न्यूयॉर्क, 3 जून : कोरोना महामारीमुळे (corona pandemic) गेल्या दोन वर्षात सर्व देशांच्या अर्थव्यवस्थेचं मोठं नुकसान झालं आहे. या महामारीचा सर्वात मोठा फटका हॉटेल (Hotel) आणि पर्यटन व्यवसायाला (Tourism Industry) बसला आहे. सर्वच प्रमुख शहरातील हा व्यवसाय एक तर सध्या बंद आहे किंवा ग्राहकांच्या प्रतीक्षेत आहेत. जागतिक महासत्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमेरिकेतही (USA) हीच परिस्थिती आहे. अमेरिकेतील पर्यटन आणि हॉटेल व्यवसायाचं कोरोना महामारीमुळे मोठं नुकसान झालं असून यामध्ये समलिंगी व्यक्तींची हक्काची जागा असलेले गे रेस्टॉरंट्स (Gay Restaurants) देखील त्यांचं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी संघर्ष करत आहेत.
जुनी पंरपरा
'इंडियन एक्सप्रेस' मध्ये या विषयावर प्रसिद्ध झालेल्या लेखात अमेरिकेतील गे रेस्टॉरंट्स संस्कृतीचा आढावा घेण्यात आला आहे.पाश्च्यात्त्य देशात विशेषतः अमेरिकेत (USA) फार पूर्वीच अशी रेस्टॉरंट्स सुरू झाली होती. 27 वर्षापूर्वी न्यूयॉर्क टाईम्समध्ये गे लोकांचे स्वागत करणाऱ्या अशाच काही रेस्टॉरंट्सबाबत एक लेख प्रसिद्ध झाला होता. मात्र काळाच्या ओघात त्यात नमूद करण्यात आलेली हार्वेस्ट, ऑर्बिटस अशी अनेक रेस्टॉरंट्स नामशेष झाली. विसाव्या शतकात गे, लेस्बियन, ट्रान्सजेंडर्स यांचा समावेश असलेल्या एलजीबीटीक्यू समाजाकडे बघण्याचा समाजाचा दृष्टीकोन बदलत गेला. समाजाच्या मुख्य प्रवाहात त्यांनाही स्थान मिळू लागलं त्यामुळं आता खास त्यांच्यासाठीच्या रेस्टॉरंट्सची गरजही कमी झाली आहे.
या बदललेल्या परिस्थितीमध्ये काही जुनी रेस्टॉरंट्स आजही त्यांचं अस्तित्व टिकवून आहेत. त्यांना आता या कोरोना संकटामुळे ठेवण्यासाठी तीव्र संघर्ष करावा लागत असल्याचं नॅशनल एलजीबीटी चेंबर ऑफ कॉमर्सचे (National LGBT Chamber of Commerce) प्रेसिडेंट जस्टीन नेल्सन यांनी सांगितलं. 'कोविड-19 च्या साथीचा मोठा फटका या रेस्टॉरंट्सना बसला आहे. काळाच्या ओघात जितकी रेस्टॉरंट्स बंद झाली नसतील तितकी या साथीच्या काळात बंद पडली आहेत. लॉकडाऊनचे निर्बंध आणि सरकारकडून मिळत नसलेला पाठिंबा यामुळे अनेक प्रसिद्ध आणि लोकप्रिय रेस्टॉरंट्स नाईलाजाने कायमची बंद करावी लागली.' अशी खंत नेल्सन यांनी व्यक्त केली. नोव्हेंबरमध्ये कायमचं बंद करण्यात आलेलं ब्रुकलीनमधील मेमेज डिनर हे त्याचं मोठं उदाहरण आहे. गे रेस्टॉरंट्ससह गे बार देखील अस्तित्वाची लढाई लढत आहेत.
समलिंगी व्यक्तींची हक्काची जागा
समाजातून अनेकदा वाळीत टाकल्याची वागणूक मिळणाऱ्या समलिंगी लोकांसाठी खास त्यांच्यासाठी असलेल्या अशा रेस्टॉरंट्सबद्दल विलक्षण जिव्हाळा आहे. सुरक्षितता आणि स्वीकाराची भावना निर्माण करणारी ही रेस्टॉरंट्स, बार त्यांच्यासाठी खूप खास आहेत. बहुतेकांच्या इथल्या आठवणी फक्त तिथल्या खाद्यपदार्थासाठी नाहीत. उदाहरणार्थ, स्कॉट फ्रेंकलच्या न्यूयॉर्कमधील गे रेस्टॉरंट्समधील आठवणी तिथल्या पदार्थांच्या नाहीत तर तिथल्या वातावरणाच्या आहेत. तिथं होणारे वाढदिवस, अदबीनं सेवा देणारे वेटर यांच्याबद्दल आहेत. त्यामुळं तिथं जाणाऱ्या नेहमीच्या ग्राहकांनी ही रेस्टॉरंट्स बंद झाल्यानं हळहळ व्यक्त केली आहे.
