Home /News /news /

'...पण स्टिअरिंग माझ्याच हातात', उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीतील 5 मोठ्या गोष्टी

'...पण स्टिअरिंग माझ्याच हातात', उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीतील 5 मोठ्या गोष्टी

या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीतील मतभेद, भाजपचं ऑपरेशन लोटस यासह अनेक मुद्द्यांवर सविस्तर भाष्य केलं आहे.

    मुंबई, 26 जुलै : शिवसेना खासदार आणि दैनिक 'सामना'चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीतील मतभेद, भाजपचं ऑपरेशन लोटस यासह अनेक मुद्द्यांवर सविस्तर भाष्य केलं आहे. तसंच सरकार जरी तीन पक्षांचं असलं तरीही स्टेअरिंग माझ्याच हातात आहे, असं म्हणत मित्रपक्षांना सूचक इशाराही दिला आहे. 1. सरकारमध्ये कुरबुरी आहेत का? उद्धव ठाकरे म्हणाले... 'या तीन पक्षांतले जे प्रमुख पक्ष आहेत… शिवसेना आहेच… काँगेस आहे, राष्ट्रवादी आहे… त्यापैकी काँगेसचं असं म्हणणं आहे की, मुख्यमंत्री राष्ट्रवादीला झुकतं माप देताहेत,' या संजय राऊत यांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीबद्दल भाष्य केलं आहे. 'म्हणजे काय करतात? त्यांचा एक प्रेमळ आक्षेप सुरुवातीला होता, पण तो गैरसमज मी मध्ये भेटल्यानंतर दूर झालेला आहे आणि तो आक्षेप अगदी तीक्र नव्हता. शेवटी असं आहे, सगळेच जण निवडणुका लढवून निवडून येत असतात. जनतेच्या काही अपेक्षा त्यांच्याकडून असतात. म्हणून तर जनता त्यांना मत देते आणि त्या अपेक्षा आपण पूर्ण करू शकत नाही, असं जर कोणाला वाटत असेल तर त्यांची ती चूक आहे अशातला भाग नाहीय. तशा आशाअपेक्षा व्यक्त करणं हा गुन्हा नाहीय. तुम्ही म्हणता तसं सुरुवातीच्या काळात त्यांच्या मनात काही असेलही, पण माझ्याशी कुणी असे ठामपणाने बोलले नाही की, तुम्ही आम्हाला विचारत नाही. माझा पवारसाहेबांशी पण चांगला संवाद आहे. अगदी नित्यनियमाने नाही, पण कधीतरी मी सोनियाजींना फोन करत असतो,' असं उद्धव ठाकरे म्हणाले. 2. बुलेट ट्रेन बुलेट ट्रेनची गरज नाही असे आपणही म्हणाला होतात. शरद पवारही म्हणाले होते. बुलेट ट्रेनचा आपल्या राज्याला फायदा नसल्याने आपल्या राज्याने गुंतवणूक करणं योग्य नाही. तरीही महाराष्ट्रात साठ टक्के जमीन संपादन झालीय आतापर्यंत. त्यामुळे बुलेट ट्रेनचं नक्की भविष्य काय? – प्रत्येक गोष्टीची केवळ एकच बाजू नसते. अनेक बाजू असू शकतात. यात आपण स्थानिक लोकांचा विचार करणं फार महत्त्वाचं आहे. राज्य म्हणून बुलेट ट्रेनची आवश्यकता असेल तर मी म्हणेन, माझ्या मुंबई-नागपूरला जोडणारी बुलेट ट्रेन द्या. माझी राजधानी आणि उपराजधानी