार करावी लागेल. त्यांचा नंबर 1800-11-400 असा आहे. देशात होत असलेली मास्कची मागणी पाहता केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. अशी अनेक प्रकरणं समोर आली होती जिथं मास्क वाजवीपेक्षा जास्त किंमतीमध्ये विकला जात होता.
हे वाचा : ऑनलाइन शॉपिंगही नको! प्लास्टिक पॅकेजिंगमधूनही येऊ शकतो कोरोना व्हायरस