नवी दिल्ली, 23 जुलै : देशात जमावाकडून होणाऱ्या हत्यांच्या घटना वाढत असल्याची गंभीर दखल सरकारने घेतली आहे. अशा हिंसक घटनांविरोधात उपाययोजना करण्यासाठी केंद्र सरकारने एक उच्चस्तरीय समिती नेमण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय गृहसचिव हे या समितीचं नेतृत्व करणार आहेत. यात विविध खात्यांच्या ज्येष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश असून या समितीला चार आढवड्यात आपला अहवाल सादर करावा लागणार आहे.
या समितीबरोबरच केंद्रानं एका मंत्री गटाची स्थापनाही केली आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखाली हा गट काम करेल. उच्चस्तरीय समिती या मंत्रीगटाला आपला अहवाल देणार असून हा गट त्याचा अभ्यास करून पंतप्रधानांना शिफारशी सूचवणार आहे. त्यानंतर सरकार अशा घटनांविरोधातलं धोरण जाहीर होण्याच शक्यता आहे.
गोरक्षेच्या नावावर गेल्या काही वर्षांमध्ये जमावाने अनेकांच्या हत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. तर मुलं पळविणारी टोळी आल्याच्या अफवेनेही देशात 30 पेक्षा जास्त बळी गेलेत. यावरून राजकारणही होत आहे. गोरक्षेच्या नावावरून होणाऱ्या हिंसाचाराला केंद्राचा पाठिंबा असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. तर या गुन्हेगारी स्वरूपाच्या घटना असून त्या राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न आहे. त्यावर राज्य सरकारांनी कडक कारवाई करावी असा युक्तिवाद सरकारचा असतो.
याच मुद्यावरून सोमवारी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हाच का तुमचा क्रूर न्यू इंडिया अशी टीका केली तर राहुल हे नफरत के सौदागर आहेत असा पलटवार पीयुष गोयल यांनी केला होता.