बीड, 19 मे : महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. तर दुसरीकडे बीडमध्येही कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे. शहरात तणावपूर्ण वातावरण असताना भाजपचे आमदार सुरेश धस यांनी कंटेन्मेंट झोनमध्ये प्रवेश केला होता. या प्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बीड जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यामुळे प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून प्रशासनाकडून शहरातील काही परिसर कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे. परंतु, आमदार सुरेश धस यांनी कंटेन्मेंट झोनमध्ये घुसून लोकांशी संवाद साधला होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कंटेन्मेंट झोनमध्ये प्रवेश करून नागरिकांशी संवाद साधल्या प्रकरणी अखेर सुरेश धस यांच्यावर संचारबंदी आदेश डावलल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा- देवेंद्र फडणवीसांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप, शरद पवारांवरही केली टीका
आष्टी मधील पाटण सांगवी या कंटेन्मेंट झोन परिसर म्हणून घोषित करण्यात आला आहे. या परिसरात सुरेश धस यांनी प्रवेश केला होता. यापूर्वी देखील ऊसतोड कामगारांना सोडवण्यासाठी जिल्हा बंदी डावलून गेल्याप्रकरणी धस यांच्यावर गुन्हा दाखल आहे.
दरम्यान, बीडमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 11 वर पोहोचली आहे. तर एका 65 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. जिल्ह्यात मुंबई आणि पुण्यावर परतलेल्या नागरिक कोरोनाबाधित आढळले. यापैकी 18 मे रोजी आष्टी तालुक्यातील सांगवी पाटण येथील 65 वर्षीय महिलेचा पहाटे उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर इतर कोरोनाबाधित रुग्णांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
संपादन - सचिन साळवे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.