आयसीआयसीआय बँकेच्या सीईओ चंदा कोचर सक्तीच्या रजेवर

व्हिडिओकाॅन कंपनीला कर्ज देताना कोचर यांनी झुकतं माप दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.

व्हिडिओकाॅन कंपनीला कर्ज देताना कोचर यांनी झुकतं माप दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.

  • Share this:
मुंबई,18 जून : आयसीआयसीआय बँकेच्या हंगामी प्रमुखपदी संदीप बक्षी यांची निवड करण्यात आली आहे. बँकेच्या सध्याच्या सीईओ चंदा कोचर यांची व्हीडीओकाॅन प्रकरणी चौकशी होणार आहे. ही चौकशी पूर्ण होईपर्यंत कोचर अनिश्चित काळासाठी रजेवर जात असल्यानं बक्षी यांची बँकेचे हंगामी प्रमुख म्हणून निवड करण्यात आली आहे. बक्षी यांची पूर्णवेळ संचालक आणि सीओओ या पदांवर नियुक्ती करण्यात आली आहे. बक्षी यांच्यासाठी चीफ आॅपरेटिंग आॅफिसर हे पद तयार करण्यात आलं असून उद्यापासून ते या पदावर रुजू होतील. ५ वर्षांसाठी हे पद त्यांना देण्यात आलं आहे. बक्षी हे सध्या आयसीआयसीआय  प्रुडेंशियलचे एमडी आणि सीईओ आहेत. कोचर यांच्या अनुपस्थितीत बक्षी हे बँकेच्या संचालक मंडळाला उत्तरदायी असतील. चंदा कोचर २००९ पासून या आयसीआयसीआय बँकेच्या सीईओपदी आहेत. व्हिडिओकाॅन कंपनीला कर्ज देताना कोचर यांनी झुकतं माप दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. कोचर याचे पती दीपक कोचर यांच्या अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रातील कंपनीत व्हिडिओकाॅनच्या संस्थापकांनी गुंतवणूक केली आणि त्यामुळे व्हिडिओकाॅनला कर्ज मिळण्यात झुकतं माप दिलं गेलं असल्याचा आरोप एका व्हीसलब्लोअरनं केला होता. सुरुवातीला बँक संचालक मंडळानं कोचर यांची बाजू घेत आरोप फेटाळले होते. पण त्यानंतर गेल्या महिन्यात बँकेनं अंतर्गत चौकशीची घोषणा केली. माजी सुप्रीम कोर्ट न्यायमूर्ती बी एन श्रीकृष्ण यांची चौकशी करण्यासाठी बँकेनं नियुक्ती केली आहे. त्यांची चौकशी पूर्ण होईपर्यंत रजेवर जाण्याचा निर्णय कोचर यांनी घेतला आहे.
First published: