भाजपचे आमदार आशिष देशमुख काँग्रेसच्या वाटेवर ?

भाजपचे आमदार आशिष देशमुख काँग्रेसच्या वाटेवर ?

गेल्या काही महिन्यांपासून आमदार आशिष देशमुख भाजपवर नाराज असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका करीत आहेत.

  • Share this:

नागपूर, 07 मार्च : भाजपचे काटोलचे आमदार आशिष देशमुख सध्या दिल्लीत असून ते काँग्रेस नेत्यांच्या गाठीभेटी घेत आहेत. या दिल्लीवारीने ते माजी खासदार नाना पटोले यांच्या मार्गाने जाणार असल्याचं आता स्पष्ट झालंय.

गेल्या काही महिन्यांपासून आमदार आशिष देशमुख भाजपवर नाराज असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका करीत आहेत. विदर्भाचा मुद्दा तसंच शेतकऱ्यांना द्यावयाच्या नुकसान भरपाईवरून सरकारला लक्ष्य करीत आहेत. नागपुरातील हिवाळी अधिवेशनाच्या काळात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस नेत्यांच्या भेटी घेतल्या होत्या. सध्या ते दिल्लीला गेले असून केवळ काँग्रेस नेत्यांच्या गाठीभेटी घेत आहेत.

त्यांच्यासोबत त्यांचे वडील आणि काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष रणजित देशमुख आहेत. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट झाली नाही. परंतु पिता-पुत्रांनी प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांची भेट घेतली. याशिवाय त्यांनी राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, काँग्रेसचे सरचिटणीस जनार्दन द्विवेदी भेट घेतली. आशिष देशमुख यांचा काँग्रेस प्रवेशाचा पेच विधानसभा मतदारसंघावरून निर्माण झाला आहे.

आशिष देशमुख सध्या नागपूर जिल्ह्यातील काटोल मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. हा मतदारसंघ काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागावाटपात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आहे. हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री अनिल देशमुख यांचा आहे. या मतदारसंघावरील दावा अनिल देशमुख सोडणार नसल्याने या गाठीभेटींना महत्व आले आहे.

First published: March 7, 2018, 10:14 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading