भाजपच्या प्रचारात सर्जिकल स्ट्राइकचा वापर, काँग्रेसने केला पर्दाफाश

भाजपच्या प्रचारात सर्जिकल स्ट्राइकचा वापर, काँग्रेसने केला पर्दाफाश

सैन्याचा वापर प्रचाराकरता करू नये असे निर्देश असताना यामध्ये सर्जिकल स्ट्राइक, हवाई दलाचे विमान तसंच भारतीय लष्काराची प्रतिमा वापरण्यात आली होती अशी माहीती काँग्रेसनं समोर आणली आहे.

  • Share this:

प्रफुल्ल सांळुखे, प्रतिनिधी

मुंबई, 09 एप्रिल : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या शिष्टमंडळाने भाजपतर्फे केल्या जाणाऱ्या छुप्या प्रचाराचा पर्दाफाश केला. मुंबईतील खार उपनगरात युनायटेड फॉस्फरस लिमिटेड या कंपनीच्या मालकीच्या इमारतीमध्ये अनधिकृत पद्धतीने भारतीय जनता पक्षाकरता ईलेक्ट्रॉनिक कार्ड बनवण्याचं काम सुरू होतं.

हे कार्ड बनवण्याकरता निवडणूक आयोगाची परवानगी नव्हती, तसंच सैन्याचा वापर प्रचाराकरता करू नये असे निर्देश असताना यामध्ये सर्जिकल स्ट्राइक, हवाई दलाचे विमान तसंच भारतीय लष्काराची प्रतिमा वापरण्यात आली होती अशी माहीती काँग्रेसनं समोर आणली आहे.

यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा इलेक्ट्रॉनिक संदेश हा रेकॉर्डच्या स्वरुपात असून हे कार्ड उघताच तो जनतेला ऐकू जावा असं ते कार्ड असल्याचंही सचिन सावंत यांच्याकडून सांगण्यात आलं आहे. या कार्डमध्ये भाजपचं नावही स्पिकर लावून ऐकवण्यात येतं होतं. दरम्यान यामध्ये किती प्रति छापल्या गेल्या हे नमूद करण्यात आलेलं नाही.

निवडणूक आयोगाने जप्त केलेल्या साहित्याची किंमत 6 कोटी रुपये असून प्रत्येक कार्ड 300 रुपयांचं आहे. यासंदर्भात पत्रकारांशी बोलताना सचिन सावंत म्हणाले की, 'भाजपच्या कृष्णकृत्यांवर यातून प्रकाश पडला आहे. ‘मै भी चौकीदार’ म्हणणारे चोर आहेत हे पुन्हा स्पष्ट झालं. करोडो रुपयांचं अशाप्रकारचं प्रचारसाहित्य निवडणूक आयोगाच्या डोळ्यामध्ये धूळ फेकून वापरण्याचा भाजपाचा मानस असल्याचे स्पष्ट दिसून येतं.'

'युनायटेड फॉस्फरस लिमिटेड कंपनीच्या मालकाने स्वतःची जागा या गैरकृत्याकरता दिली होती आणि त्यांच्याच सांगण्यावरून हे काम सुरू होतं. हे स्पष्ट आहे आणि या मालकाचे भाजपच्या नेत्यांशी संबंध आहेत त्यामुळे यासंदर्भामध्ये आचारसंहितेचा भंग तसंच पैशाचा गैरवापर आणि जनतेचा विश्वासघात करण्यात आला.' असंही सचिन सावंत म्हणाले आहेत.

दरम्यान, युनायटेड फॉस्फरस लिमिटेड या कंपनीच्या बॉक्समध्येच ही कार्ड पाठवण्यात येणार होती अशी माहीती सचिन सावंत यांच्याकडून करण्यात आली आहे. निवडणूक अधिकारी आणि खार पोलीस यांच्यासमोरच भाजपची ही कृष्णकृत्ये उघडकीस आल्याने तात्काळ भाजपाचे अध्यक्ष अमित शहा आणि युनायटेड फॉस्फरस लिमिटेड कंपनीचे मालक या सर्वांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी काँग्रेस पक्षातर्फे सचिन सावंत यांनी केली आहे.

काँग्रेसच्या शिष्टमंडळामध्ये प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे, उत्तर मध्य मुंबई जिल्हा काँग्रेस अध्यक्ष जिया उर रहेमान वहेदी यांच्यासह काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

VIDEO : नाशिकमध्ये उमेदवाराचा प्रताप, निवडणूक अधिकाऱ्यांना फुटला घाम!

First published: April 9, 2019, 8:22 PM IST

ताज्या बातम्या