'भाजपचा निर्लज्जपणा' : महाराष्ट्र विजयानंतर सोनिया आक्रमक; मोदींवर केला थेट हल्ला

'भाजपचा निर्लज्जपणा' : महाराष्ट्र विजयानंतर सोनिया आक्रमक; मोदींवर केला थेट हल्ला

महाराष्ट्रात भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यात काँग्रेससह आघाडीने यश मिळवल्यानंतर राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांनी थेट पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 28 नोव्हेंबर : महाराष्ट्रात महाआघाडीचे सरकार येणार आहे. भाजपकडून करण्यात आलेल्या अयशस्वी प्रयत्नानंतर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसनं ऐतिहासिक आघाडी करत सरकार स्थापनेचा दावा केला आहे. त्यानंतर आज शिवाजी पार्कवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. दरम्यान, भाजपला महाराष्ट्रात सत्तेपासून दूर ठेवण्यात काँग्रेसला यश आल्यानंतर राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांनी थेट पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला आहे.

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना शिवसेनेचे युवासेना प्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या शपथविधीचे आमंत्रण दिलं आहे. मात्र, सोनिया गांधी उपस्थित राहणार की नाही याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही असं सांगण्यात आलं आहे.

पक्षाच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत महाराष्ट्रात भाजपने सत्तेसाठी निर्लज्जपणाचा कळस केल्याचा आरोप सोनिया गांधी यांनी केला. महाराष्ट्रात बहुमताचा आकडा नसतानाही फक्त अजित पवार यांच्या पाठिंब्याच्या जोरावर देवेंद्र फडणवीस यांनी गुपचूप शपथविधी उरकला होता.

राज्यात राष्ट्रपती राजवट लागली होती ती मध्यरात्री उठवण्यात आली. त्यानंतर पहाटेच्या सुमारास सत्ता स्थापनेचा दावा करून शपथविधी केला होता. यामध्ये राष्ट्रवादीचे गटनेते अजित पवार यांनी दिलेल्या 54 आमदारांच्या सह्या असलेल्या पत्राचा आधार घेत देवेंद्र फडणवीस यांनी आमच्याकडे बहुमत असल्याचा दावा केला होता. पण तिसऱ्याच दिवशी अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि फडणवीस सरकार तीन दिवसांच्या आतच कोसळले.

सोनिया गांधी यांनी भाजपवर हल्लाबोल करताना सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या फायद्यासाठी उद्योगपती मित्रांकडे दिल्या जात असल्याचा आरोपही केला. तसेच काश्मीर मुद्यावरून भाजपला धारेवर झरलं. जम्मू काश्मीरमध्ये भारतातील राजकीय नेते जाऊ शकत नाहीत मात्र युरोपीय नेत्यांना जाता येतं. हा निर्लज्जपणा मोदी आणि शहांकडून होत असल्याचंही सोनिया गांधी म्हणाल्या.

व्हॉटसअॅपच्या माध्यमातून पाळत ठेवली जात असल्याचे प्रकऱणाने देशात खळबळ उडाली होती. त्यावरूनही सोनिया गांधी यांनी मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली. मोदी सरकार नागरिकांच्या मुलभूत अधिकारांवर घाला घालत असून त्यांचे हक्क हिरावून घेत आहे असंही सोनिया गांधींनी म्हटलं.

First published: November 28, 2019, 10:57 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading