देवमाणूस! 25 गावांतून रोज तयार होतात 5 हजार डबे, आपल्या देशासाठी बळीराजानं अशी पेटवली माणुसकीची मशाल

देवमाणूस! 25 गावांतून रोज तयार होतात 5 हजार डबे, आपल्या देशासाठी बळीराजानं अशी पेटवली माणुसकीची मशाल

लॉकडाऊनमुळे शेतकरी संकटात आहे. मात्र गाव खेड्यातली बळीराजाची ही मनाची श्रीमंती खरच प्रेरणादाई आहे. माणूसकीची ही भिंत सगळ्यांच्या डोळ्यांत पाणी आणेल. खरंतर ही आपल्या देशाची खरी ताकद आहे.

  • Share this:

बीड, 15 एप्रिल : कोरोना...! एक जीवघेणा विषाणू. आज संपूर्ण देश या कोरोनाच्या संकटाशी दोन हात करत उभा आहे. या विषाणूनं देशाला एका वेगळ्याच उंबरठ्यावर आणून ठेवलं आहे. एका क्षणात ही धावती दुनिया जागेवर थांबवली. कोरोनाचा फैलाव थांबवण्यासाठी प्रत्येकाला घरात बसण्याची वेळ आली. पण पोटाची खळगी मात्र घरात बसू देत नाही. कष्टानं कमवून खाणाऱ्यांवर सुद्धा या आजाराने उपासमारीची वेळ आणली. पण या संकटातून सगळ्यांना बाहेर काढण्यासाठी काही देव माणसं जीवापाड अखंड उभी आहेत. तुम्हाला अशीच एक प्रेमाची गोष्ट सांगणार आहोत.

कोरोनाच्या संकटाशी दोन हात करताना शहरामध्ये अडकून पडलेल्या, हातावरती पोट असणाऱ्या कुटुंबामध्ये दोन वेळच्या जेवणाची पंचायत आहे. अशा कुटुंबाला अडचणीत आधार देण्यासाठी गावातील लोक पुढे आले. त्यांनी "प्रेमाची भाकरी" हा उपक्रम राबला. बीड जिल्हयात बीड शहरापासून 15 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या जवळच्या पंचवीस गावातील लोक रोज 5000 भाकरी शहरातील गरजूंना पाठवत आहेत.

बरं फक्त भाकरी नाही तर या सोबत चटणी, लोणचं आणि भाजी भाकरी असा रोजचा डबा शहरात गरजूंपर्यंत पोहोचतो. यामुळे अडचणीत सापडलेल्या लोकांना ग्रामीण भागातील लोकांची प्रेमाची भाकरी आधार ठरत आहे. लॉकडाऊनमुळे शेतकरी संकटात आहे. मात्र गाव खेड्यातली बळीराजाची ही मनाची श्रीमंती खरच प्रेरणादाई आहे. माणूसकीची ही भिंत सगळ्यांच्या डोळ्यांत पाणी आणेल. खरंतर ही आपल्या देशाची खरी ताकद आहे.

दवंडी पिटून प्रत्येकापर्यंत पोहोचतात

गावात एक दिवस आधी दवंडी पिटून सांगण्यात येतं की, 'उद्या प्रत्येकीने दोन भाकरी जास्त बनवायच्या. बीडला पाठवायच्या आहेत. दुसऱ्या दिवशी गावातील तरुण कार्यकर्ते ही भाजी-भाकरी गोळा करून मंदिरात किंवा पारा वर ठेवतात. भाकरी-गोळा झाल्या की 'जिओ जिंदगी ग्रुप'चे सदस्य येतात आणि हे जेवण शहरात घेऊन गरजूंना वाटप करतात. हा उपक्रम गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. यात आज बीड तालुक्यातील अंतरवन पिंपरी, नांदूर घाट गावात अशा 5000 हजार भाकरी गोळा केल्या जातात. ते सुद्धा स्वच्छता आणि सोशल डिस्टिंसिंगच्या नियमांचं पालन करून.

भाकरी बनवण्यापासून, त्या गोळा करणं आणि लोकांपर्यंत पोहोचवणं हे अगदी जबाबदारीनं केलं जातं. आणि जोपर्यंत लॉकडाऊन संपणार नाही, तोपर्यंत आम्ही भाकरी पोचवू असं अंतरवन पिंपरीच्या नवनाथ प्रभाळे यांनी सांगितलं. एकही व्यक्ती संकटात उपाशी राहू नये. यासाठी गावातील लोक प्रेमाने भाकरी देतात. ती एकत्रित करून गरजूपर्यंत पोचवण्याचे काम आम्ही करतो. सकळी 2 तास दिले तर हे सगळं होतं असं नांदूर घाटच्या अमोल जाधव यांनी सांगितलं. यावेळी त्यांच्या डोळ्यांतलं देशप्रेम स्पष्ट दिसलं.

लॉकडाऊनमुळे बीड शहरात अनेक वस्तींमध्ये गरीब आणि हातावर पोट असणाऱ्या मजुरांना जेवण मिळणं कठीण झालं आहे. काम नसल्यामुळे चूल बंद पडली. यातच कुठे जाताही येत नाही. त्यामुळे कुटुंब जगवावं कसं अशी परिस्थिती असताना शासन रेशनच्या माध्यमातून मदत करत आहे. मात्र आद्यप सामन्य लोकांपर्यंत ते तेवढ्या मोठ्या प्रमाणात पोहोचलं नाही. ज्यांच्याकडे रेशनकार्ड नाही असे वीटभट्टी मजूर तर राज्यतील कामगार अशांचा प्रश्न मात्र तसाच आहे.

यासंदर्भात बीड शहरामध्ये सामाजिक क्षेत्रात काम करणार्‍या जीओ जिंदगी या ग्रुपने गावा खेड्यातील लोकांना आवाहन करत "प्रेमाची भाकरी-भाजी" म्हणून प्रत्येक घरातून भाकरी गोळा केली जात आहे. अशा जमवलेल्या भाकरी गरजूंपर्यंत पोहोचवल्या जात आहेत यामुळे या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. तर शहरातील लोकांच्या मदतीला आलेल्या खेड्यातील लोकांचे आभार मानले जात आहेत.

संकलन, संपादन - रेणुका धायबर

First published: April 15, 2020, 2:29 PM IST

ताज्या बातम्या