मुंबई, 13 ऑक्टोबर : बिहारमध्ये निवडणुकीचे जोरदार वारे वाहत असून महाराष्ट्रातील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या राजकीय पक्षांनीही तिथल्या निवडणुकीत उडी घेतली आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई प्रदेश कार्यालयात पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार प्रफुल पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत भोजपुरी सिनेअभिनेते सुदीप पांडे आणि दीपा पांडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.
यावेळी प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील, कोषाध्यक्ष हेमंत टकले, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे उपस्थित होते.
बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली जेडीयू आणि भाजप विरुद्ध तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडीत सामना रंगत आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादीनेही ही निवडणूक लढण्याचा निर्णय घेतल्याने महाराष्ट्रातील जनतेचंही या निवडणुकीकडे लक्ष लागलं आहे.
महाराष्ट्रातील समीकरण बिहारमध्येही दिसणार?
राज्याबरोबर देशाचं राजकारण पुढच्या टप्प्यावर नेणारी एक मोठी घडामोड लवकरच घडू शकते. महाराष्ट्राचे दोन पक्ष बिहारची विधानसभा निवडणूक एकत्रित लढवणार असण्याची चिन्हं आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची नुकतीच वर्षा निवासस्थानी भेट झाली असून त्यामध्ये बिहार निवडमूक एकत्र लढवण्यासंदर्भात दोघांमध्ये चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे.
एका राज्यातले दोन प्रादेशिक पक्ष एकत्रितपणे दुसऱ्या राज्यात निवडणूक लढवणार असल्याचं राजकारण यानिमित्ताने प्रत्यक्षात येऊ शकतं. ठाकरे -पवार भेटीत बिहार निवडणुकीबाबत चर्चा झाल्याचं समजतं. शिवसेनेनं बिहार विधानसभाण निवडणुकीसाठी उमेदवार उभे केले आहेत. थेट भाजप आणि NDA ला शह देण्याचा सेनेचा प्रयत्न यात स्पष्ट दिसतो. आता राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर एकत्र निवडणूक लढवली गेली, तर त्यातून नव्या राजकारणाचा उगम होऊ शकतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bihar Election, NCP