संघाच्या बौद्धिकवर्गाला दांडी मारणारे आशिष देशमुख अजित पवारांसोबत !

संघाच्या बौद्धिकवर्गाला दांडी मारणारे आशिष देशमुख अजित पवारांसोबत !

हिवाळी अधिवेशनाच्या काळात भाजप आमदारांसाठी संघाने भरवलेल्या बौद्धिक वर्गाला दांडी मारणारे भाजपचे नाराज आमदार आशिष देशमुख आज थेट अजित पवारांसोबतच विधीमंडळ आवारात पोहोचल्याचं बघायला मिळालं. विशेष म्हणजे या आशिष देशमुखांनी काही दिवसांपूर्वीच विदर्भाच्या प्रश्नांवरून मुख्यमंत्र्यांना लांबलचक पत्र लिहून सरकारविरोधात आपली नाराजी व्यक्त केली होती.

  • Share this:

20 डिसेंबर, नागपूर : हिवाळी अधिवेशनाच्या काळात भाजप आमदारांसाठी संघाने भरवलेल्या बौद्धिक वर्गाला दांडी मारणारे भाजपचे नाराज आमदार आशिष देशमुख आज थेट अजित पवारांसोबतच विधीमंडळ आवारात पोहोचल्याचं बघायला मिळालं. विशेष म्हणजे या आशिष देशमुखांनी काही दिवसांपूर्वीच विदर्भाच्या प्रश्नांवरून मुख्यमंत्र्यांना लांबलचक पत्र लिहून सरकारविरोधात आपली नाराजी व्यक्त केली होती. अशातच आज तेच आशिष देशमुख थेट अजित पवारांशी विधानभवनाच्या आवारातच गुजगोष्टी करताना आढळून आल्याने राजकीय तर्कवितर्कांना ऊत आलाय. आशिष देशमुख हे गडकरी गटाचे आमदार मानले जातात.

भाजप खासदार नाना पटोलेंनी मोदींविरोधात जाहीरपणे बंड करत खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर आमदार आशिष देशमुख यांच्या आपल्याच सरकारविरोधातली नाराजी लपून राहिलेली नाहीये. विदर्भाचा मुद्दा, कर्जमाफी, शेतकरी आत्महत्या आणि विकासाच्या मुद्यावरून त्यांनी सातत्याने सरकारविरोधात जाहीरपणे नाराजी प्रकट केलेली आहे. त्यामुळे भाजपचे हे नाराज आमदार नाना पटोलेंच्या मार्गाने जाणार का ? याचीच चर्चा आज नागपूरच्या विधीमंडळ आवारात सुरू होती. आशिष देशमुख हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणजित देशमुख यांचे पूत्र आहेत.

गेल्या विधानसभेत त्यांनी गडकरींच्या आग्रहावरून काटोलमधून भाजपच्या तिकीटावर आमदारकी लढवली आणि ते निवडून देखील आले होते. 2014मध्ये राज्यात भाजप सत्तेत आल्यानंतर त्यांनी गडकरींनी मुख्यमंत्रीपदासाठी नागपूर विमानतळावर 40 आमदारांसह जाहीरपणे शक्तीप्रदर्शनही केलं होतं. अशातच आता त्यांची विरोधी पक्षांशी वाढती सलगी अनेकांच्या नजरेज भरतेय. दरम्यान, संघाच्या बौद्धिक वर्गाला दांडी मारल्याच्या कारणास्तव आशिष देशमुख आणि एकनाथ खडसेंना भाजपच्यावतीने नोटीसीद्वारे जाब विचारला जाणार आहे. या नोटीसीच्या वृत्तानंतर खडसेंनी आपण आजारी असल्याने बौद्धिक वर्गाला अनुपस्थित राहिल्याचा खुलासा केलाय पण आशिष देशमुखांनी अजून कोणताही खुलासा केलेला नाही. त्यामुळे नाना पटोलेंपाठोपाठ आशिष देशमुखही बंडखोरीच्या मार्गाने चालले नाहीत ना, याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झालीय.

 

Loading...

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 20, 2017 05:51 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...