मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

सायकल मार्ग ते शटल बस, असं असणार नवं संसद भवन!

सायकल मार्ग ते शटल बस, असं असणार नवं संसद भवन!

संसद भवनाच्या नव्या इमारतीसाठी सध्याच्या संसद भवनासमोरीली साडेनऊ एकर जमीन निश्चित करण्यात आली आहे.

संसद भवनाच्या नव्या इमारतीसाठी सध्याच्या संसद भवनासमोरीली साडेनऊ एकर जमीन निश्चित करण्यात आली आहे.

संसद भवनाच्या नव्या इमारतीसाठी सध्याच्या संसद भवनासमोरीली साडेनऊ एकर जमीन निश्चित करण्यात आली आहे.

  • Published by:  sachin Salve

नवी दिल्ली, 03 जानेवारी : संसद भवनाची नवी इमारत 75 व्या स्वातंत्र्य दिनी म्हणजेच 2022 मध्ये तयार होणार आहे. त्या शिवाय दिल्लीतली सर्व मंत्रालयांसाठी एकीकृत असं केंद्रीय सचिवालय चार वर्षात उभारलं जाणार आहे.

संसद भवन म्हणजे देशाच्या लोकशाहीची शान. दिल्लीत संसद भवनासह अनेक सरकारी इमारती आहेत.  संसदेची इमारत आता अपुरी पडू लागली आहे. तसंच अनेक मंत्रालयं वेगवेगळ्या ठिकाणी असल्यानं प्रशासकीय कामकाजात अडथळे निर्माण होतात.  संसद भवनाच्या पुनर्विकास योजनेंतर्गत सर्व केंद्रीय मंत्रालय एकाच स्थानावर आणली जाणार आहेत.

संसद भवनाच्या नव्या इमारतीसाठी सध्याच्या संसद भवनासमोरीली साडेनऊ एकर जमीन निश्चित करण्यात आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, संसद भवनाची नवी इमारत त्रिभुजाकार असणार आहे. 2022 पर्यंत नव्या इमारतीचं बांधकाम पूर्ण करण्याचं लक्ष्य ठेवण्यात आलंय.  75व्या स्वातंत्र्यदिनी म्हणजेच ऑगस्ट 2022 मध्ये नव्या संसद भवनात विशेष सत्राचं आयोजन करता येऊ शकेल. या शिवाय केंद्र सरकारच्या मंत्रालयांसाठी 76 एकर जमिनीवर एकीकृत केंद्रीय सचिवालय बांधलं जाणार आहे. त्यासाठी 2024 ही डेडलाईन ठेवण्यात आलीय.एकीकृत केंद्रीय सचिवालयासाठी भव्य आणि विशाल स्वरूपाच्या सात मजल्यांच्या आठ इमारती बांधल्या जाणार आहेत.

वेगवेगळ्या ठिकाणांवर असलेले मंत्रालय एकाच ठिकाणी आणण्याची ही योजना आहे. राष्ट्रपती भवन ते इंडिया गेट पर्यंतच्या 3 किलोमीटर क्षेत्रफळात सेंट्रल व्हिस्टा, संसद भवन, एकीकृत केंद्रीय सचिवालयासाठी शंभर एकरपेक्षा जास्त जमीनीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली.

एकीकृत सचिवालयासाठी विविध मंत्रालयांसाठी वापरल्या जाणाऱ्या इमारती, शास्त्री भवन, कृषि भवन आणि विज्ञान भवनाच्या जागेवर नवी इमारत बांधली जाईल. बांधकाम करताना संसद भवन आणि सचिवालयाच्या इमारतींची उंची इंडिया गेटपेक्षा कमी ठेवली जाणार आहे. पंतप्रधानांचं निवासस्थानही साऊथ ब्लॉक निकटच्या पंतप्रधान कार्यालयाजवळ स्थानांतरित केलं जाणार आहे.

नव्या इमारतींसाठी दिल्ली विकास प्राधीकरणाद्वारे अधिसूचना जारी करून 15 एकरचा भूखंड उपलब्ध करण्यात आलाय. या भूखंडावर पंतप्रधान निवासाचं बांधकाम केलं जाणार आहे. डीडीएच्या अधिसूचनेत भूखंडाचा वापर निवासासाठी दाखवण्यात आला आहे. सध्याच्या संसद भवनाची इमारत अनेक गरजा पूर्ण करण्यासाठी अपुरी पडतेय.

संसद भवनाची सध्याची इमारत, नॉर्थ ब्लॉक आणि साऊथ ब्लॉकमधील ऐतिहासिक इमारतींना कोणताही धक्का लावला जाणार नाही. ब्रिटीश काळात बांधण्यात आलेल्या इमारतींचा उपयोग संग्रहालय म्हणून केला जाऊ शकतो.

प्रसिद्ध ब्रिटीश आर्किटेक्ट हर्बर्ट बेकर यांच्या मार्गदर्शनाखाली संसद भवनाचं बांधकाम करण्यात आलं होतं. सर्व नवीन कार्यालयं भूमिगत मेट्रो रेल्वेनं जोडली जाणार आहेत. सर्व कार्यालयांमध्ये शटल सेवा असणार आहे.

तसंच इंडिया गेट यमुनेला जोडणारा एक वॉक वे आणि सायकल मार्ग असणार आहे. या मार्गावर शटल बस देखील उपलब्ध असतील. राष्ट्रपती भवनाच्या मागे असलेल्या 75 एकर जागेवर राष्ट्रीय बॉटनिकल गार्डनची योजना आखली जातेय.

एकंदरीतच नवं संसद भवन, एकीकृत केंद्रीय सचिवालय यामुळे दिल्लीचा चेहरामोहरा बदलून जाणार आहे. दिल्लीचं नव रूप जगात भारी ठरणार हे नक्की.

First published: