मुंबई, 27 ऑगस्ट: मराठी चित्रपटसृष्टीमध्ये एक उत्कृष्ठ अभिनेता आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी अंडरवर्ल्डमधून धमकी मिळाल्याची माहिती समोर आली आहे. अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेमच्या नावाने महेश मांजरेकर यांना खंडणीची धमकी मिळाली आहे. महेश मांजरेकर यांना 35 कोटी रुपयांची डिमांड करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी एकाला अटक केली आहे.
हेही वाचा...अभिनेत्री सारा अली खानने तिच्या पहिल्या प्रेमाबाबत केला खुलासा
मुंबई पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, अटक केलेल्या आरोपीचं नाव मिलिंद तुळसकर (वय 34) असून तो खेडमधील रहिवासी आहे. पोलिसांनी त्याला रत्नागिरी येथून अटक केली आहे. आरोपीनं महेश मांजरेकर यांना काल, बुधवारी खंडणीच्या धमकीचा फोन केला होता. यात खंडणी मागणाऱ्याने 35 कोटी रुपयांची डिमांड केली. या प्रकरणी महेश मांजरेकर यांनी तातडीनं दादर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. तक्रारीची दखल घेऊन पोलिसांनीही खंडणी मागणाऱ्याला दादरमधून अटक केली आहे.
यासाठी आरोपीनं अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेमच्या नावाचा वापर केला. मात्र, आरोपीचा अबू सालेम याच्याशी काहीही संबंध नसल्याचं पोलिस तपासात समोर आलं आहे. मात्र, तरी देखील आरोपीचा अबू सालेमशी खरंच संबंध आहे का, त्याने कोणत्या उद्देशाने मांजरेकर यांना धमकी दिली होती, ही माहिती जाणून घेण्यासाठी पोलीस आरोपीची कसून चौकशी करत आहेत.
हेही वाचा...विराट-अनुष्कानं दिली GOOD NEWS! जानेवारी 2021ला येणार नवा पाहुणा
दरम्यान, महेश मांजरेकर हे हिंदी-मराठी इंडस्ट्रीतील मोठं नाव आहे. अस्तित्व, वास्तव, दबंग, वॉंटेड, काकस्पर्श आदी अनेक सिनेमांतून त्यांनी आपल्या दिग्दर्शनाचा अभिनयाचा ठसा उमटवला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Mumbai police