सुकाणू समितीत वाद चव्हाट्यावर, पत्रकार परिषदेत नेत्यांचा गोंधळ

सुकाणू समितीत वाद चव्हाट्यावर, पत्रकार परिषदेत नेत्यांचा गोंधळ

शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील आणि शेकापचे नेते जयंत पाटील माध्यमांसमोर भिडले. उद्या सरकारसोबत चर्चा करण्यासाठी 15 की 35 सदस्य चर्चेला न्यायचे यावरून वाद झालाय.

  • Share this:

10 जून : शेतकऱ्यांनी सरकारशी चर्चा करण्यासाठी नेमलेल्या सुकाणू समितीतच वाद चव्हाट्यावर आलाय. आज बोलवण्यात आलेल्या बैठकीत शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील आणि शेकापचे नेते जयंत पाटील यांचा माध्यमांसमोरच वाद झाला. उद्या सरकारसोबत चर्चा करण्यासाठी 15 की 35 सदस्य चर्चेला न्यायचे यावरून वाद झालाय.

शेतकऱ्यांच्या संपामुळे सरकारमध्ये भूकंपच झाला. शेतकऱ्यांच्या संपाला एवढा मोठा प्रतिसाद मिळेल अशी कल्पनाही राज्यकर्त्यांनी केली नव्हती. शेतकऱ्यांनी जशा शहरांच्या नाड्या आवळण्यास सुरुवात केली तसं सरकारनं शेतकऱ्यांशी चर्चा करण्याची तयारी केली. शेतकऱ्यांचं नेतृत्व सामूहिक होतं. संपात अठरा संघटना होत्या. किसान क्रांती मोर्चानं मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आणि संपातून माघार घेत असल्याचं जयाजी सूर्यवंशींनी जाहीर केलं.

संप फोडल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली. शेतकऱ्यांचा हा संताप रस्त्यावर दिसला. जयाजी सूर्यंवंशी प्रकरणानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला अनुभवाची जोड देण्यासाठी सुकाणू समितीची घोषणा करण्यात आली. ही समिती शेतकऱ्यांचा जास्तीत जास्त मागण्या मान्य करुन घेतील अशी अपेक्षा होती. पण या समितीतही आता फूट पडलीये. आंदोलक शेतकऱ्यांवरचे गुन्हे मागे घ्या या मागणीवरुन गिरीधर पाटील रुसून बसलेत.

गिरीधर पाटलांचं रुसणं योग्यही असेल. पण त्यांच्या रुसण्याचा आंदोलनावर विपरीत परिणाम होण्याची भीती आहे. डावे नेते आंदोलन हायजॅक करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोपही त्यांनी केलाय.

शेतकऱ्यांनी मोठ्या विश्वासानं त्यांच्या आंदोलनाचं नेतृत्व या सुकाणू समितीकडे दिलंय. या नेत्यांनी मानापमान मागे ठेऊन शेतकऱ्यांच्या जास्तीत जास्त मागण्या पदरात पाडून घेणं अपेक्षित होतं. सुकाणू समितीतले नेते मात्र आपापसात लढतायेत. हे असंच राहिलं तर शेतकऱ्यांचं एक व्यापक आंदोलन अपयशी होण्याची भीती व्यक्त केली जातेय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 10, 2017 07:20 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...