बीडमध्ये पंकजा मुंडेंना धक्का, विनायक मेटेंचा राष्ट्रवादीला पाठिंबा

बीडमध्ये पंकजा मुंडेंना धक्का, विनायक मेटेंचा राष्ट्रवादीला पाठिंबा

मागील एक वर्षांपासून पंकजा मुंडे आणि शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विनायक मेटे यांच्यात अंतर्गत कलह सुरू आहेत.

  • Share this:

सुरेश जाधव, प्रतिनिधी

बीड, 11 एप्रिल : बीडमध्ये महिला आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना घटकपक्षातील नेते विनायक मेटे यांनी धक्का दिला आहे. विनायक मेटे यांनी राज्यात भाजपचा पाठिंबा देऊ पण बीडमध्ये देणार नाही अशी भूमिका घेत राष्ट्रवादीला पाठिंबा जाहीर केला आहे.

पंकजा मुंडे या शिवसंग्रामच्या कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांना जाणीवपूर्वक त्रास देत आहेत. दुष्काळ, चारा छावण्या मंजुरी, दुष्काळी उपाय योजनाची कामं, यामध्ये टाळाटाळ करून टोकाला जावून विरोध करत आहेत. शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांवर अन्याय झालेला आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षासोबत महाराष्ट्रात असेन पण बीडमध्ये नाही, अशी जाहीर भूमिका आमदार मेटेंनी यापूर्वी जाहीर केली होती. आज मेंटेनी उघड उघड पंकजा मुंडेंच्या नेतृत्त्वाविरोधात भूमिका जाहीर केली आहे. बीड शहरातील आशीर्वाद लॉनमध्ये आयोजित प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत मेटेंनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमदेवार बजरंग सोनवणे यांना जाहीर पाठिंबा दिला आहे.

त्यामुळे लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंची डोकेदुखी आणखी वाढली आहे. मात्र, मेटे यांच्या दुटप्पी भुमिकेमुळे मतदानाचा किती फटका बसेल हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

वर्षांभरापासून मेटे नाराज

मागील एक वर्षांपासून पंकजा मुंडे आणि शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विनायक मेटे यांच्यात अंतर्गत कलह सुरू आहेत. भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर 2014 मध्ये विनायक मेटे बीड विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवली होती. त्यावेळी अवघ्या पाच हजार मतांनी मेटेंचा निसटता पराभव झाला होता. त्यावेळी मेटेंच्या विरोधात निवडून आलेले राष्ट्रवादीचे जयदत्त क्षीरसागर यांनी पंकजा मुंडेंच्या मदतीने भाजपाला मदत करत शिवसेनेचे दार ठोठावले आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत भाजपाकडून बीड मतदारसंघात तिकीट मिळणार नसल्याची शक्यता लक्षात आल्यानंतर तसंच पंकजा मुंडेंकडून सन्मानाची वागणूक मिळत नाही, विकास कामात अडकाटी घातली जाते तसंच शिवसंग्राममधील तीन सदस्याला भाजपमध्ये जादूच्या कांडीने घेतल्याने मेटे पंकजा मुंडेंवर नाराज आहेत. म्हणून ही नाराजी व्यक्त करताना मेटेंनी उघड उघड राष्ट्रवादीचे काम करण्याचा निर्णय घेतला आहे.

'...म्हणून घेतला निर्णय'

2014 च्या लोकसभा निवडणूकीत विनायक मेटे यांचा शिवसंग्राम पक्ष (भारतीय संग्राम परिषद) हा महायुतीचा घटक पक्ष होता. त्यावेळी बीडमधून विधानसभेची निवडणूक भाजपाच्या चिन्हावर लढवली होती. मात्र, बीडच्या भाजपकडून शिवसंग्रामला डावलणे आणि अडचणीत आणण्याचे प्रयत्न सातत्याने केले जात आहेत म्हणून हा निर्णय घेतल्याचं मेटेनी सांगितलं. या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी 'निष्क्रिय राजा प्रजेच्या काय फायद्याचा' अशाप्रकारची पालकमंत्र्यांबाबत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत 'आपल्या " आशीर्वाद"  शिवाय कुणी दिल्लीचे स्वप्ने पाहू नयेत' असं सांगत भाजपला हिसका दाखवण्याची भाषा केली आहे. यामुळे मुख्यमंञी यांचे निकटवर्तीय, जवळीक असलेले मेटे पंकजा मुंडेंना कडाडून विरोध करताना दिसत आहेत.

===========================


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 11, 2019 05:18 PM IST

ताज्या बातम्या