मुंबई, 19 ऑक्टोबर : सण, उत्सव, समारंभ म्हटलं की लोकांचा उत्साह द्विगुणीत होतो. लोकं नवनवीन वस्तू विकत घेतात. तसंच या दिवसांत अनेकजण आकर्षक दिसण्यालाही अधिक प्राधान्य देतात. पुरुषांपेक्षा महिलांचा आकर्षक दिसण्याकडे कल अधिक असतो. महिला ब्युटीपार्लरमध्ये जाऊन आकर्षक दिसण्यासाठी विविध गोष्टी करतात. कुणी भुवया कोरून घेतात, कुणी त्वचेसाठी टोनिंग वगैरे करतात. कुणी केस आकर्षक दिसावेत यासाठी हेअर स्ट्रेटनर किंवा हिटिंग टूल्स वापरतात. पण हेअर स्ट्रेटनरच्या वापरामुळे तुम्हाला गंभीर समस्यांना तोंड द्यावं लागू शकतं. कदाचित कॅन्सर सारख्या दुर्धर रोगाचाही सामना करावा लागू शकतो. ही धक्कादायक अशीच बाब आहे. जाणून घेऊयात याबद्दलची विस्तृत माहिती. याबद्दलची माहिती देणारं वृत्त ‘टीव्ही 9 हिंदी’ने दिलंय.
सर्वसाधारणपणे केसाचं सौंदर्य वाढवण्यासाठी हेअर स्ट्रेटनरचा वापर होतोच. अमेरिकेच्या नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ हेल्थने याबाबत धक्कादायक खुलासा केलाय. त्यांच्या रिपोर्टनुसार हेअर स्ट्रेटनरमुळे शरीराला कॅन्सरचा धोका संभवतो. त्यामुळे हेअर स्ट्रेटनर शरीरासाठी कसं अपायकारक ठरतं हे जाणून घेऊ.
केसांची होते मोठ्या प्रमाणात हानी
हेअर स्ट्रेटनरमुळे किंवा इतर कोणत्याही हिटिंग टूलमुळे केस निर्जीव आणि कोरडे होतात. हेअर स्ट्रेटनरच्या वापरामुळे केसांमध्ये थोडासा चिकटपणा येतो. हा चिकटपणा केमिकलमुळेच येतो. पूर्वी स्त्रिया इस्त्री गरम करून त्याच्या साह्याने केसांचे स्ट्रेटनिंग करत. केस स्ट्रेट करण्याची ही योग्य पद्धत होती. परंतु, ज्या स्त्रिया वारंवार रिबॉंडिंग करतात, त्यांचे केस काही काळाने निर्जीव, कोरडे होतात.
महिला वर्ग हेअर स्ट्रेटनरचा अधिक वापर करतो. अमेरिकेच्या नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ हेल्थच्या रिपोर्टनुसार ज्या स्त्रिया हेअर स्ट्रेटनचा वापर अधिक करतात, त्यांना गर्भाशयाच्या कॅन्सरचा धोका वाढतो. रिपोर्टनुसार असं म्हटलंय, की स्ट्रेटनरमध्ये केमिकल असतं. स्ट्रेटनरच्या वापरामुळे त्यातल्या केमिकलचा त्वचा आणि केसांशी थेट संबंध येतो. त्यामुळे हे केमिकल आपल्या शरीरात जातं. यामुळे शरीरावर परिणाम होतोच, पण त्याचे परिणाम लगेच दिसून येत नाहीत. ही निश्चितच एक गंभीर समस्या आहे.
त्वचेवरही होतो याचा विपरित परिणाम
हेअर स्ट्रेटनरमधील केमिकलमुळे त्चचेवरही गंभीर परिणाम होतो. तज्ञांच्या मते, त्वचेची आग होत असल्यासारखं वाटू शकते. तसंच संशोधनात असं म्हटलय, की त्वचेची होणारी आग हे कॅन्सरपूर्वीचं अगदी सुरुवातीचं लक्षण असू शकते. या रिसर्चनुसार हेअर स्ट्रेटनरमुळे तब्येतीला धोका दिसून आल्याचे म्हटलंय. परंतु, हेअर ब्लीच, हायलाईटस यांचा गर्भाशयाच्या कॅन्सरशी कुठलाच संबंध नसल्याचे उघड झालं आहे.
अनेकजण मार्केटमधली विविध कॉस्मेटिक्स प्रॉडक्ट सर्रास वापरतात. पण कॉस्मेटिक्समुळे होणार्या गंभीर परिणामांची त्यांना पुरेशी माहिती नसते. यासाठीच कोणतेही कॉस्मेटिक प्रॉडक्ट वापरण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घेणं हितकारक ठरेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cancer, Health, Woman hair