भ्रष्टाचाराविरुद्ध लढणाऱ्या भाजपमध्ये भ्रष्ट अभियंत्याचा पक्षप्रवेश

भ्रष्टाचाराविरुद्ध लढणाऱ्या भाजपमध्ये भ्रष्ट अभियंत्याचा पक्षप्रवेश

भाजपने ज्या मुद्द्यावरून विरोधी पक्षांना घेरलं आणि सत्ता काबीज केली त्याच मुद्याला बगल देत भ्रष्टाचारी व्यक्तीला पक्षात घेतलं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 20 नोव्हेंबर : भाजपने ज्या मुद्द्यावरून विरोधी पक्षांना घेरलं आणि सत्ता काबीज केली त्याच मुद्याला राजधानी दिल्लीत मात्र बगल दिली गेल्याचं चित्र दिसत आहे. भ्रष्टाचारमुक्त भारतासाठी भाजप सदैव तत्पर राहील असं पक्षाकडून सांगण्यात येतं पण आता पक्षात भ्रष्टाचारामुळे नोकरी गमावलेल्या अभियंत्यालाच घेतलं आहे. दिल्ली विधानसभेआधी हा प्रकार घडला आहे.

पंतप्रधानांच्या भ्रष्टाचारमुक्तीच्या नाऱ्याला दिल्ली भाजपनेच सुरुंग लावला आहे. भ्रष्टाचार प्रकरणी सक्तीने निवृत्ती घ्यायला लावलेल्या अभियंत्यालाच भाजपमध्ये घेतलं आहे. भ्रष्टाचार प्रकरणी ज्या 39 अभियंत्यांना जबरदस्तीने निवृत्ती घ्यायला लावली होती. त्यापैकी एक असलेल्या शराफत अली याला पक्षात घेतलं आहे.

शराफत एई सिव्हील पदावर कार्यरत होते. त्यांना शाजिया इल्मि यांनी भाजपमध्ये घेतलं. शराफत यांच्यासह जवळपास 35 हून अधिक कार्यकर्त्यांनी भाजपप्रवेश केला. या कार्यक्रमात दिल्ली भाजपचे प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी हेसुद्धा सहभागी होणार होते. मात्र, ऐनवेळी ते पोहचू शकले नाही.

भ्रष्टाचाराचा आरोप सिद्ध झाल्यानंतर ज्यांना जबरदस्तीनं निवृत्ती घ्यावी लागली त्याच व्यक्तीला पक्षात घेतल्याच्या मुद्द्यावर भाजपने मौन बाळगलं आहे. दिल्ली भाजपचे प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यापासून दूरच आहेत. तसेच इतर पदाधिकाऱ्यांनीही यावर मौन बाळगलं आहे. असं काही असेल तर वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करू असेही म्हटलं आहे.

दरम्यान, आम आदमी पक्षाने भाजपवर टीका केली आहे. आपचे नेते सुरजीत पवार यांनी भाजपचा खरा चेहरा समोर आला असं म्हटलं आहे. त्यांनी म्हटलं की, भ्रष्ट अधिकाऱ्यांना भाजप पाठिशी घालत आहे. ज्या अधिकाऱ्यांना भ्रष्टाचारामुळे नोकरीतून काढलं त्यांनाच भाजपचं सदस्यत्व देणं यापेक्षा वाईट काय असू शकतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 20, 2019 12:29 PM IST

ताज्या बातम्या