'सुजयच्या भाजपमध्ये जाण्याच्या निर्णयाला राधाकृष्ण विखेंचा पाठिंबा'

'सुजयच्या भाजपमध्ये जाण्याच्या निर्णयाला राधाकृष्ण विखेंचा पाठिंबा'

'अहमदनगरची जनता सुज्ञ असून इकडून-तिकडे उड्या मारणारांना स्वीकारणार नाही. आणि सुजय विखेंना त्यांचा निर्णय चुकीचा होता हे जनताच दाखवून देईल.'

  • Share this:

हरीष दिमोटे, प्रतिनिधी

अहमदनगर, 13 मार्च : विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा मुलगा सुजय याने भाजपात प्रवेश केल्यानंतर काँग्रेसमधून आता विखेंवर टीका होताना दिसत आहे.  काँग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी थेट राधाकृष्ण विखेंच्या पक्षनिष्ठेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. ज्या विखे कुटूंबाला काँग्रेसनं भरभरून दिलं, त्यांच्याच मुलाने भाजपात प्रवेश करणं योग्य आहे का असा सवाल आता काँग्रेसकडून उपस्थित करण्यात येत आहे.

सुजय विखेंच्या भाजप प्रवेशानंतर आता काँग्रेसचे नेते विखेंवर तोंडसुख घेताना दिसताहेत. राजकीय विरोधक असलेल्या बाळासाहेब थोरात यांनीही विखेंच्या पक्षनिष्ठेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. 'आजवर काँग्रेस पक्षाने विखे कुटूंबाला भरभरून दिलं. पण तरीही अशा प्रकारचा निर्णय योग्य आहे का' असा सवाल उपस्थित करत 'भाजपमध्ये जाण्याचा निर्णय केवळ सुजय विखे यांचा एकट्याचा नसून राधाकृष्ण विखेंचा त्यास पाठींबा' असल्याचा आरोप थोरातांनी केला आहे.

'ज्यांना काँग्रेसचं नेतृत्व करायचं आहे त्यांचा मुलगाच जर भाजपात प्रवेश करत असेल तर हे पक्षासाठी योग्य नाही. राधाकृष्ण विखे पाटलांनी मुलाला कठोर शब्दात सांगून रोखण्याची गरज होती' असंही थोरात म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, 'अहमदनगरची जनता सुज्ञ असून इकडून-तिकडे उड्या मारणारांना स्वीकारणार नाही.  आणि सुजय विखेंना त्यांचा निर्णय चुकीचा होता हे जनताच दाखवून देईल.' एकीकडे काँग्रेसकडून अशा टीका होत असताना दुसरीकडे सुजय विखेंच्या भाजपा प्रवेशानंतर अजूनही राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली नाही. पण यासगळ्यावर ते काय बोलणार आणि काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं असेल.

सुजय विखे हेच भाजपचे उमेदवार, मुख्यमंत्र्यांकडून शिफारस

काँग्रेस नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. सुजय यांनी भाजपमध्ये प्रवेश करताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही सुजय विखे पाटील यांची नगरमधून लोकसभा उमेदवारीसाठी केंद्रीय समितीकडे शिफारस करणार आहोत, अशी घोषणाही केली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सुजय यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला. सुजय विखे-पाटलांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत आपल्या समर्थकांसोबत भाजपमध्ये कमळ हाती घेतलं आहे. सुजय यांच्या भाजपप्रवेशादरम्यान जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील, रावसाहेब दानवे, बबनराव पाचपुते आदी नेतेदेखील उपस्थित होते.

भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर सुजय यांनी घेतली उद्धव ठाकरे यांची भेट

भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर सुजय विखे पाटील यांनी 'मातोश्री'वर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर प्रथमच ते उद्धव ठाकरे यांना भेटले. यावेळी आगामी निवडणुकीच्या रणनितीवर त्यांच्यात चर्चा झाली. त्यानंतर उद्धव ठाकरकेंनी पत्रकारांशी संवाद साधला. ''भाजप-सेना युतीच्या रणनीतीचा आराखडा तयार झाला असून, आता त्यात मिठाचा खडा कोणी टाकू शकत नाही,'' असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

VIDEO : मी इतरांच्या मुलांचेही हट्ट पुरवतो, उद्धव ठाकरेंचा पवारांना टोला

 

First published: March 13, 2019, 6:24 PM IST

ताज्या बातम्या