विवेक गुप्ता, प्रतिनिधी
मुंबई, 25 जून : राज्याची राजधानी असलेल्या मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मुंबईसह उपनगरातही कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे आता अप्पर पोलीस आयुक्तांनी शहरातील 10 पोलीस स्टेशनला आपल्या हद्दीत लॉकडाउनचे कडक पालन करण्याचे आदेश दिले आहे.
मुंबईतील उत्तर भागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. उत्तर भागातील 10 पोलीस स्टेशनच्या हद्दीत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या चिंताजनक आहे. त्यामुळे पोलीस आयुक्तांनी गोरेगाव, मालाड, मालवणी, चारकोप, बोरिवली, आरे, दिंडोशी, कुरार, समतानगर आणि दहिसर पोलीस स्टेशनांना नोटीस बजावली आहे.
रामदेव बाबांना ठाकरे सरकारचा झटका, 'कोरोनिल'बद्दल घेतला मोठा निर्णय
या दहा पोलीस स्टेशनच्या हद्दीत जिथे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहे, अशा परिसरात पोलिसांनी कडक नियोजन करावे आणि तेथील हालचालींवर पूर्णत: बंदी घालून लॉकडाउन नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, असा आदेश देण्यात आला आहे.
या परिसरांमध्ये कडक बंदोबस्त ठेवून मास्क न वापरणारे, सोशल डिस्टन्सिंग न पाळणे, दुचाकीवर डबल सीट जाणे आणि पालिकेनं आदेश देऊन दुकानं उघडी ठेवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी असे आदेश पोलिसांना देण्यात आले आहे.
या परिसरात फक्त अत्यावश्यक सेवा सुरू राहणार असून रात्री 8 वाजेपर्यंत दुकान उघडे ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. नागरिकांनीही महत्त्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडावे, असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
संपादन - सचिन साळवे