जोडणारी ट्रेन द्या. जेणेकरून विदर्भाच्या मनात कारण नसताना जो दुरावा करून दिला जाण्याचा प्रयत्न केला जातो, तो दुरावा नष्ट होईल. जसा समृद्धी महामार्ग होतोय, त्याला आता शिवसेनाप्रमुखांचं नाव दिलं आहे. तसंच मुंबई-नागपूर जोडणारी बुलेट ट्रेन द्या. मला आनंद होईल. मुंबई-सूरत बुलेट ट्रेनचं काय… – त्याची आता काही आवश्यकता नाही, पण भूसंपादन करताना ज्यांचा विरोध झालाय त्यांच्या मागे शिवसेना… शिवसेना पक्ष म्हणून ठाम उभी आहे. सरकार म्हणून जे काही करायचंय तो निर्णय आपण घेऊच, पण ज्यांचा ज्यांचा विरोध आहे त्यांच्या मागे शिवसेना आहे. आता काही जणांनी स्वतःहून जमीन दिली असेल तर काय करणार… बुलेट ट्रेन होणार की नाही? असा माझा थेट प्रश्न आहे. कारण त्यात राज्य सरकारची गुंतवणूक आहे… – सांगतो. आधी मी जमिनीचा विषय घेतो. ज्यांनी स्वतःहून जमीन दिली, त्यांचा व्यवहार आतापर्यंत पूर्ण झाला असेल. पण ग्रामीण भागातील तळागाळातील लोकांचा अजूनही विरोध आहे. त्यांच्यामागे शिवसेना ठाम उभी आहे. जसा नाणारचा विषय आहे. नाणारचासुद्धा सरकारने करार केलाच होता, पण तो जनतेने हाणून पाडला. आम्ही शिवसेना म्हणून जनतेच्या सोबत उभे राहिलो. आता सगळय़ांना मान्य असेल तर सरकार म्हणून करू करार. पण मधले दोन-तीन महिने आपले कोरोनामध्ये गेले. त्यामुळे सगळे विषय मागे पडले. बुलेट ट्रेनचे काय? – बुलेट ट्रेन जरी असली तरी बुलेट ट्रेनचा विषय बॅकसीटला गेला, त्यावर काही चर्चा झालेली नाही किंवा कोणी विचारपूसही करत नाहीय. यावरही आता सरकार म्हणून निर्णय घेताना राज्याच्या हिताचा विचार करूनच निर्णय घ्यावा लागतो. माझी भूमिका वैयक्तिक वेगळी असू शकते, जी अर्थातच जनतेसोबत राहण्याची आहे, पण राज्याच्या हिताचा विषय येईल, त्या वेळी यात हित आहे की अहित आहे याचा विचार करावा लागेल. माझं मत असं आहे की, सगळय़ांना एकत्र बोलावून आपल्याला हा निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. सरकारने अडीचशे, तीनशे कोटी रुपये का द्यावेत? असा प्रश्न आपण सगळय़ांनीच उपस्थित केला होता… – नक्कीच. तो माझा मुद्दा आजही कायम आहे. पण आता सरकार म्हणून आम्ही असताना या ‘का?’ची सोडवणूक करण्याची गरज आहे. ‘का?’ला काही कारणं आहेत का? खरंच यातून काही फायदा होणार आहे का दाखवा आम्हाला. काय होणार फायदा? किती मुंबईतून आणि सूरतमधून ये-जा होणार आहे? किती आर्थिक घडामोड होणार आहे? हे सरकार म्हणून मला माहिती मिळू द्या. जर पटली तर जनतेसमोर ठेवतो, पण एखादी भूमिका मी एकतर्फी घेतली असेन आणि आता अयोग्य वाटत असेल तर तो प्रकल्प मी रद्द करेन. 3. मंत्रालय काही मंत्र्यांचा