मुंबई,ता.04 मे : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून भुजबळांना दोन वर्षांपूर्वी अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी 9 वेळी जामीनासाठी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते मात्र त्यांना यश येत नव्हतं.
शेवटी आज त्यांना जामीन मिळाल्यानं मोठा दिलासा मिळाला आहे. 5 लाखांच्या जात मुचलक्यावर न्यायालयानं त्यांना जामीन दिला आहे. सर्व प्रक्रिया पूर्ण झाली तर सूर्यास्ताच्या आधी छगन भुजबळ जेल बाहेर येतील असं त्यांच्या वकिलांनी सांगितलं.
मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्ती देशमुख यांच्या खंडपीठासमोर गुरूवारी दिर्घकाळ जामीनावर सुनावणी झाली. भुजबळांचे वकील सुजय काटावाला यांनी जोरदार युक्तीवाद करत जामीनाची मागणी केली. भुजबळांनी चौकशीत पूर्ण सहकार्य केलं असून यापुढही सहकार्य करतील असं आश्वासन त्यांनी न्यायालयाला दिलं. छगन भुजबळ यांची प्रकृती ठिक नसल्याचं कारण त्यांनी दिलं.