Home /News /news /

मुहूर्त हुकणार? राष्ट्रवादीच्या प्रवेशाबाबत अखेर एकनाथ खडसे बोलले, VIDEO

मुहूर्त हुकणार? राष्ट्रवादीच्या प्रवेशाबाबत अखेर एकनाथ खडसे बोलले, VIDEO

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे पक्षावर कमालीचे नाराज असून लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.

    इम्तियाज अली, प्रतिनिधी जळगाव, 17 ऑक्टोबर : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे पक्षावर कमालीचे नाराज असून लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. त्यांच्या समर्थकांनी खडसेंचा याचा प्रवेश निश्चित असल्याचे सांगितले आहे. पण, आता एकनाथ खडसे यांनीच राष्ट्रवादीच्या प्रवेशाच्या चर्चेवर 'नो कमेंट' अशी प्रतिक्रिया देऊन गुगली टाकली आहे. भाजपवर नाराज असलेले जेष्ठ नेते एकनाथ खडसे भाजप सोडून राष्ट्रवादीमध्ये जाणार अशी जोरदार चर्चा काही दिवसांपासून सुरू आहे आणि खडसे हे घटस्थापनेच्या दिवशीचा मुहूर्त साधून ते राष्ट्रवादीमध्ये जाणार असल्याची चर्चा आहे. याबाबत पत्रकारांनी खडसे यांना विचारले असता, नो कमेंट म्हणत बोलण्याचे टाळले. 'मला सध्या याबद्दल काहीही बोलायचे नाही. योग्य वेळी उत्तर देईल', असंही एकनाथ खडसे म्हणाले. त्यामुळे, या नो कमेंटचा अर्थ खडसे पक्ष बदल करणार असा होतो का? या बाबत आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. दरम्यान, भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनीही एकनाथ खडसे यांच्या भाजप सोडण्याच्या चर्चेवर प्रतिक्रिया दिली आहे. 'चर्चाही केवळ चर्चा असते. त्याचा काहीही अर्थ नसतो.  एकनाथ खडसे हे भाजप सोडून जाणार नाहीत याची मला खात्री आहे. खडसे हे अनुभवी आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत' असं पंकजा मुंडे यांनी सांगितले. काय म्हणाले होते फडणवीस? 'एकनाथ खडसे हे आमचे ज्येष्ठ नेते आहेत. आमच्या सर्वांची इच्छा आहे, त्यांनी आमच्यासोबत राहिले पाहिजे. राजकारण कसे आहे, त्यांना चांगले माहिती आहे. त्यामुळे योग्य तो निर्णय घेतील, असा मला विश्वास आहे' अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली. तसंच, 'एकनाथ खडसे यांच्यासोबत आज कोणतीही चर्चा झाली नाही. योग्यवेळी मी चर्चा करेल आणि मला पूर्ण विश्वास आहे की, खडसे हे योग्य निर्णय घेतील' असंही फडणवीस म्हणाले. अजित पवारांनी खडसेंवर बोलण्याचं टाळलं तर दुसरीकडे 'राजकीय जीवनात वावरत असताना अनेक नेत्यांच्या भेटीगाठी होत असतात. अनेक जण कामानिमित्ताने भेटत असतात. त्याच दरम्यान, त्यांची आणि माझी भेट झाली होती. आता आमची भेट झाली म्हणून त्यातून कोणताही अर्थ काढू नये. एकनाथ खडसे हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत की, याबद्दल माझ्याकडे माहिती नाही', अशी प्रतिक्रिया देत अजित पवारांनीही बोलण्याचे टाळले.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या