असा आरोप आहे की, मंत्रालयाचं सचिवालय झालंय. म्हणजे पूर्वीच्या सचिवालयाचं मंत्रालय का झालं तर हे राज्य नोकरशाही चालवत नाही; तर मंत्री चालवतात. – म्हणजे काय झालंय? म्हणजे नोकरशाहीच राज्य चालवतेय आणि मंत्र्यांचंच ऐकलं जात नाही. – नाही. तसं बिल्कुल नाहीय. आणि समजा क्षणभर ते खरं मानलं तर धारावीचं कौतुक, राज्याचं कौतुक, सर्वोत्तम मुख्यमंत्री हे कौतुक होतंय. ते कौतुकास्पद काम नोकरशाहीने सरकारचं न ऐकता केलं आहे का? निर्णय घेण्याचा अधिकार सरकारचा आहे हे मान्य, पण अंमलबजावणी सचिवांकडून करून घ्यायची असते. शेवटी यंत्रणा राबवण्याची हिंमत तुमच्यात पाहिजे. प्रत्येक ठिकाणी ऑर्डरही तुम्हीच देणार आणि कामही तुम्हीच करणार, तर हे असं गव्हर्नमेंट असू शकत नाही. 4. ऑपरेशन लोटस ‘ऑपरेशन लोटस’ महाराष्ट्रात यशस्वी होणार नाही… – करून बघा ना. मी भाकीत कसे करणार? तुम्ही करून बघा. फोडाफोडी करून बघा. एक महत्त्वाचा मुद्दा काय की, असा कोणताही विरोधी पक्षांतला नेता दाखवा, जो दुसऱया पक्षात जाऊन सर्वोच्च पदावर गेलाय, मुख्यमंत्री झालाय. तुम्हाला तुमच्या पक्षात असं काय मिळत नाहीय की, तुम्ही दुसऱया पक्षात जाताय. कित्येक ठिकाणी अशी उदाहरणं आहेत, अशी फोडाफोडी होते त्यामागे ‘वापरा आणि फेकून द्या’ ही नीती सर्वांनी अवलंबली आहे. पालख्या वाहण्याचं राजकारण आहे. – हे आपल्याकडचं राजकारण आहे. त्यामुळे दुसऱया पक्षाने केवळ ‘वापरा आणि फेकून द्या’ करण्यासाठी आपला वापर करू द्यायचा की आपण आपल्या पक्षात ठामपणाने काम करत राहायचं हे प्रत्येकाने ठरवावं. ठीक आहे, कदाचित एखादी व्यक्ती किंवा नेता हा आपल्या पक्षात आपल्यावर अन्याय करू शकत असेल किंवा करत असेल, पण म्हणून तुम्ही त्या पक्षाचा त्याग करून दुसऱयाची पालखी वाहणे…हे करायचं. शेवटी पालखीच वाहणार ना, की पालखीत बसणार आहात? मिरवायला… स्वार्थापोटी अशी पक्षांतरं केली जातात. – हो पण, पालखीत तुम्हाला बसवायला कोणी तयार आहेत का? असतील तर अवश्य जा. मी कुणाच्याही उज्ज्वल भवितव्याच्या आड येऊ शकत नाही. येत नाही. जर तुम्हाला दुसऱया पक्षात पालखीत बसण्याचं स्थान मिळत असेल, जरूर जाऊन पालखीत बसा, पण पालखीचे भोई होण्यासाठी जाऊ नका. म्हणजे काय तर नुसती वरात चाललीय आणि तुमच्या खांद्यावर पालखीचं ओझं आहे. एवढेच तुम्हाला समाधान आहे. पालखीचं ओझं व्हायचं असेल तर जाऊ शकता. किती असे पक्षांतर केलेले नेते दुसऱया पक्षात जाऊन मोठे झाले? एक ठराविक काळ गेल्यानंतर त्यांचीही कारकीर्द कापली जाते. जो मूळ गाभा असतो तुमच्या पक्षाच्या विचाराचा तो महत्त्वाचा. 