गुजरात निकालानंतर महाराष्ट्रात दोन्ही काँग्रेसच्या आघाडीसाठी आमदारांचा वाढता दबाव

गुजरातच्या निकालानंतर इकडे महाराष्ट्राच्या राजकारणातही घडामोडींना वेग आलीय. गुजरातमध्ये पुन्हा भाजपच निवडून आल्याने राज्यातल्या दोन्ही काँग्रेसच्या आमदारांनी आगामी विधानसभा निवडणूक एकत्रितपणे लढण्यासाठी आतापासूनच आपआपल्या पक्षनेतृत्वाकडे तगादा लावण्यात सुरूवात केलीय.

Chandrakant Funde | News18 Lokmat | Updated On: Dec 19, 2017 09:50 PM IST

गुजरात निकालानंतर महाराष्ट्रात दोन्ही काँग्रेसच्या आघाडीसाठी आमदारांचा वाढता दबाव

19 डिसेंबर, नागपूर : गुजरातच्या निकालानंतर इकडे महाराष्ट्राच्या राजकारणातही घडामोडींना वेग आलीय. गुजरातमध्ये पुन्हा भाजपच निवडून आल्याने राज्यातल्या दोन्ही काँग्रेसच्या आमदारांनी आगामी विधानसभा निवडणूक एकत्रितपणे लढण्यासाठी आतापासूनच आपआपल्या पक्षनेतृत्वाकडे तगादा लावण्यात सुरूवात केलीय. गुजरातमध्ये काँग्रेसलाही समाधानकारक यश मिळाल्याने आगामी निवडणुकीत काँग्रेसला सोबत घेतल्याशिवाय आपल्याला पुन्हा सत्तेत येता येणार नाही, हे राष्ट्रवादीला एव्हाना कळून चुकलंय. म्हणूनच 2019च्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी या समविचारी पक्षांनी एकत्र येण्याची गरज व्यक्त होऊ लागलीय.

विशेषतः युवा आमदार यासाठी सर्वाधिक आग्रही असल्याचं राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय. दोन्ही पक्षांनी एकत्र येण्याबाबत दोन्ही काँग्रेसच्या आमदारांमध्ये आत्तापासून चर्चा सुरू झाली असून गरज पडल्यास आम्ही यासंदर्भात राहुल गांधी आणि शरद पवारांची लवकरच भेट देखील घेणार असल्याचं आव्हाडांनी स्पष्ट केलंय. या राजकीय मनोमिलनासाठी काँग्रेसकडून आमदार सुनील केदारे तर राष्ट्रवादीकडून शरद पवारांचे निकटवर्तीय जितेंद्र आव्हाड यांनी पुढाकार घेतलाय. विधानसभेच्या जागावाटपाबाबत किमान चर्चेला तरी सुरूवात झाली तर त्याप्रमाणे स्थानिक पातळीवर आत्तापासूनच निवडणूक लढवण्याचं नियोजन करता येईल, असं या आमदारांना वाटतंय.

...पण राहुल गांधी शरद पवारांना जवळ करणार का ?

सोनिया गांधींच्या काळात काँग्रेसकडून शरद पवारांना नेहमीच सन्मानाची वागणूक मिळालीय. पण आता काँग्रेसचं नेतृत्व राहुल गांधींकडे आलंय. त्यामुळे सोनिया गांधींप्रमाणेच राहुल गांधीही शरद पवारांना तितक्याच सन्मानाने वागवणार का ? याबाबत राष्ट्रवादीच्या नेतृत्वाला काहिशी शंका आहे कारण कितीही नाही म्हटलं तरी हा दोन पिढ्यांमधला फरक आहे. तसंही मध्यंतरी शरद पवारांनी राहुल गांधींच्या अनपेक्षित वर्तणुकीबद्दल जाहीरपणे टीका केली होती. राहुल गांधी दौरे करताना स्थानिक पातळीवरच्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेत नसल्याची टीका शरद पवारांनी केली होती. त्यामुळे राहुल गांधी आणि शरद पवार यांच्यातला दुरावा काही लपून राहिलेला नाही.

गुजरातच्या निवडणुकीत तर राष्ट्रवादीने आघाडीची इच्छा व्यक्त करूनही राहुल गांधींनी चर्चेसाठी साधा प्रतिसादही दिला नव्हता. जर समजा महाराष्ट्रातही काँग्रेसच्या युवा नेतृत्वाने आघाडीबाबत अशीच ताठर भूमिका घेतली तर ऐनवेळी काय करायचं? हा प्रश्न राष्ट्रवादीवाल्यांना सतावतोय. याचीच चाचपणी करण्यासाठी राष्ट्रवादीकडून हे आघाडीच्या चर्चेबाबतचं पिल्लू सोडल्याचं बोललं जातंय. तसंही आगामी काळातल्या आघाडीची साखरपेरणी म्हणून शरद पवार हल्ली जाहीरपणे राहुल गांधींच्या नेतृत्वगुणांचे जाहीरपणे कौतुक करू लागलेत. पण पवारांच्या राष्ट्रवादीला राहुल गांधी नेमका कसा प्रतिसाद देतात, हे पाहणं औस्तुक्याचं ठरणार आहे. कारण राष्ट्रवादीमुळेच महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाची वाढ खुंटल्याची तक्रार दरबारी राजकारणातल्या काँग्रेस नेत्यांनी यापूर्वीच अनेकदा राहुल गांधींजवळ खासगीत बोलून दाखवलेली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 19, 2017 09:50 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...