नाशिक, 19 एप्रिल : महाराष्ट्रपुढे कोरोना नावाचे संकट दिवसेंदिवस आणखी वाढत चालले आहे. कोरोनाशी दोन हात करण्यासाठी राज्य सरकारकडून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांचं एका संकल्पनेबद्दल कौतुक केलं होतं. त्याबद्दलचा व्हिडिओ नाशिक पोलिसांनी ट्वीट केला आहे.
कोरोना व्हायरसचा संसर्ग वाढू नये म्हणून सर्वत्र खबरदारी घेतली जात आहे. नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील आपल्या घरी कोरोनाला दूर ठेवण्यासाठी ACP संकल्पना वापरत आहे. नाशिकचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्या संकल्पनेतून ACP ही मोहीम सुरू केली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कडून नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या ACP संकल्पनेच कौतुक...काय आहे ACP संकल्पना पहा व्हिडीओ मध्येhttps://t.co/IHFoUG6srQ
बाहेरून घरात आल्यावर कशी खबरदारी घ्यायची याबद्दलची ही मोहिम आहे. नांगरे पाटील जेव्हा आपल्या घरी पोहोचता तेव्हा त्यांची दोन्ही मुलं त्यांना दारावर थांबवता, आणि 'डॅडी, तुम्ही बाहेर सीपी असाल पण आम्ही घरातले ACP आहोत' असं म्हणत नांगरे पाटील यांना मोबाईल, हात सॅनिटायझर करायला सांगता. एवढंच नाहीतर घरात प्रवेश केल्यावर सर्वात आधी बाथरूममध्ये जाण्याची 'ऑर्डर'ही नांगरे पाटलांना दिली जाते.
ACP म्हणजे anti corona police असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे, घरातील व्यक्तींनी ACP होऊन कोरोना लढ्यात आपला हातभार लावायचा आहे. नांगरे पाटील यांनी हा व्हिडिओ आपल्या फेसबुकवर पोस्ट केला होता. त्यानंतर काही वेळात हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. त्यांच्या याच मोहिमेचं राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कौतुक केलं आहे. तुम्ही सुद्धा या मोहिमेत सहभागी होऊ शकतं, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.