5. राम मंदिर राममंदिर हा आपल्या जिव्हाळय़ाचा विषय आहे. शिवसेनेने राममंदिराचा मार्ग मोकळा केला हे इतिहास सांगतोय. आपणही अयोध्येला गेला होतात… मुख्यमंत्री नसताना. – मुख्यमंत्री झाल्यावरही गेलो… म्हणजे आपण आपल्या भूमिकेत कोणताही बदल केलेला नाही. – होणारही नाही! राममंदिराचे भूमिपूजन 5 ऑगस्टला होईल अशी तारीख जाहीर झाली आहे. आपण त्या भूमिपूजनाला जाणार का? – नुसतं ‘हो’ किंवा ‘नाही’ असं उत्तर द्यायचं तर मी व्यक्ती म्हणून काही उत्तर देऊ शकेन, पण आपण जसं म्हणालात की, राममंदिराच्या लढय़ात शिवसेनेच्या भूमिकेची इतिहासाने दखल घेतली आहे. मी मुख्यमंत्री नव्हतो त्याही वेळेला राममंदिरात गेलो. किंबहुना योगायोगावर माझी श्रद्धा आहे. माझी भावना हेच सांगते की, नोव्हेंबर 18 मध्ये पहिल्यांदा मी राममंदिरात गेलो होतो, आपण सोबत होतात. शिवनेरीवरची म्हणजे शिवजन्मभूमीची एक मूठ माती मी घेऊन गेलो, त्यानंतर या विषयाला खूप चालना मिळाली. त्याआधी हा विषय थंड पडला होता. कोणी काही विषयच काढत नव्हता. शिवसेनेने सुरुवात केली. उशीर लागत असेल तर कायदा बनवा, वटहुकूम काढा, वाट्टेल ते करा, पण राममंदिर बनवा. ही आपलीच मागणी होती… – ही शिवसेनेची मागणी होती. त्यासाठी आपण अयोध्येला गेलो. तुम्ही योगायोग म्हणा, काही म्हणा, ज्या 18 च्या नोव्हेंबरमध्ये मी तिथे गेलो, त्याच्या पुढच्या नोव्हेंबरमध्ये राममंदिराचा प्रश्न सुटला आणि मी मुख्यमंत्री झालो. ही माझी श्रद्धा आहे. ज्याला कोणाला अंधश्रद्धा म्हणायचं असेल त्याने म्हणावे, पण ही माझी श्रद्धा आहे आणि असणारच. मुद्दा काय येतो की, सध्या सर्वत्र कोरोनाचं थैमान आहे. मी ठीक आहे. मी म्हणेन, मी अयोध्येला जाणारच. मी मुख्यमंत्री आहे, पण मुख्यमंत्री नव्हतो तेव्हाही मला तिथे मानपान… सगळं मिळतं. मिळालं. तेही शिवसेनाप्रमुख आणि त्यांचा मुलगा म्हणून. ती पुण्याई माझ्याकडे आहेच. आता तर मुख्यमंत्री आहे. मला बंदोबस्त मिळेल, मी व्यवस्थित जाईन. मी पूजाअर्चा करून किंवा त्या कार्यक्रमात सहभागी होऊन परत येईन, पण हे मंदिर सर्वसामान्य मंदिर नाहीय. एखाद्या गावात मंदिर बनवायचं झालं तरी गावकरी एकदिलाने एकत्र येतात, त्या गावासाठी ते अयोध्येसारखेच राममंदिर असते. ते अनेक लोक अयोध्येला जाऊ शकत नाहीत, त्यांच्यासाठी गावातलं ते मंदिर महत्त्वाचं असतं. अनेक सभासमारंभ, लग्नसोहळे त्या देवाच्या साक्षीने होतात गावात. अयोध्येतील मंदिर म्हणजे संघर्ष आहे. – मग हा राममंदिराचा मुद्दा आहे, ज्याला एका लढय़ाची पार्श्वभूमी आहे. विचित्र पार्श्वभूमी आहे. ज्याच्यावर बाबराने आक्रमण करून मशीद बांधली होती, त्या ठिकाणी पुन्हा आपण मंदिर उभं करतोय. केवळ हिंदुस्थानच्या हिंदूंचं नाही तर, जागतिक कुतूहलाचा विषय आहे. आज आपल्याकडे कोरोनाचं संकट असताना सर्व मंदिरांत जाण्या-येण्याला बंदी आहे. मी अयोध्येला जाऊन येईन, पण लाखो रामभक्त जे उपस्थित राहू इच्छित असतील, त्यांचं तुम्ही काय करणार? त्यांना तुम्ही अडवणार की त्यांना येऊ देणार? त्यांच्या कळत नकळत कोरोनाचा प्रसार होऊ देणार का? कारण हा आनंदाचा क्षण आहे. अनेकांना तिथे जाण्याची इच्छा असणार. नाहीतर तुम्ही व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ई-भूमिपूजन करू शकता. तुम्हाला आठवत असेल की, मुख्यमंत्री म्हणून आपण जेव्हा अयोध्येला गेलात तेव्हा शरयूच्या तीरावर आपल्याला आरती करण्यापासून थांबवलं होतं. कारण कोरोनाचा प्रसार होण्याची भीती होती… – हो, आरती करता आली नव्हती. थांबवलं होतं. त्या वेळी कोरोनाची सुरुवात होती. – बरोबर आहे. त्याच्या आधी गेलो होतो तेव्हा शरयूचा काठ कसा होता… हो, त्याचं स्वरूप भव्य असंच होतं. – खच्चून गर्दी होती. हालचाल करायला जागा नव्हती. राममंदिर हा भावनेचा प्रश्न आहे. लोक भावनेनं त्या विषयाला जोडले गेले आहेत. त्यांना तुम्ही थांबवणार कसे. माझं येणं-जाणं मी करीन. मी मुख्यमंत्री असल्याने मी जाऊन येईन. अजूनही अधिकृत तारीख आलेली नाही. अधिकृत कार्यक्रम कसा असेल त्याची कल्पना नाहीय. तो कार्यक्रम आल्यानंतर आपण ते ठरवू, पण लाखो लोकांची जी भावना आहे की तिकडे उपस्थित राहावं. त्यांना तुम्ही कसं अडवणार? कारण तिकडे तो शरयूचा काठच महत्त्वाचा आहे. कारण राममंदिराचं आंदोलन चाललं होतं तेव्हा शरयूसुद्धा लाल झाली होती, रामभक्तांच्या रक्ताने. अशा लाखो, करोडो लोकांच्या भावना निगडित आहेत. तुम्ही त्या विषयाशी भावनेनं बांधलेले आहात… – आहेच. कारण मी दोन ते तीन वेळा अयोध्येत गेलोय. माझा अनुभव सांगतो. मुळात मी अंधश्रद्धाळू नाही हे लक्षात घ्या. माझे आजोबा, माझे वडील यांची स्पष्ट मते होती. आजोबांची मतं मला चांगली माहीत आहेत. आजोबा माझे नास्तिक नव्हते. त्यांची देवावर आणि देवीवर श्रद्धा होतीच. माझे वडील अंधश्रद्धाळू नव्हते. श्रद्धा आणि अंधश्रद्धेत एक पुसटशी लाइन आहे. ती फार महत्त्वाची आहे. त्या भावनेनेच मी सांगतो, आतापर्यंत मी तीन वेळा अयोध्येला गेलो, पण तिथल्या गाभाऱयासमोर उभं राहिल्यानंतर मला जो अनुभव आला तो अद्भुत होता. इतरांना तसा अनुभव आला असेलही, मी नाही म्हणत नाही. त्यामुळे या विषयावर माझ्याशी कोणी वाद घालू नये किंवा शिकवू नये.
    Published by:Akshay Shitole
    First published:

    Tags: BJP, Congress, NCP, Shivsena, Uddhav thackeray

    पुढील बातम्या