सिंधुदुर्ग, 22 एप्रिल : लॉकडाउनच्या काळात निवारा केंद्रात राहाव्या लागणाऱ्या परराज्यातल्या मजुरांना आपण एकटे नसून स्वत:च्याच कुटुंबात आहोत याचा अनुभव देणारी सुखद घटना सिंधुदुर्गात घडली आहे. कुडाळच्या बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेनंं या मजुरांपैकी एकाचा वाढदिवस साजरा तर केलाच पण लॉकडाउनच्या दिवसात या सर्व मजुरांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देत त्यांचा आत्मविश्वास वाढवला.
मध्यप्रदेशच्या बबलू जैस्वालच्या स्वप्नात देखील आलं नसेल कधी की, त्याचा वाढदिवस कुडाळच्या पडतेवाडी शाळेत असा निवारा केंद्रात साजरा होईल. बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेचे कर्मचारी अत्यंत आपुलकीने आपल्याला ओवाळत आहे, हे पाहून बबलूला आपण एकटे नसून जणू आपल्या कुटुंबासोबतच आहोत याचा अनुभव आला.
बबलू ट्रक ड्रायव्हर आहे. लॉकडाउन झाल्यावर मध्यप्रदेशातल्या आपल्या गावी जाण्यासाठी तो इतर काही कामगारांसोबत मडगावहून चालत निघाला.
सिंधुदुर्गात आल्यावर त्या सर्वांना पोलिसांनी कुडाळच्या निवारा केंद्रात दाखल केलं. त्याच्यासारखेच गोव्याहून राजस्थानला गुजरातकडे चालत निघालेले मजूर या निवारा केंद्रात आहेत. या सगळ्यांसोबत वाढदिवस साजरा झाल्यामुळे त्याला आपण घरीच आहोत असं वाटलं. तो म्हणाला, 'अच्छा हुआ, जो भी हुआ है, हमारे लिये व्यवस्था अच्छी किया है. जैसे घर का था वैसे यहा भी है. हमारे लिये सब एक है. घर की याद नही आयी.'
हेही वाचा -उद्धव ठाकरेंच्या आमदार नियुक्तीला हरकत नाही पण.., चंद्रकांत पाटलांचा सवाल
लॉकडाउन जाहीर झाल्यावर खायचं काय आणि जगायचं कसं या विवचनेतून गोव्यात अडकलेले बबलू सारखे अनेक कामगार चक्क चालत आपापल्या राज्यांकडे निघाले. त्यातले काही जण सध्या सिंधुदुर्गातील या निवारा केंद्रात आहेत. बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेने त्यांचा एकटेपणा घालवण्यासाठी त्यांच्या समुपदेशनासोबतच त्यांना मेणबत्ती आणि अगरबत्ती बनवण्याचं प्रशिक्षणही दिलंय.
या वस्तूंच्या विक्रीतून येणारे पैसे लॉकडाउन संपल्यावर त्यांना परतीच्या प्रवासासाठी देण्यात येणार आहेत. कौशल्य विकासाच्या प्रशिक्षणाला सुरुवातीला रिस्पॉन्स थोडा कमी होता. पण, दुसऱ्या दिवसापासून त्यांचा रिस्पॉन्स एवढा वाढला की, रात्री अकरा वाजेपर्यंत मेणबत्ती बनवत होते. त्यांनी आतापर्यंत जवळपास पाच ते सहा हजार मेणबत्त्या बनवलेल्या आहेत. त्या मेणबत्त्या विकून त्याचे जे पैसे मिळतील ते त्यांना परतीच्या प्रवासासाठी देण्यात येणार आहेत.
बॅ . नाथ पै शिक्षण संस्थेने निवारा केंद्रातल्या या मजुरांना केलेल्या समुपदेशनानंतर आणि त्याना दिलेल्या प्रशिक्षणानंतर त्यांचा उत्साह वाढला आहे आणि घरची आठवण येण्यापेक्षा तणावमुक्त झाले आहेत.
हेही वाचा -गर्भवती महिला सासूसोबत मध्यरात्री चालत निघाली रुग्णालयात, मदतीला धावले पोलीस
लॉकडाउनमुळे अशा हजारो जणांचा सध्या रोजगार गेला आहे. या वैफल्यात दिवस काढताना रोज कमावणारे त्यांचे हात त्याना स्वस्थ बसू देत नाही. म्हणूनच बबलूच्या नव्या मित्रांनी त्याच्या वाढदिवसाला लावलेली एकेक ज्योत हेच सांगतेय की, आम्ही अजूनही हिंमत सोडलेली नाही.
संपादन - सचिन साळवे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.