मुंबई, १० फेब्रुवारी २०१९- काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या आयुष्यावरही आता सिनेमा येऊ घातला आहे. माय नेम इज रागा असं या सिनेमाचं नाव असून रुपेश पाल यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलेलं आहे. आपल्या सिनेमाबद्दल बोलताना रुपेश म्हणाले की, ‘या सिनेमाचा उद्देश राहुल गांधी यांचं मोठेपण दाखवणं किंवा त्यांच्या आयुष्यातील इतर रहस्यांचा उलगडा करणं हे नाहीये. ही एक अशा माणसाची गोष्ट आहे, ज्याचं नेहमीच हसू उडवलं गेलं. तरीही त्यांनी कशापद्धतीने राजकारणात पुनरागमन केलं याची ही गोष्ट आहे.’
रुपेश पुढे म्हणाले की, ‘जो निर्भीडपणे अपयशाला सामारो गेला त्या प्रत्येकाची ही गोष्ट आहे. प्रतिकूल वातावरणातही खंबीर राहून यश मिळवणं आणि लोकांची मनं जिंकणं सगळ्यांनाच शक्य होत नाही.’ निवडणुकांच्या काळात येत्या एप्रिल महिन्यात हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.
एकीकडे राहुल गांधी यांच्या आयुष्यावर बायोपिक प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यावरही सिनेमा तयार होत आहे. अभिनेता विवेक ओबेरॉय या सिनेमात नरेंद्र मोदी यांची भूमिका साकारत आहे.
काही दिवसांपूर्वी या सिनेमाच्या सेटवरचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यात सिनेमाचे निर्माते संदीप सिंग, दिग्दर्शक उमंग कुमार आणि विवेक ओबेरॉय तिघांनी क्लॅपरबोर्ड हातात पकडला होता.
या सिनेमात विवेकसोबत बोमन इराणी आणि दर्शन कुमार यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. या बायोपिकमध्ये मोदींच्या चहा विकण्यापासून ते पंतप्रधान होण्यापर्यंतचा प्रवास दाखवण्यात येणार आहे.
#Youthकोर्ट : बार्शीकरांचा कौल कुणाला? कोण होणार पंतप्रधान?