रवी शिंदे, प्रतिनिधी
भिवंडी, 08 मार्च : भिवंडी शहरातील भोईवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोहम्मदीया मशीदमागे मोकळ्या जागेत 4 वर्षीय मुलीवर नराधमाने अमानूष बलात्कार करून तिचा निर्घृणपणे खून केल्याची घटना 1 एप्रिल 2018 रोजी घडली होती. पण आज जागतिक महिला दिनी या मृत मुलीला न्याय मिळाला असं म्हणायला हरकत नाही.
सदर बालिकेचं प्रेत 4 एप्रिल रोजी सापडल्याने त्याबाबत भोईवाडा पोलीस ठाण्यात भादंवि 363, 302, 201, 364, 366(अ ) , 376 सह लैंगिक अपराधापासून बाल संरक्षण अधिनियम 2012चे कलम 4, 8, 9 (ह ) 10 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेनंतर नराधम आरोपी मोहम्मद आबेद मो.आजमीर शेख (२० ) हा त्याच्या बिहार येथील मुळ गांवी पळून गेला होता.
त्याचा शोध भोईवाडा पोलीस ठाण्याचे तत्कालीन ( गुन्हे ) पोलीस निरीक्षक राजेंद्र मायने यांनी तीन पोलीस पथकं नेमून मोठ्या शिताफीने अटक केली. त्याच्यावर सर्व सबळ पुरावे गोळा करून ठाणे जिल्हा सत्र न्यायालयात 6 जुलै 2018 रोजी दोषारोपपत्र दाखल करण्यात आलं होतं. या गंभीर गुन्ह्याचा वादविवाद न्यायाधीश एस.ए.सिन्हा यांच्या न्यायालयात चालून आरोपी आणि सरकारी बाजू तपासून न्यायाधीश सिन्हा यांनी शुक्रवारी आरोपी मोहम्मद आबेद शेख यास फाशीची शिक्षा सुनावली आहे.
अशा प्रकारच्या गुन्ह्यातील आरोपीला फाशीची शिक्षा होण्याची ही ठाणे जिल्ह्यातील पहिलीच घटना असून ऐतिहासिक असल्याचं न्यायालयीन सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. या गुन्ह्याचा तपास अधिकारी राजेंद्र मायने हे नुकतेच हिललाईन पोलीस ठाण्यात रुजू झाल्याने त्यांच्या विशेष तपास कामाचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.
VIDEO: क्लासमध्ये विद्यार्थीनीची काढली छेड; शिक्षकाला असा दिला चपला, बुटांचा आहेर