बीड, 21 मे: राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्यात लॉकडाऊन 4 सुरु आहे. तरी देखील काहींना भान आले नसल्याचं समोर आलं आहे. भाजपचे नवनिर्वाचित आमदार रमेश कराड यांनी लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेतलं. आमदार रमेश कराड गोपीनाथ गडावर आल्याचं पाहून शेकडो कार्यकर्ते जमले होते. यादरम्यान सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला तर संचारबंदीचेही नियम धाब्यावर ठेवण्यात आले.
हेही वाचा... महाराष्ट्र हादरला! कोरोनामुळे एकाच दिवशी पोलिस दलातील तीन अधिकऱ्यांचा मृत्यू
बीड जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने सोशल डिस्टन्सिंग आणि संचारबंदीचे नियम पाळा, असं राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासन आवाहन करत आहे. मात्र, लोकप्रतिनिधींकडूनच या नियमांची पायमल्ली केली जात असल्याचं निदर्शनास आलं आहे.
आमदारांच्याच चेहऱ्यावर नव्हता मास्क..
गोपीनाथ गडावर आलेले भाजपचे आमदार रमेश कराड यांच्या चेहऱ्यावर मास्क नव्हता. धक्कादायक म्हणजे त्यांच्याकडून कोरोनाबद्दल कोणतीही काळजी यावेळी घेण्यात आली नाही. आमदार कराड यांच्या स्वागतासाठी शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यकर्त्यांना आमदार कराड यांच्या भोवती गराडा घातला होता. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंग आणि संचारबंदीचे नियम कोणासाठी हा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
हेही वाचा...पुण्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवाबद्दल घेण्यात आला मोठा निर्णयबीडमध्ये कोरोनाचा पहिला बळी
राज्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होऊ लागल्यामुळे नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. यातच महाराष्ट्रात ग्रीन झोनमध्ये समावेश असलेल्या बीड जिल्ह्यात कोरोना विषाणूमुळे पहिला मृत्यू झाला आहे.
बीडच्या आष्टी तालुक्यातील सांगवी पाटण येथे कोरोनाबाधित आढळलेल्या 65 वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. रविवारी तिच्यासह 7 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. संबंधित महिला मुळची पिंपळगाव (नगर) येथील रहिवासी असून मुंबईहून सांगवी येथे नातेवाईकाकडे आली होती. जिल्ह्यात कोरोनाचा पहिला बळी गेला आहे, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
सध्या बीड जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या 9 वर पोहचली आहे. यापैकी एका रुग्णांचा मृत्यू झाला असून इतर 8 जणांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.