गेला संवाद कुणीकडे ?

गेला संवाद कुणीकडे ?

चर्चेला, वाटाघाटींना, तडजोडीला पर्याय नाही. नसतोच. माणूस आणि अन्य प्राणी यांच्यातला एक मुख्य फरक म्हणजे समन्वय साधण्याची आणि सहकार्याची क्षमता.

  • Share this:

अमेय चुंभळे,

ब्रिटनमध्ये सध्या ब्रेक्झिटवरून जो वादंग सुरू आहे, त्यावरून माणसाची संवादशक्ती कशी कमी झाली आहे, हे पुन्हा सिद्ध झालं. इस्रायलचे जगप्रसिद्ध लेखक आणि इतिहासकार युवाल नोआ हरारी आपल्या ‘सेपिअन्स’ पुस्तकात जे म्हणतात ते मला पटतं – माणूस आणि अन्य प्राणी यांच्यातला एक मुख्य फरक म्हणजे समन्वय साधण्याची आणि सहकार्याची क्षमता. म्हणूनच आपण कंपनी चालवतो किंवा एका क्रिकेट टीममध्ये ११ जण खेळू शकतात.

पण राजकीय आणि सामाजिक मुद्द्यांमध्ये हरारींचा सिद्धांत गैरलागू होत चालला आहे का ? ब्रेक्झिटकडे येऊच पण या मुद्द्याबाबत माझी सर्वात ठळक आठवण एम. करुणानिधींच्या निधनानंतरची. खरंतर, वयानं ज्येष्ठ असा हा लोकनेता. एका राज्याचा अनेकदा मुख्यमंत्री राहिलेला. पण त्यांना चेन्नईच्या मरीना बीचवर दफन करायचं की नाही, याबाबत करुणानिधींचा पक्ष आणि सत्ताधारी पक्षात एकमत होऊ शकलं नाही. मध्यरात्रीपर्यंत हायकोर्ट सुरू होतं.

एका मृत व्यक्तीचा अंत्यविधी कुठे करायचा हेही संवादानं न ठरू शकण्याइतपत समाजाच संवाद तुटला आहे. अधिक महत्व प्राप्त झालंय ते मुद्द्यांना, ते मुद्दे मांडणाऱ्यांना आणि त्यांच्या अहंकाराला. मला अनेकदा असं वाटतं, की हल्ली समस्या सोडवण्यापेक्षा त्याच्यावर अधिकाधिक भांडणं हाच हेतू बनला आहे. आणि त्याला समाजाची मान्यता मिळाली आहे.

नाहीतर, प्रत्येक अधिवेशनात अत्यल्प कामकाज होऊनही, आणि बहिष्कार, राडे, रुसवेफुगवे आणि कामकाज तहकूब होण्यातच अधिकाधिक वेळ जाऊनही हा मुद्दा फारसा मुख्य प्रवाहात येत नाही. खरंतर, विरोधकांना एखादा मुद्दा किंवा कलम पटत नसेल, तर त्यांची समजूत काढणं, त्यासाठी नवनवे प्रयत्न करणं हे सत्ताधाऱ्यांचं काम नाही का ? पण पंतप्रधान मोदी आणि सोनिया गांधींमधून तर विस्तव जात नाही. दोघं बसून महत्वाच्या मुद्द्यावर चर्चा करत आहेत, हे चित्र पहायला मिळणं तर दूरच.

संसद या शब्दातच संवाद येत नाही का? बैठक, परिषद, अधिवेशन, सभा... सर्व शब्द सुंदर आणि भारदस्त. आणि बातम्यांमध्ये वारंवार येणारे. पण या बातम्या करताना सतत जाणवतं की या सगळ्यामागचा हेतू क्वचितच साध्य होतो. 30 ते 40 वर्षांपूर्वी आमची पीढी अस्तित्वात नव्हती. पण वाचून-ऐकूण जाणवतं की तेव्हा इथका विसंवाद नव्हता.