1970 मधील लेस्बियन स्त्रीवादी चळवळीतून प्रेरणा घेऊन कनेटिकटमधील ब्रिजपोर्ट इथं स्थापन झालेलं 'ब्लडरूट' हे लेस्बियन लोक लोकांचे अत्यंत आवडते शाकाहारी रेस्टॉरंट आहे. सॅन फ्रान्सिस्कोजवळ कॅस्ट्रो इथं त्याच दशकात सुरू झालेल्या ऑर्फन अँडीज हे गे लोकांचे आवडते ठिकाण आहे. अटलांटामध्ये सुरू झालेलं वॉटरवर्क्स हे रेस्टॉरंट 1992मधील फक्त अमेरिकन-आफ्रिकन लोकांच्या मालकीचे गे रेस्टॉरंट होते.
काळाच्या ओघात बदलली परिस्थिती
अमेरिकेतील समलिंगी व्यक्तींना आता कोणत्याही रेस्टॉरंटमध्ये जाण्यात अडचण येत नाही, तिथं अवघडल्यासारखे वाटत नाही कारण लैंगिकता आणि लिंग यांच्या संकल्पना अधिक व्यापक झाल्या आहेत. त्यामुळं एखादं गे रेस्टॉरंट आता सामान्य रेस्टॉरंट ठरत आहे.
‘आताच्या काळातील एलजीबीटीक्यू नव्या पिढीला पूर्वी अशा लोकांना मिळणाऱ्या वेगळ्या वागणुकीचा अनुभव नाही. त्यामुळं त्यांना तिरस्कारापासून सुटका देणाऱ्या त्यांच्यासाठी अशा वेगळ्या रेस्टॉरंटसची गरज भासत नाही,’ असं मत मॉन्ट्रियलच्या कॉन्कॉर्डिया युनिव्हर्सिटीच्या अर्बन जिओग्राफर ज्युली पॉडमोर यांनी व्यक्त केले.
न्यूयॉर्कमध्ये असा अनुभव येत असला तरी देशात इतरत्र काही गे रेस्टॉरंट्स आपलं अस्तित्व टिकवून आहेत. स्थानिक व्यवसाय म्हणून, डे फॅक्टो कम्युनिटी सेन्टर्स, हिंसेपासून परावृत्त करण्याची ठिकाणे आणि रेस्टॉरंट उद्योगाला पुन्हा उर्जितावस्था येईल या आशेवर ही रेस्टॉरंट्स सुरू आहेत.
वॉशिंग्टनच्या ड्युपॉन्ट सर्कलजवळील अॅनीज पॅरामाउंट स्टीक हाऊस हे त्याचे ठळक उदाहरण म्हणता येईल. इथं अनेक लोक आनंदानं आपला वेळ घालवताना दिसून आले. जॉर्जिया कॅटिनास ही 33 वर्षीय तरुणी याचं व्यवस्थापन पाहते. ग्रीकमधून स्थलांतरित झालेल्या या कुटुंबातील जॉर्ज कॅटिनास या तिच्या आजोबांनी 1948 मध्ये हे गे रेस्टॉरंट उघडले. तिची मावशी अॅनी केलर लेस्बियन होती, तिनंच या खास रेस्टॉरंटचे बीज रोवले होते.
