कोंबड्यांचा बळी, रक्त आणि अंडी; अघोरी प्रथेने रत्नागिरीकरांची झोप उडाली!

कोंबड्यांचा बळी, रक्त आणि अंडी; अघोरी प्रथेने रत्नागिरीकरांची झोप उडाली!

जंगलातील एका वडाच्या झाडाखाली दोन खड्डे खोदून त्याठिकाणी अनेक कोंबड्यांचा बळी देण्यात आला.

  • Share this:

चंद्रकांत बनकर, प्रतिनिधी

रत्नागिरी, 06 मे : रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड आणि चिपळूण तालुक्याच्या सीमेवर असणाऱ्या पेढे परशुराम आणि धामनदीवी गावाच्या हद्दीमध्ये एक अघोरी प्रथा समोर आली आहे. जंगलमय भागात अमावास्येच्या दिवशी दुपारी काही अज्ञात लोकांनी कोंबड्यांचा बळी दिल्याचा प्रकार समोर आला आहे.

या संपूर्ण प्रकारामुळे परिसरात काहीसं भीतीचं वातावरण आहे. जंगलातील एका वडाच्या झाडाखाली दोन खड्डे खोदून त्याठिकाणी अनेक कोंबड्यांचा बळी देण्यात आला. तसंच त्या ठिकाणी शेकडो अंडी, विविध प्रकारची फळे ठेऊन त्यावर बळी दिलेल्या कोंबड्यांचे रक्त शिंपडण्यात आल्याचंही सांगण्यात येत आहे. त्या ठिकाणी होम हवनदेखील करण्यात आलं आहे.

हा सगळा प्रकार चालू असताना नजिकच्या गावातील काही तरुणांना हा प्रकार समजला. त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि अशा प्रकारे देव देवस्कीचे कृत्य करणाऱ्या लोकांना पकडून त्यांची विचारपूस केली. त्यांची विचारणा केली असता त्यांनी स्थानिक ग्रामस्थांनाच दमदाटी करायला सुरुवात केली. ग्रामस्थांनी त्यांना घेराव घालून पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे.

खेड पोलिसांनी घटनास्थळावरून सर्व साहित्य जप्त करून त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं. ही घटना शनिवारी घडली. मात्र, अद्याप खेड पोलीस ठाण्यात या संदर्भात कसलाही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.

या सगळ्या अघोरी प्रथेमुळे लोकांची अंधश्रद्धा अजून संपली नाही हेच समोर येत. तर असे जीवघेणे प्रकार थांबवणं महत्त्वाचं आहे. त्यासाठी वेळोवेळी जनजागृती करण्याचं काम सरकारकडून होणं महत्त्वाचं आहे.

VIDEO : मोबाईलच्या बॅटरीचा स्फोट, चिमुरड्याची बोटंच तुटली

First published: May 6, 2019, 7:11 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading