राजकारण्यांचे संकटमोचक, भय्यूजी महाराज!

राजकारण्यांचे संकटमोचक, भय्यूजी महाराज!

भय्यूजी महाराज यांची सर्वच पक्षातल्या राजकारण्यांशी जवळीक होती. भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि इतर अनेक पक्षातल्या नेत्यांशी त्यांचे उत्तम संबंध होते. त्यामुळं अनेक संकटांच्या काळात ते राजकारण्यांच्या मदतीला धावून गेले.

  • Share this:

इंदूर,ता.12 जून : भय्यूजी महाराज यांची सर्वच पक्षातल्या राजकारण्यांशी जवळीक होती. भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि इतर अनेक पक्षातल्या नेत्यांशी त्यांचे उत्तम संबंध होते. त्याचबरोबर त्यांचा शिष्य संप्रदायही मोठा होता. त्यात राजकारणी, कलाकार, अधिकारी आणि सामाजिक क्षेत्रातली अनेक मोठी मंडळी त्यांच्या आश्रमात हजेरी लावत असत.

भय्यूजींचा प्रभाव मोठा असल्यानं राजकारण्यांना त्यांचा आधार वाटे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंचं भांडण, अण्णांचं आंदोलन, मराठा मोर्चो, शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि इतर अनेक प्रश्नांमध्ये भय्यूजी महाराज यांनी मध्यस्ती करत प्रकरण निवळण्याचा प्रयत्न केला होता.

लोकपाल आंदोलन

राजधानी दिल्लीत लोकपाल आंदोलनाच्या वेळी देशभर आक्रोश शिगेला पोहोचला होता. अण्णा उपोषण मागे घ्यायला तयार नव्हते. अशा वेळी भय्यूजी महाराज यांनी सरकार आणि अण्णांमध्ये दुआ म्हणून काम केलं. अण्णांनी उपोषण सोडावं म्हणून त्यांनी अण्णांची मनधरणी केली. तर अण्णांची प्रतिष्ठा ठेवत काही मागण्या मान्य करण्यासाठी सरकारलाही राजी करण्याचं काम त्यांनी केलं. त्यावेळी भय्यूजी महाराज पहिल्यांदा देशभर प्रकाशात आले.

राज-उद्धव एकत्र येण्यासाठी प्रयत्न

भय्यूजी महाराजांचे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी घनिष्ट आणि जिव्हाळ्याचे संबंध होते. बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर भय्यूजींनी उद्धव ठाकरेंना भावनिक आधार देण्याचा प्रयत्न केला. त्याच दरम्यान दुरावलेल्या राज आणि उद्धव या भावांनी एकत्र यावं यासाठीही त्यांनी प्रयत्न केले. उद्धव यांच्यासोबतच राज ठाकरे यांच्याशीही त्यांचे उत्तम संबंध होते.

मराठा आंदोलनाला पाठिंबा

भय्यूजी महाराज यांनी मराठा आंदोलनाला पाठिंबा देत सर्व मराठी संघटनांना एकत्र येण्यासाठी प्रोत्साहन दिलं. कोपर्डीला पीडित कुटूंबांची भेट घेऊन त्यांना आर्थिक मदत केली. त्याचबरोबर लोकांचा आक्रोश सरकारच्या कानी घालत त्यांना आंदोलनाची दखल घ्यायला भाग पाडलं.

सद्भावना उपोषण

2014 च्या काही वर्ष आधी गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी अहमदाबादमध्ये सद्भावना उपवास ठेवला होता. त्यावेळी भय्यूजी महाराज यांच्या हस्ते लिंबू पाणी घेऊन त्यांनी उपवास सोडला.

गुजरातमध्येही प्रभाव

गुजरातच्या मुख्यमंत्रीपदावरून उचलबांगडी झाल्यावर आनंदीबेन पटेल यांनी इंदूरमध्ये जावून भय्यूजी महाराजांची भेट घेतली होती. महाराज आणि नरेंद्र मोदी यांचे संबंध चांगले असल्यानं आनंदीबेन पटेल यांनी ही भेट घेतल्याचं बोललं जात होतं.

त्यामुळचं भय्यूजी महाराजांना राजकारण्यांचे संकटमोचक असंही म्हटलं गेलं. त्यावरून त्यांच्यावर टीकाही झाली. कुणी बोलावलं नसतानाही केवळ प्रकाश झोतात येण्यासाठी भय्यूजी महाराज मध्यस्तीसाठी पुढं येतात अशीही टीका झाली. मात्र या टिकेनंतरही त्याचं हे काम थांबलेलं नव्हतं. यात अनेक ठिकानी त्यांना यश आलं तर अनेकदा अपयश स्विकारावं लागलं.

 

First published: June 12, 2018, 5:35 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading