कोलंबियामध्ये भूस्खलन; 254 जणांचा मृत्यू, शेकडो कुटुंब बेपत्ता

कोलंबियामध्ये भूस्खलन; 254 जणांचा मृत्यू, शेकडो कुटुंब बेपत्ता

कोलंबियान सरकारने या दुर्घटनेला राष्ट्रीय आपत्ती असल्याचं घोषित केलं आहे. घटनास्थळी लष्कराचे जवान आणि रेड क्रॉसची पथकं मदत कार्यासाठी दाखल झाली आहेत.

  • Share this:

02 एप्रिल :  दक्षिण अमेरिकेतल्या कोलंबियात मुसळधार पावसामुळे नदीला पूर आला आणि डोंगर खचून गावावर कोसळला. या दुर्घटनेत आतापर्यंत 254 जणांचा मृत्य झाला असून शेकडो कुटुंब बेपत्ता आहेत. या दुर्घटनेत अख्ख गाव नाहीसं झालं असून शेकडो जणं बेघर झालेत.

कोलंबियाच्या दक्षिण भागात अमेझॉन नदीच्या खोऱ्यात असलेलं मोकोआ हे 40 हजार लोक वसतीचं गाव. पण शुक्रवारी रात्री तुफान पाऊस झाला. त्या रात्री 130 मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली.

मुसळधार पावसामुळे मोकोआ नदीला पूर आला. या पुरामुळे रात्रीच्या अंधारात काळ कोसळावा तसा डोंगर खचला आणि चिखल-मातीच्या ढिगाऱ्याखाली हे गाव सापडलं. आता तिथे फक्त चिखल मोठ-मोठे दगडं, वाहून आलेली झाडं आणि गाड्यांचे सांगाडे दिसत आहेत. अख्ख गाव दिसेनासं झालं आहे.

कोलंबियान सरकारने ही दुर्घटना राष्ट्रीय आपत्ती असल्याचं घोषित केलं असून घटनास्थळी लष्कराचे जवान आणि रेड क्रॉसची पथकं मदत कार्यासाठी दाखल झाली आहेत. बचावकार्य सुरू आहे पण अनेक ठिकाणी 2 ते 3 फूट चिखल साठल्यामुळे त्यात मोठे अडथळे येतायेत.

कोलंबियात मुसळधार पाऊस सुरूच असून, अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. या दुर्घटनेत जखमी झालेल्या नागरिकांवर उपचार सुरू आहेत. तर, बेपत्ता नागरिकांचा शोध घेतला जात आहे.

दरम्यान, पुणे जिल्ह्यातील माळीण गावावर 30 जुलै 2014 दरड कोसळली होती. या दुर्घटनेत अख्ख गाव नाहीसं झालं. अशीच थरकाप उडवणारी घटना कोलंबियात घडली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 2, 2017 12:40 PM IST

ताज्या बातम्या