ओढणीने केला प्रेमाचा खून, 1400 किलोमीटरून आरोपी प्रियकराला घेतलं ताब्यात

भविष्यात आपले लग्न होणार नाही अशी भीती दोघानांही वाटू लागल्याने प्रेमी युगुलाने पळून जाण्याचा बेत रचला.

News18 Lokmat | Updated On: Nov 9, 2019 09:05 PM IST

ओढणीने केला प्रेमाचा खून, 1400 किलोमीटरून आरोपी प्रियकराला घेतलं ताब्यात

भिवंडी, 09 नोव्हेंबर : भिवंडीमध्ये हत्येचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हायवे -दिवे इथल्या अपहरण झालेल्या 17 वर्षीय युवतीची प्रियकराने ओढणीने गळा आवळून हत्या केल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे.  हत्या करून फरार झालेल्या प्रियकराला नारपोली पोलिसांनी उत्तरप्रदेशमधून सापळा रचत ताब्यात घेतलं आहे. या सगळ्या प्रकारानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

समीर रफिकुल्लाह खान (23 मुळ रा.आशापूर ,युपी ,सद्या रा.दापोडे ) असं हत्येप्रकरणी अटक केलेल्या प्रियकराचं नांव आहे. त्याचे नेहा राजेंद्र विश्वकर्मा (17) या युवतीशी दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. या दोघांनी लग्न करण्याचं ठरवलं होतं. मात्र, मुलीचे प्रेमसंबंध आई-वडिलांना पसंत नव्हते. त्यामुळे त्यांनी लग्नालादेखील विरोध केला होता.

भविष्यात आपले लग्न होणार नाही अशी भीती दोघानांही वाटू लागल्याने त्यांनी पळून जाण्याचा बेत रचला. 5 नोव्हेंबर रोजी पहाटे 4 वाजेच्या सुमारास नेहाहिने बाहेर शौचाला जाऊन येते असं सांगून ती घराबाहेर पडली. यावेळी नेहा घरातून पैसेदेखील घेऊन निघाली होती. मात्र, घरातून दागिने आणि कमी पैसे घेऊन आल्याने समीरने तिच्याशी भांडण केलं. हे भांडणं इतकं वाढलं की त्याने नेहाचा ओढणीने गळा आवळून हत्या केली.

या हत्येनंतर समीर त्याच्या मुळगावी पळून गेला होता. हत्येचा गुन्हा दाखल होताच पोलिसांनी कसून तपास सुरू केला असता समीर खान नावाचा युवक सहा महिन्यांपूर्वी नेहा हिच्या शेजारी राहत होता. आणि तो सध्या दापोडे येथे राहत असून त्यांच्यामध्ये प्रेमसंबंध होते अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे त्याच्याकडे वळवली असता तो त्याच्या उत्तरप्रदेशमधील मुळगावी पळून गेल्याची माहिती नारपोली पोलिसांना मिळाली.

पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पुष्पराज सूर्वे यांचे पोलीस पथक 7 नोव्हेंबर रोजी उत्तरप्रदेशमध्ये दाखल झालं. त्यांनी नेहा हिचा खूनी प्रियकर समीर खान यास राहत्या घरातून ताब्यात घेऊन त्याच्या मुसक्या आवळल्या. त्यानंतर त्याला स्थानिक कोर्टात हजर केले. समीर याच्याकडून 84 हजार 500 रुपयांची रोकड आणि एक मोबाईल जप्त करण्यात आला आहे.

Loading...

न्यायालयाकडून त्याचा ताबा मिळाल्याने नारपोली पोलिसांचे पथक शनिवारी रात्री उशिरापर्यंत त्याला घेऊन भिवंडीत दाखल होणार आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक रवींद्र वाणी यांनी दिली आहे. दरम्यान, हत्येच्या या धक्कादायक प्रकारामुळे संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 9, 2019 09:05 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...