Home /News /news /

कोरोना संशयितांनो, रुग्णालयातून पळू नका; नाहीतर होऊ शकतो 6 महिन्यांचा तुरुंगवास

कोरोना संशयितांनो, रुग्णालयातून पळू नका; नाहीतर होऊ शकतो 6 महिन्यांचा तुरुंगवास

कोरोना संशयित रुग्ण रुग्णालयातून पळून जात असल्याने आता गृहमंत्र्यांनी कठोर पाउल उचलत अशा रुग्णांवर पोलिसांना कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

    मुंबई, 19 मार्च : जगभरात कोरोना व्हायरसमुळे हाहाकार उडाला आहे. भारतातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असून सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात आढळले आहे. काही दिवसांपूर्वी नागपूर आणि अहमदनगरमधील रुग्णालयातून कोरोनाचे संशयित रुग्ण पळून गेल्याची घटना घडली होती. त्यामुळे आता गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कठोर पाऊल उचलले आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात कोरोना संशयित रुग्ण रुग्णालयातून पळून जात असल्याने आता गृहमंत्र्यांनी कठोर पाउल उचलत अशा रुग्णांवर पोलिसांना कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. कोरोना व्हायरसची परिस्थिती पाहता देशात साथरोग प्रतिबंध कायदा (Epidemic diseases act) लागू करण्यात आला आहे. 123 वर्ष जुना हा कायदा आहे. एखाद्या आजाराला आळा घालण्यात सर्व प्रयत्न अयशस्वी होत असतील, तेव्हा हा कायदा लागू केला जातो. राज्यांना आवश्यक ती कारवाई करण्याचे अधिकार दिले जातात. महाराष्ट्रातही हा कायदा लागू करण्यात आला आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यांना 6 महिन्यांचा तुरुंगवास होऊ शकतो. अहमदनगर आणि इतर ठिकाणाहून काही रुग्ण पळून गेल्याच्या घटना समोर आल्याने आता पोलीस प्रशासनाला गृहमंत्री अनिल देशमुख यांनी हे आदेश दिले आहे. Quarantine चा शिक्का असलेल्या 6 जणांना सौराष्ट्र एक्स्प्रेसमधून खाली उतरवलं हातावर क्वारंटाइन ( Quarantine)चा शिक्का असलेल्या सहा जणांना सौराष्ट्र एक्स्प्रेसमधून खाली उतरवण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. हे प्रवाशी सिंगपूरहून मुंबईत आले होते. नंतर ते सगळे मुंबई सेंट्रलहून सौराष्ट्र एक्स्प्रेसने बडोदा जाण्यासाठी निघाले होते. गाडी बोरिवली स्टेशनवर पोहोचताच त्यांना ट्रेनमधून खाली उतरवण्यात आले. बी-1 आणि बी- 2 या बोगीमधून ते प्रवास करत होते. मिळालेली माहिती अशी की, हातावर कोरोनाचा शिक्का असतानाही विलगीकरण कक्षात राहण्याऐवजी हे प्रवाशी ट्रेनने बिनधास्त प्रवास करत होते. या संशयितांना तात्काळ ट्रेनमधून उतरवण्यात आले आहे. कोरोना व्हायरसचा संशयित रुग्ण कुणाच्याही संपर्कात येऊ नये यासाठी राज्य सरकारने अनेक उपाययोजना केल्या आहेत. राज्य सरकारकडून या रुग्णांच्या हातावर क्वारंटाइनचा शिक्का मारण्यात येत आहे. विदेशातून येणाऱ्या प्रवाशांची एअरपोर्टवरच तपासणी केली जात आहे. संशयित आढळून आल्यास अशा विलगीकरण कक्षात ठेवण्यात येत आहे. मुंबईतील कस्तुरबा गांधी रुग्णालयात विलगीकरण कक्ष करण्यात आला आहे. राज्यात रुग्णांची संख्या 49 वर दरम्यान, राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. रुग्णांची संख्या 49 वर पोहोचली आहे. तर देशात कोरोना रुग्णांची संख्या 166 झाली आहे. कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार उपाययोजना करत आहे. नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळा, एकाच ठिकाणी जास्त गर्दी करु नये, असे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे. कोरोनाला रोखण्यााठी सरकारने केले मोठे बदल 1. राज्यातील शासकीय कार्यालये एक दिवसाआड पद्धतीने रोज 50 टक्के कर्मचारी येतील या हिशोबाने सुरू ठेवण्यात येतील. 2. रेल्वे, एसटी बसेस, खाजगी बसेस, मेट्रो ही सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही 50 टक्के प्रवासी क्षमतेने चालविण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 3. मुंबईमध्ये बेस्टमधील उभे राहणारे प्रवाशी बंद करण्यात येतील. तसेच प्रवाशी अंतराने बसावेत यासाठी तशा सूचना प्रवाशांना देण्यात येतील. शहरांमध्ये बसेसची संख्या वाढविण्यासाठी पर्यायी बसेसची व्यवस्था करण्यात येईल. 4. दुकानांच्या वेळा ठरविणार शहरातील दुकानांच्या वेळा अशा तऱ्हेने ठरविण्यात येतील की, सर्व दुकाने अंतरा-अंतराने सकाळी व दुपारी सुरू होतील. बाजारातील तसेच गर्दीच्या ठिकाणातील रस्ते यामध्ये देखील एक दिवसाआड किंवा वेळांमध्ये बदल करण्यात येईल. 5. साधनसामुग्रीची उपलब्धता दवाखाने, वैद्यकीय महाविद्यालये या ठिकाणी सर्व प्रकारची साधनसामुग्री उपलब्ध राहील हे पाहण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. आवश्यक तेवढ्या अलगीकरण कक्ष व विलगीकरण कक्षांची सोय करण्यात आली आहे. आवश्यक ती वैद्यकीय उपकरणे, व्हेंटिलेशन, मास्क तसेच वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी वैयक्तिक सुरक्षा साधने, औषध सामुग्री देखील उपलब्ध आहेत.
    First published:

    पुढील बातम्या