भाजपचे चंद्रकांत सोनार धुळ्याचे नवे महापौर तर उपमहापौर पदी कल्याणी अंपळकर

भाजपचे चंद्रकांत सोनार धुळ्याचे नवे महापौर तर उपमहापौर पदी कल्याणी अंपळकर

धुळे महापालिकेच्या महापौर पदी भाजपचे चंद्रकांत सोनार यांची तर उपमहापौर पदी कल्याणी अंपळकर यांची बिनविरोध निवड झाली आहे.

  • Share this:

धुळे, 31 डिसेंबर : धुळे महापालिकेच्या महापौर पदी भाजपचे चंद्रकांत सोनार यांची तर उपमहापौर पदी कल्याणी अंपळकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस पक्षाच्या उमेदवारानी महापौर उपमहापदाच्या निवडणुकीतून माघार घेतल्याने ही निवड बिनविरोध पार पडली आहे.

या निवडीच्या विशेष महासभेत 74 पैकी 71 नगरसेवक उपस्थित होते. या सभेत नगरसेविका हेमा गोटे, शिवसेनेच्या जोत्सना पाटील आणि बसपच्या सुशिला इशी हे नगरसेवक गैरहजर होते. शहराचा विकास प्राधान्य क्रम राहिल असे नवनिर्वाचित महापौर सोनार यानी स्पष्ट केले. 15 कलमी कार्यक्रम उद्यापासूनच सुरू करण्यत येणार असल्याचेही सोनार यानी स्पष्ट केलं. या विजयानंतर भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला आहे.

धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपने एकहाती सत्ता राखत दणदणीत विजय मिळवला होता. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्त्वाखाली पुन्हा एकदा भाजपने घवघवीत यश मिळवलं होतं.  भाजपच्या  विजयामुळे सत्ताधारी काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीला मोठा धक्का बसला होता तर दुसरीकडे बंड पुकारून भाजपविरोधात थंड थोपटणारे अनिल गोटे यांचं पुरतं पानिपत झालं होतं.

विशेष म्हणजे, भाजपमध्ये गुंडांना उमेदवारी दिली असा आरोप करून भाजपचे ज्येष्ठ नेते अनिल गोटे यांनी बंड पुकारलं होतं. अनिल गोटे यांनी लोकसंग्राम नावाचा पक्ष स्थापन केला होता. अनिल गोटे यांनी बंडखोरी केल्यानं धुळे महापालिकेची निवडणूक राज्यभर गाजली. गोटे यांनी आपल्या घरात पत्नी हेमा आणि मुलगा तेजस गोटेला उमेदवारी देऊन मैदानात उतरवलं होतं. पण धुळेकर जनतेनं भाजपच्या पारड्यात मतं टाकत अनिल गोटे यांच्यासह काँग्रेस राष्ट्रवादीला साफ नाकारलं.

अनिल गोटे यांच्या लोकसंग्राम पक्षाला एका जागेवर समाधान मानावं लागलं होतं. मतदारांच्या कौलमुळे काँग्रेस राष्ट्रवादीला सत्तेवरून खाली उतरावं लागलं. काँग्रेसला 6 तर राष्ट्रवादीच्या वाट्याला 8 जागा आल्या होत्या. मागील निवडणुकीत राष्ट्रवादीने 34 जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष ठरला होता. परंतु, या वेळी राष्ट्रवादीला एकेरी आकडाही गाठता आला नाही त्यात काँग्रेसच्याही 2 जागा कमी झाल्या.

सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेलाही इथं फार मोठा करिश्मा दाखवता आला नाही. मागील निवडणुकीत शिवसेनेच्या वाट्याला 11 जागा आल्या होत्या. यावेळी शिवसेनेला फक्त 1 जागा मिळाली. पहिल्यांदाच निवडणूक लढवणाऱ्या एमआयएम पक्षाने 4 जागेवर विजय मिळवत खान्देशात पाऊल टाकलं. बसपा, समाजवादी पक्षाने आपला गड कायम राखत अनुक्रमे 1 आणि 2 जागा जिंकल्या. इथं मात्र, समाजवादी पक्षाला एका जागेचा फटका बसला होता.

धुळे महानगरपालिका निवडणूकीचे असे होते अंतिम निकाल

भाजप - 50

शिवसेना- 01

काँग्रेस - 06

राष्ट्रवादी -08

लोकसंग्राम - 01

एम आय एम - 04

समाजवादी पार्टी- 02

बसपा- 01

VIDEO : 'एक दुजे के लिये' म्हणत विष पिऊन फिरत होते प्रेमी युगुल, व्हिडिओ व्हायरल

First published: December 31, 2018, 1:06 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading