विकास चौहान, प्रतिनिधी
इंदूर, 31 डिसेंबर : आध्यात्मिक गुरू भय्यू महाराज आत्महत्या प्रकरणात नवनवीन खुलासे होत आहे. इंदूर पोलिसांनी भय्यूजींच्या मोबाईलमधील सीडीआर (Call Detail Record) च्या आधारे तपासातून काही माहिती गोळा केली आहे. आत्महत्येपूर्वी त्यांनी कुणाशी संवाद साधला, त्यांना कुणी फोन केले, अशा सर्व सेवादार आणि व्यक्तींची चौकशी सुरू आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
शनिवारी भय्यूजींचा विश्वासू सेवादार विनायक पोलिसांना शरण आल्यानंतर घडामोडींना वेग आला. विनायकच्या पाठोपाठ भय्यूजींना ब्लॅकमेल करणारी तरुणीही पोलिसांसमोर हजर झाली. आता भय्यूजींच्या मोबाईलमधील सीडीआर माहितीच्या आधारे प्रकरणाला नवीन वळण मिळण्याची शक्यता आहे.
पोलीस अधीक्षक अगम जैन यांनी सांगितलं की, "भय्यू महाराज यांना जे फोन काॅल आले होते, त्या फोन काॅलच्या सीडीआर माहितीवरून तपास सुरू आहे. या सीडीआरमध्ये ज्या लोकांनी त्यांच्याशी संवाद साधला आहे, त्याची माहिती गोळा करण्यात आली आहे". ते पुढे म्हणाले की," या माहितीच्या आधारे त्यांच्या अनेक सेवादारांची चौकशी करण्यात आली आहे आणि संपर्कातील इतर सेवादारांनाही नोटीस पाठवण्यात आली आहे."
दरम्यान, काल रविवारी पोलिसांनी एका तरूणीची चौकशी केली. ही तरुणी महाराजांना ब्लॅकमेल करत होती, असा आरोप भय्यूजींच्या ड्रायव्हरने केला होता. पोलिसांनी या तरुणीची प्राथमिक स्तरावर चौकशी केली. या तरुणीने चौकशीत सांगितलं की, "भय्यू महाराज आणि माझ्यात कोणत्याही प्रकारचे संबंध नव्हते, कैलासने केलेले आरोप अत्यंत खोटे आहे. ते मला मुलीसारखं समजत होते."
या प्रकरणी विनायकसह इतरही सेवादारांची चौकशी होणार आहे, अशी माहितीही जैन यांनी दिली.
काय आहे प्रकरण?
पन्नास वर्षांच्या भय्यू महाराजांनी 12 जून 2018 ला आपल्या निवासस्थानी गोळ्या झाडून आत्महत्या केली होती. हे आत्महत्येचं प्रकरण आहे असं समजून पोलिसांनी प्राथमिक चौकशीनंतर प्रकरण बंद करण्याची तयारी केली होती. मात्र, त्यांचा ड्रायव्हर कैलास पाटील उर्फ भाऊ याला निवेश बडजात्या या वकिलांकडे पाच कोटींची खंडणी मागितल्या प्रकरणी पोलिसांनी अटक केली. त्याने चौकशीत अनेक गौप्यस्फोट केले. आश्रमातले काही लोक महाराजांना ब्लॅकमेल करत होते, अशी माहिती त्याने पोलिसांना दिली होती.त्यानंतर भय्यूजींचा सेवादार पोलिसांसमोर हजर झाल्यामुळे प्रकरणाला नवं वळण मिळालं.
====================