सत्यम सिंग, प्रतिनिधीमुंबई, 04 जानेवारी : मुंबईतील दहिसर जनकल्याण इमारतीमधील महिलेच्या हत्येचा छडा लावण्यात पोलिसांनी यश आलं आहे. परेश रोहिदास असं पोलिसांनी अटक केलेल्या तरुणाचं नाव असून, पैशाच्या वादातून त्याने या महिलेची हत्या करून पश्चिम बंगालला पळ काढला होता.
दहिसरच्या जनकल्याण इमारतीत 6 दिवसांपूर्वी बारमध्ये काम करणारी एक महिला मृतावस्थेत आढळली. घरातून काही दागिने आणि वस्तू गायब असल्याचं तिच्या नातेवाईकांच्या निदर्शनास आलं. त्या नंतर दहिसर पोलिसांनी तपास सुरू केला.
घटनास्थळी पोलिसांना मद्याची एक बाटली आणि दोन ग्लास आढळले. त्यावरून पोलिसांनी सीसीटीव्ही फूटेजद्वारे परेश रोहिदास याची ओळख पटवली आणि त्याचा शोध सुरू केला.
पश्चिम येथे जाऊन पोलिसांनी त्याला जेरबंद केले. पोलिसांनी जेव्हा खाक्या दाखवल्या तेव्हा परेशनं खुनाची कबुली दिली आहे. रोजीना शेख असं या मृत महिलेचं नाव आहे.
तीन वर्षांपूर्वी परेशची बारमध्ये वेटर म्हणून काम करणाऱ्या रोजीना शेख सोबत त्याची ओळख झाली होती. तो नियमित तिच्या घरी जात असे. त्यानंतर दोघेही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. काही दिवसांनी ती परेशला सतत ब्लॅकमेल करत होती. सततच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून त्याने तिचा काटा काढण्याचं ठरवलं.
रोजीना ही परेशकडे पैशांसाठी तगादा लावत असे. शनिवारी तिच्या घरी पार्टी केली आणि त्यानंतर दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर परेशने टॉवेलने तिचा गळा आवळून हत्या केली. हत्येनंतर परेश मृत महिलेचे सोने, पैसे आणि मोबाईल घेऊन कोलकाता फरार झाला होता.पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करत आहे.
पोलिसांच्या व्हॅनला कारची धडक
दरम्यान, मुंबईतील जोगेश्वरी पश्चिम द्रुतगती महामार्गावर आज एक विचित्र अपघात झाला. जोगेश्वरी इथं पोलिसांनी नाकाबंदी केली होती. तेव्हा सकाळी 7:30 वाजेच्या सुमारास एक स्विफ्ट डिझायर या गाडीने पाठीमागून पोलिसांच्या व्हॅनला जोरात धडक दिली. यात कर्तव्यावर असलेले दोन पोलीस आणि एक महिला प्रवाशी जखमी झाली. तिन्ही जखमीवर जवळचा ट्रामा रुग्णालय इथं उपचार सुरू आहेत. पुढील कारवाई जोगेश्वरी पोलीस करत आहे.
मुंबईत 8 लाखांचा गुटखा जप्त
दरम्यान, मुंबईतील साकीनाका भागात महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला लाखो रुपये किंमतीचा गुटखा आणि तंबाखू जन्य पदार्थांनी भरलेला टेम्पो गुन्हे शाखा 8 पथकाने जप्त केला आहे. काही दिवसांपूर्वी मुंबई पोलीस गुन्हे शाखेला माहिती मिळाली होती की, मुंबईतील काजुपाडा साकीनाका याठिकाणी गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करण्याकरिता टेम्पो येणार आहे. सदर माहितीच्या अनुषंगाने सापळा रचून साकीनाका भागातून एक टेम्पोसह चालकाला अटक करण्यात आली आहे. सदर टेम्पोमध्ये गुटखा जन्य पदार्थ असल्याची खात्री झाल्याने तात्काळ अन्न औषध प्रशासनाचे अधिकारी यांना पाचारण करण्यात आले. टेम्पोमध्ये तपासणी केली असता गोण्यांमध्ये 8 लाख 20 हजार माल ताब्यात घेण्यात आला आहे. या टेम्पो चालकाचा विरोधात साकीनाका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करून पुढील तपास साकीनाका पोलीस करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.