नवी दिल्ली, 11 मार्च: राज्यसभेच्या सात जागांसाठी भाजपने आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. भाजपने महराष्ट्रातून माजी खासदार उदयनराजे भोसले आणि रिपइंचे नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांना उमेदवारी देण्यात आली आहे. राज्यसभेसाठी महाराष्ट्रातील भाजपच्या कोट्यात तीन जागा आहे. भाजपकडून दोन नावे जाहीर करण्यात आली असून एक नाव अजून जाहीर होणे बाकी आहे. भाजपचा तिसरा उमेदवार कोण याबाबत अजून सस्पेन्स कायम आहे. भाजपचे निष्ठावंत नेते एकनाथ खडसे यांनी उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दुसरीकडे, काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केलेले ज्योतिरादित्य शिंदे यांना भाजपने मध्य प्रदेशातून उमदेवारी दिली आहे.
हेही वाचा...
मध्य प्रदेशसारखी परिस्थिती महाराष्ट्रात येईल का? शरद पवारांनी दिले उत्तर
भाजपच्या केंद्रीय निवड समितीची बैठक भाजपाध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या अध्यक्षतेत मंगळवारी दिल्लीत पार पडली. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शाह, परिवहन मंत्री नितीन गडकरी आणि इतर सदस्य उपस्थित होते. एकनाथ खडसेंच्या राज्यसभेच्या नावाच्या चर्चेवर पूर्णविराम मिळाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. एकनाथ खडसे राज्यसभेच्या जागेसाठी आग्रही होते. खडसेंचा विधान परिषदेसाठी विचार होणार, अशाही चर्चेने आता जोर धरला आहे. मात्र, भाजपने सध्या महाराष्ट्रातील तीन पैकी दोनच उमेदवारांची नावं जाहीर केली आहे. एक नाव अजून महाराष्ट्र कोट्यातून जाहीर होणे बाकी आहे. भाजपचा तिसरा उमेदवार कोण हे अजून सस्पेन्स आहे.
भाजपने या नेत्यांना दिली उमेदवारी...
आसाममधून भुवनेश्वर कालीता आणि बुस्वजीत डायमरी, बिहारमधून विवेक ठाकूर, गुजरातमधून अभय भारद्वाज आणि रमीलाबेन बारा, महाराष्ट्रातून उदयनराजे भोसले आणि रामदास आठवले, झारखंडमधून दीपक प्रकाश, मणिपूरमधून लिएसेंबा महाराजा, मध्य प्रदेशातून ज्योतिरादित्य शिंदे, राजस्थानातून राजेंद्र गेहलोत या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली.
हेही वाचा..
धक्कादायक: रंगाऐवजी पुण्यात आठ वर्षांच्या चिमुरड्यावर फेकलं अॅसिड!
राज्यसभेच्या 'त्या' जागेवरून महाविकास आघाडीत बिघाडी?
राज्यसभेची एक जागा राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यावरून काँग्रेस आक्रमक झाली आहे. चौथ्या जागेसाठी अजूनही काँग्रेस आग्रही आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार राज्यसभेसाठी अर्ज भरला आहे. शरद पवार यांच्यासोबत प्रफुल पटेल यांच्यासह अनेक नेतेही उपस्थित होते. चौथ्या जागेबाबत समन्वय समितीची आज महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. त्यामुळे आज फौजिया खान यांची अर्ज दाखल करण्याची शक्यता कमी आहे. दरम्यान, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. सत्ता स्थापन झाल्यानंतर आता राज्यसभेची गणितही बदलण्याची शक्यता आहे. राज्यसभेच्या चौथ्या जागेवरून महाविकास आघाडीत बिघाडी होते की काय, अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
राज्यसभेच्या 55 जागांसाठी येत्या 26 मार्च रोजी निवडणूक होणार आहे. त्याच दिवशी त्याची मतमोजणी होणार आहे. राज्यात एकूण सात जागांसाठी निवडणूक होत असून विधानसभेतील संख्याबळानुसार महाविकास आघाडीच्या चार आणि भाजपच्या तीन जागा निवडून येऊ शकतात. दुसरीकडे, तामिळनाडूत 6 जागा, पश्चिम बंगाल आणि बिहारमधील प्रत्येकी 5 जागांवर निवडणूक होत आहे. ओडिशा, आंध्र प्रदेश आणि गुजरातच्या चार जागांसाठी मतदान होईल. तर आसाम आणि राजस्थानमधून 3 जागा रिक्त होत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.