हल्ली सोसायटीची मीटिंग असो, लहान मुलांच्या भांडणात (उगाच) मोठ्यांनी पडल्यावर त्यांचे वाद असोत किंवा राज्याचं अधिवेशन असो; माझा मुद्दा कसा खरा, उत्तम आणि सर्वात महत्वाचा, हे पटवून देण्यातच बव्हंशी लोक मग्न असतात. पण मीटिंग कशासाठी बोलावली आहे, तिचा अजेंडा काय... हे दूरच राहतं. आणि म्हणून, मुद्दे सुटत नाहीत. चिघळतात.

माझ्यामते, याची कारणं उमगणं सोपं हे. माझ्यामते पहिलं कारण – माणूस अधिकाधिक आत्मकेंद्री होणे. दुसरं – बालपणापासूनच, दुसऱ्याचं ऐकून घेणं म्हणजे नेमकं काय आणि कसं, हे दाखवण्यात पालकांचा भर नसणे, तिसरं – प्रत्येक छोटा वाद म्हणजे जिंकण्याची संधी असलेलं तिसरं महायुद्ध अशा आवेशात वाद घालणे आणि चौथं – समोरच्याला हारवून किंवा नुकसान करूनच माझी प्रगती होणार आहे, यावर समाजाचा दृढ विश्वास.

मी जजमेंटल होऊ इच्छित नाही, पण आज १९ ते २५ वयोगटातल्या तरुणांकडे पाहिलं, की असं वाटतं या सर्वांनाच “मी कुणीतरी मोठा” हे फीलिंग घेऊनच हे २४ तास वावरत असतात. सेल्फी इंस्टाग्रामवर अपलोड करून लाईक्स मिळवणे, यातून फक्त समाधान नाही तर आभासी सिलेब्रिटी स्टेटसही प्राप्त होतंय.

ब्रेक्झिटवर तर ब्रिटनसारख्या एकेकाळची महासत्ता असलेला आणि आताही विकसित अशा देशाचं भवितव्य अवलंबून आहे. चारच दिवसांपूर्वी बँक ऑफ इंग्लंडनं इशारा दिला – योग्य करार केल्याविनाच ब्रिटन बाहेर पडला तर शतकाहून अधिक काळात आली नाही अशी मंदी येईल. पण त्याकडे पाहतंय कोण ? ब्रिटनमधले बहुतेक सर्वच राजकारणी आपली पोळी कशी खमंग भाजता येईल, हे बघण्यात मग्न आहेत.

आपण बाहेर पडतोय, तर युरोपिअन महासंघाशी वाटाघाटी करताना आपल्याला दोन पाऊलं मागे घेणं क्रमप्राप्त आहे, हे मान्यच करायचं नाहीये त्यांना. इतक्या महत्वाच्या मुद्द्यावरही आपण कशी कडक भूमिका घेऊ शकतो, हेच दाखवट सुटले आहेत सगळे. पण उद्या ब्रिटनमध्ये हजारो नोकऱ्या गेल्या, तर त्याची जबाबदारी हे राजकीय टार्झन घेणार आहेत का ?

चर्चेला, वाटाघाटींना, तडजोडीला पर्याय नाही. नसतोच. सामाजिक स्तरावर फक्त ‘चर्चा न करून काही बिघडत नाही बरं का आमचं’ अशी टिमकी काही काळ वाजवता येते, पण त्याची आंबट फळंही खावी लागतात. आपल्यासारखा देश – ज्याचं शेजारी देशाशी 70 वर्षांपासून भांडण सुरू आहे – त्या देशाच्या नागरिकांनाही, शेजारी देशाशी न बोलणं, यातच धन्यता वाटते. वाटो. जेव्हा आपला जवान शहीद होतो, तेव्हा तो संवादाच्या आभावाची (त्याची चूक नसताना) शिक्षा भोगतो असं मला नेहमी वाटतं.

 

 

 

 

First published: December 7, 2018, 10:17 PM IST

ताज्या बातम्या