नवी दिल्ली, 16 फेब्रुवारी : गुरुवारी झालेल्या पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानवर आर्थिक कोंडीचा बॉम्ब टाकला. पाकिस्तानातून भारतात निर्यात केल्या जाणाऱ्या वस्तूंवरची कस्टम ड्युटी 200 टक्क्यांनी वाढवण्यात आली आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी ट्वीट करत या निर्णयाची माहिती दिली.
मोस्ट फेव्हर्ड नेशनचा (MFN) दर्जा काढून घेतल्यानंतर भारतानं पाकिस्तानला हा दुसरा मोठा झटका दिला. भारताच्या या निर्णयामुळं पाकिस्तानची मोठी आर्थिक कोंडी होणार असल्याचं बोललं जातं आहे.
कांदा, साखर, मसाल्याचे पदार्थ, ड्राय फ्रुट्स इत्यादी पदार्थांवर कस्टम ड्युटी वाढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानची कोंडी करण्यासाठी अवघ्या 20 तासातच भारताने मोठं पाऊल उचललं.
गॅट करारानुसार भारताने 1996 साली पाकिस्तानला हा मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा बहाल केला होता. पण आता पुलवामा हल्ल्यानंतर हा मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जाच काढून घेतल्याने पाकिस्तानची मोठी आर्थिक कोंडी होणार आहे.
हेही वाचा : शहीद जवानाच्या दीड वर्षाच्या मुलाने विचारलं, "गप्प बस आई, तू का इतकी रडतेस"
'मोस्ट फेवर्ड नेशन'चा दर्जा म्हणजे काय?
- हा दर्जा बहाल केल्याने संबंधित देशाला सर्व व्यापारी सुविधा मिळतात.
- उभय देशांमध्ये व्यापारवृद्धीसाठी या देशाचा मोठा फायदा होतो.
- जागतिक व्यापार संघटनेच्या सदस्य देशांना परस्परांमध्ये हा दर्जा द्यावा लागतो.
- भारताने 1996 साली पाकिस्तानला हा दर्जा दिला होता
- या निर्णयानुसारच भारताने पाकिस्तानला व्यापारात प्राधान्य दिलं होतं.
- या दर्जानुसार पाकिस्तानला निर्यात शुल्कात मोठी सूट मिळाली होती.
पाकिस्तानने एवढी वर्षे दहशतावादाला खतपाणी घालूनही भारताने कधी एवढं टोकाचं पाऊल उचललं नव्हतं. पण पुलवामा हल्ल्यानंतर मात्र, भारताने पाकिस्तानचा मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जाच काढून घेतल्याने, पाकिस्तानची फक्त आर्थिक कोंडी होणार नाहीये तर त्यांच्या देशातील व्यापाऱ्यांचंही मोठं नुकसान होऊ शकतं.
हेही वाचा : काश्मीरमध्ये पुन्हा IEDचा स्फोट; मेजर शहीद, सर्च ऑपरेशन जारी
भारत-पाकमध्ये कोणत्या वस्तूंची आयात-निर्यात होते ?
1. सिमेंट
2. साखर
3. कापूस
4. स्टील
5. फळभाज्या, मिरची
6. ड्रायफ्रूट्स
7. तेल, खाद्यपदार्थ
8. रासायनिक पदार्थ
उभय देशांमधील या व्यापारामध्ये भारतापेक्षा पाकिस्तानच सर्वाधिक वस्तूंची आयात करत होता. ती आता पूर्णपणे बंद होणार असल्याने पाकिस्तानचं मोठं नुकसान होणार हे नक्की.
पाकिस्तानचं आर्थिक नुकसान किती होणार ?
- भारत-पाकमध्ये 2017-18 साली 17 हजार कोटी म्हणजेच 2.4 बिलियन्स डॉलर्सचा व्यापार झाला.
- यात भारतातून होणारी निर्यात ही 1.9 बिलियन्स डॉलर्सची तर पाकिस्तानकडून होणारी निर्यात ही फक्त 0.48 बिलियन्स डॉलर्सची होती.
- 2016-17 सालीही उभय देशांमधील व्यापार जवळपास एवढाच होता.
- पाकिस्तानी व्यापाऱ्यांना मोस्ट फेवर्ड नेशनचा मोठा फायदा होत होता.
LIVE VIDEO : भारतीय वायुसेनेच्या सामर्थ्याचं दर्शन, पाकलाही भरेल धडकी