पाटणा, 16 ऑक्टोबर : बिहारमध्ये निवडणुकीचे वारे वेगाने वाहू लागले आहेत. प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. निवडणुकीच्या या मैदानात आज सर्वात मोठी आणि वाईट बातमी येत आहे. निवडणुकीआधीच मुख्यमंत्र्यांच्या सर्वात जवळ असणाऱ्या मंत्र्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे त्यांना तिकीट न देता त्यांच्या सुनेला तिकीट देण्यात आलं होतं. मात्र मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळातील सर्वात जवळचे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मंत्र्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
बिहारच्या नितीश सरकारमध्ये पंचायती राज मंत्री आणि जनता दल युनायटेड (JDU) चे नेते कपिलदेव कामत यांचे कोरोना संसर्गामुळे निधन झाले. रात्री उशिरा त्यांनी पाटण्यातील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था येथे अखेरचा श्वास घेतला. सुमारे एक आठवड्यापूर्वी त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आलं होतं. 2 दिवसांपासून त्यांची प्रकृती आणखीन खालवली होती. उपचारादरम्यानं त्यांचं निधन झालं. कपिलदेव कामत यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यासह अनेक नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे.
Bihar CM Nitish Kumar ( in file pic) expresses condolences on the demise of State Panchayati Raj Minister Kapil Deo Kamat pic.twitter.com/joNXjLmlIL
कपिलदेव यांना मुत्रपिंडाचा आजार होता आणि त्यातच त्यांचे कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्यानं त्यांच्यावर एम्स रुग्णालयात उपचार सुरू होते. प्रकृती खालवल्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. शुक्रवारी सकाळी कपिलदेव यांनी अखेरचा श्वास घेतला.
कपिलदेव कामत जे मातीशी आणि मातीतल्या माणसाशी जोडलेले एक नेते होते. त्यांच्या अशा अचानक जाण्यानं राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाल्याची खंत मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी व्यक्त केली. कपिलदेव कामत हे 10 वर्षे मंत्री होते. गेली 40 वर्षे ते राजकारणात सक्रिय होते, परंतु गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. मुख्यमंत्री नितीशकुमार यांचे निकटवर्ती मानले जाणारे कपिल देव कामत यांच्या प्रकृतीचा विचार करता जेडीयूने त्यांची सून मीना कामत यांना बिहार विधानसभा निवडणूक 2020 च्या मधुबनी जागेसाठी उमेदवारी दिली आहे.