#BhimaKoregaon  काय आहे भीमा कोरेगावचा इतिहास?

भीमा कोरेगावचा नेमका काय आहे इतिहास, दोनशे वर्षांपूर्वी नेमकं काय झालं होतं त्याचा हा वेध.

News18 Lokmat | Updated On: Aug 29, 2018 07:54 PM IST

#BhimaKoregaon  काय आहे भीमा कोरेगावचा इतिहास?

भीमा कोरेगावच्या घटनेने महाराष्ट्राचच नव्हे तर देशाचं वातावरण ढवळून निघालं. सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न समाकंटकांनी केला. राजकीय आरोप प्रत्यारोप झाले आणि प्रत्येकजण आपली पोळी भाजण्याचा प्रयत्न केला. या राजकीय साठमारीत समाजाची विण उसवली गेली. या वर्षाच्या सुरवातीला म्हणजे जानेवारी महिन्यात सुरू झालेल्या या क्रिया-प्रतिक्रीया अजूनही थांबायला तयार नाहीत. 1 जानेवारी 2018 रोजी भीमा-कोरेगावची लढाई म्हणून इतिसाहास प्रसिद्ध असलेल्या या लढाईतल्या विजयाला 200 वर्ष पूर्ण झाली. त्यामुळे ही लढाई पुन्हा एकदा इतिहासातून वर्तमानात आली. नेमका काय आहे हा इतिहास, दोनशे वर्षांपूर्वी नेमकं काय झालं होतं त्याचा हा वेध.

भीमा-कोरेगावची लढाई

1 जानेवारी 1818 रोजी दुसरे बाजीराव पेशवे आणि इंग्रजांमध्ये हे युद्ध झालं. त्यावेळी पुण्यावर ब्रिटिशांची सत्ता होती. पुणे म्हणजे पेशव्यांचा बालेकिल्ला होता. तो परत मिळवण्यासाठी दुसरे बाजीराव पेशवे प्रचंड मोठ्या फौज फाट्यासह पुण्यावर चाल करण्यासाठी निघाले. याची माहिती मिळताच इंग्रजांनीही पेशव्यांशी दोन हात करण्याची पूर्ण तयारी केली. पेशव्यांकडे 28 हजारांचं सैन्य होतं तर इंग्रजांकडे 800 च्या आसपास सैनिक होते असा दावा इतिहासकारांनी केलाय. कॅप्टन फ्रांन्सिस एफ. स्टॉन्टन यांच्या नेतृत्वाखाली इंग्रजांनी हे युद्ध लढलं.

पुणे जिल्ह्यातल्या भीमा कोरेगाव इथं भीमा नदीच्या काठावर दोन्ही सैन्याची गाठ पडली आणि तुंबळ युद्ध झालं. इंग्रजांच्या बॉम्बे नेटिव्ह इन्फँट्री या सैनिकांच्या तुकडीत 500 महार सैनिक होते. या सैनिकांनी पेशव्यांच्या बलाढ्य सैन्याला 12 तास रोखून धरलं. एक इंचही पुढे सरकू दिलं नाही. इंग्रजांची आणखी मोठी फौज येत असल्याची माहिती पेशव्यांना मिळाली त्यामुळं पेशव्यांनी आहे त्या परिस्थितीत युद्धातून काढता पाय घेण्याचा निर्णय घेतला आणि ब्रिटिशांचा विजय झाला. या लढाईत इंग्रजांच्या 275 सैनिकांचा मृत्यू झाला तर पेशव्यांचे 600 च्या आसपास सैनिक मृत्यूमुखी पडले असे दाखल अनेक ऐतिहसिक पुस्तकांमधून देण्यात येतात. हा लढाई जिंकण्याचा दिवस म्हणजे 1 जानेवारी 1818 ची पहाट होती. या लढाईत महार सैनिकांनी जे शौर्य दाखवलं त्यामुळेच विजय मिळाला. त्या विजयाचं प्रतिक म्हणून इंग्रजांनी भीमा-कोरेगावमध्ये विजय स्तंभ उभारला आणि त्यावर युद्धात धारातिर्थी पडलेल्या सैनिकांची नावं कोरली.

दलित अस्मितेचं प्रतिक

पेशाव्यांच्या राजवटीत त्या काळात दलितांना अतिशय अपमानास्पद वागणूक दिली जात असे. दलितांना त्यांचे मुलभूत अधिकारही नाकारले जात होते. त्याची प्रचंड सल दलितांच्या मनात होती. त्या अन्यायाचा वचपा काढण्यासाठी महार सैनिकांनी आपल्या प्राणाची बाजी लावली आणि ते लढले आणि पेशव्यांचा पराभव केला. याचीही किनार या विजयाला असल्याने दलित समाजाचा या विजयाकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टीकोन आहे.

बाबसाहेबांची मानवंदना

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 1 जानेवारी 1927 रोजी या क्रांती स्तंभाला भेट दिली आणि आदरांजली अर्पण केली. त्यानंतर दरवर्षी 1 जानेवारीला येण्याची प्रथाच पडली. यावर्षी घटनेला 200 वर्ष झाल्यानं गर्दीनं उच्चांक मोडला होता.

 

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 29, 2018 07:54 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close