World Bicycle Day 2021: सायकलिंग एक उत्तम व्यायाम; होतील 'हे' फायदे
अॅनी या समुदायाची भक्कम समर्थक होती. 2013 मध्ये तिचा मृत्यू झाला, तोपर्यंत ती अनेक रेस्टॉरंटची प्रेरणा ठरली होती. 2019 मध्ये तिला जेम्स बर्ड फाउंडेशनकडून अमेरिकाज क्लासिक पुरस्कारानं गौरवण्यात आलं. तेव्हा रेस्टॉरंट समीक्षक डेव्हिड हेजडॉर्न यांनी लिहिलं होतं, ज्या काळात दोन समलिंगी पुरुष एकमेकांचे हात टेबलाखाली लपूनछपून धरत असत, त्या काळात त्यांना टेबलावर एकमेकांचे हात धरण्याचे स्वातंत्र्य देणारी, त्यांचे स्वागत करणाऱ्याचं काम अॅनीनं केलं
लॉकडाऊननंतर हे रेस्टॉरंट सुरू झाल्यानंतर लोक इथं येतात तेव्हा त्यांच्या डोळ्यात पाणी असतं कारण नेहमीच्या ग्राहकांसाठी हे रेस्टॉरंटपेक्षा घर अधिक आहे. 1976 पासून इथं येणारे आज 79 वर्षांचे असणारे स्टीव्ह हरमन म्हणतात," ड्युपॉन्ट सर्कल आता पूर्वीसारखी परिस्थिती राहिली नाही. आता समलिंगी व्यक्ती इतर ठिकाणी सहजपणे जातात. मुख्य प्रवाहात त्यांचा समावेश होत आहे, ही चांगलीच गोष्ट आहे; पण मी माझा शेजार, माझं असणारे रेस्टॉन्ट मिस करतो."
कोरोनामुळे लैंगिक जीवनावर होतोय परिणाम? संशोधन काय सांगतं पहा
न्यूयॉर्क (New york) शहरातील 1920च्या शतकाच्या उत्तरार्धात अविवाहित कामगारांना स्वस्त जेवण देणारी ठिकाणे ही नंतरच्या काळात या लोकांच्या एकत्र जमण्याची ठिकाणे बनली होती असं इतिहासकार जॉर्ज चौन्सी यांनी त्यांच्या 'गे न्यूयॉर्क' या पुस्तकात म्हटलं आहे.
1959 मध्ये स्टोनवॉल दंगलीच्या 10 वर्षे आधी इतिहासकारांनी लॉस एंजेलिसमधील कूपर डोनट्स इथं आधुनिक अमेरिकेतील पहिल्या विद्रोहाचा विचार केला. तेथे एलजीबीटीक्यूच्या लोकांनी कॉफी आणि डोनट्सचा पोलिसांवर फेकून आंदोलन केलं. 1980च्या दशकात, एड्सचा प्रादुर्भाव झाला. समलिंगी लोकांसाठी सर्वात वाईट काळ असणाऱ्या त्या वर्षांमध्ये फ्लोरंट मोरेलेट हा न्यूयॉर्कमधील या लोकांचे आश्रयस्थान होता. त्या आठवणी सांगताना तो गहिवरून गेला होता.
ग्रीन बे मधील सर्वात जुना गे बार आणि रेस्टॉरंट असलेल्या नॅप्समध्ये (NAPS) एलजीबीटीक्यू समुदायातील स्थानिक लोक येतात. इथं पदार्थांच्या किंमती वाजवी असल्यानं लोक वेळ घालवण्यासाठी इथं येतात. कोरोना साथीनं नुसते डिजिटल कनेक्ट होणे पुरेसे नाही, हे शिकवल्याचं इथं येणाऱ्या जेरेमा मॉस यांनी सांगितलं. विशेषतः कामगार वर्गातील गे लोकांसाठी नॅप्ससारखी जागा आवश्यक आहे. जिथं ते एकत्र येऊ शकतात. अन्यथा अशा लोकांना बाहेर येण्याचे काही ठिकाणच नाही, असं मॉस यांनी सांगितले
परदेशी कोरोना लशींचं भारतात लोकल ट्रायल रद्द झाल्याने काय फायदा होणार?
सॉल्ट लेक सिटीमधील लझीझ किचनची मालकीण असणारी सेबीटी म्हणते, हे फक्त गे रेस्टॉरंट नाही तर प्रेम करणाऱ्या सर्वांचे आहे. यामधील प्रवेशद्वारावरील एक पोस्टर निर्वासितांचे स्वागत करते. अशी रेस्टॉरंटस बदलाचे संकेत देत आहेत. ती वर्ण द्वेष, लिंग भेद याबाबत नवी दिशा देतील, असं मत केंटुकी युनिव्हर्सिटीतील अर्बन कल्चरल जिओग्राफर जेन जॅक गीसेकिंग यांनी व्यक्त केलं आहे.
कोरोना साथीनं अनेक बदल घडवले असून, बदलत्या काळाच्या ओघातही टिकून राहण्यासाठी संघर्ष करणारी एलजीबीटीक्यू समाजासाठीची रेस्टॉरंटस आगामी काळात या नव्या रुपात समाजाला नवी दिशा देणारी ठरतील अशी शक्यता आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, LGBT, United States of America