23 मार्च : लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून राज्यातील तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. यादीमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना नांदेडमधून उमेदवारी जाहीर झाली आहे. एकूण 38 जणांची नाव जाहीर झाली आहे. यामध्ये महाराष्ट्रातून फक्त अशोक चव्हाण यांच्याच नावाची घोषणा झाली आहे. अशोक चव्हाण यांचं नाव जाहीर झाल्यामुळे नांदेडमध्ये भाजपचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांची थेट लढत पाहण्यास मिळणार आहे.
कर्नाटकमध्ये 18, मध्य प्रदेश 9, मनिपूर 2, उत्तराखंड 5 आणि उत्तर प्रदेशमधून 3 जागांची घोषणा करण्यात आली आहे. दरम्यान, शुक्रवारी रात्री काँग्रेसने आणखी पाच मतदारासंघातील उमेदवारांची घोषणा केली होती. यामध्ये लातूर, चंद्रपूर, जालना, औरंगाबाद आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघाचा समावेश होता. काँग्रेसकडून अनेक नवख्या उमेदवारांना संधी देण्यात आली. चंद्रपूर येथे विनायक बांगडे हे काँग्रेसचे उमेदवार असतील. नरेश पुगलिया आणि विजय वड्डेटीवार गटातील मतभेदाच्या वादात अखेर बांगडे यांच नाव समोर आलं आहे.
जालना- विलास औताडे
औरंगाबाद- सुभाष झांबड
भिवंडी- सुरेश तावरे
लातूर- मच्छिंद्र कामत
अब्दुल सत्तारांची बंडखोरी
लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाने उमेदवारी न दिल्याने सिल्लोडचे काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार यांनी राजीनामा दिला आहे. 'मला लोकांमध्ये जाऊन नशीब अजमावयाचे आहे. मी लोकसभा निवडणूक लढवणारच,' असं म्हणत अब्दुल सत्तार यांनी काँग्रेसमधून बंडखोरी केली आहे.
'मी कुणावरही नाराज नाही. मी औरंगाबादमधून उमेदवारी मागितली होती. पण पक्षाने मला उमेदवारी दिली नाही. मी काँग्रेसचा राजीनामा आधीच दिलेला आहे. आता काँग्रेस आमदार म्हणून बोलत नाही. मी लोकसभा निवडणुकीत अपक्ष लढत देणार आहे,' अशी घोषणाही अब्दुल सत्तार यांनी केली आहे.
'मला माझ्या लोकांना न्याय मिळवून द्यायचा आहे. आता मी माघार घेणार नाही,' असा आक्रमक पवित्रा सत्तारांनी घेतला आहे.
चंद्रपूरच्या उमेदवारीवरून वाद
औरंगाबादमधून माजी मंत्री अब्दुल सत्तार यांना उमेदवारी हवी होती पण त्यांच्याऐवजी सुभाष झांबड यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे अब्दुल सत्तार यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला आहे.औरंगाबादमधून आपली पत्नी अमिता चव्हाण यांना उमेदवारी द्यावी, असं अशोक चव्हाण यांचं म्हणणं आहे पण ते पक्षातल्या नेत्यांना मान्य नाही, अशी सूत्रांची माहिती आहे.
चंद्रपूरच्या जागेवरही विनायक बांगडे यांच्या उमेदवारीमुळे नरेश पुगलिया नाराज आहेत पण चंद्रपूरचा उमेदवार ठरवताना आपलं मत विचारात घेतलं नाही, असं अशोक चव्हाण म्हणाले. त्यांचा रोख मुकुल वासनिक यांच्यावरच होता. अशोक चव्हाण यांच्या उमेदवाराला तिथे डावलण्यात आलं, अशी चर्चा आहे.
पुण्यामध्ये उमेदवार कोण ?
पुण्यामध्ये भाजपचे उमेदवार गिरीश बापट यांच्याविरुद्ध काँग्रेसचा उमेदवार कोण हेही अजून ठरलेलं नाही. पक्षातल्या नेत्यांमधले आपापसातले वाद हेच याला कारणीभूत आहेत.
काँग्रेसमधल्या वादाचं मोठं कारण ठरलं ती नगरची जागा.नगरच्या जागेवरून काँग्रेसला राष्ट्रवादीसमोर हार मानावी लागली आणि मग सुजय विखे पाटील यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. त्याचबरोबर राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधी पक्षनेतेपदाच्या राजीनाम्यावरूनही उलटसुलट चर्चा झाल्या.
या सगळ्या घडामोडींमुळे काँग्रेसमध्ये एकूणच काही आलबेल नाही हेच समोर आलं आहे. प्रदेशाध्यक्ष आणि बड्या नेत्यांमधल्या बेदिलीमुळे काँग्रेसचीच अवस्था बिकट झाली आहे.
============