आदित्य ठाकरेंना मिळाली मंत्रालयात खास केबिन! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चिरंजिव युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे कॅबिनेटमंत्रिपदावर विराजमान झाले आहे. त्यानंतर आता आदित्य ठाकरे यांच्यासाठी मंत्रालयामध्ये खास केबिन देण्यात आली आहे. महाविकासआघाडीचा विस्तार झाल्यानंतर मंत्रालयामध्ये सर्व मंत्र्यांसाठी लवकरच केबिनचे वाटप होणार आहे. मुख्यमंत्री उद्ध ठाकरे यांनी आज मंत्रालयामध्ये केबिनची पाहणी केली. यावेळी आदित्य ठाकरे यांच्यासाठी मंत्रालयातील सातव्या मजल्यावरील 717 केबिन असणार आहे. विशेष म्हणजे, मंत्र्यांचे अजूनही खातेवाटप जाहीर झालं नाही. त्यामुळे केबिन वाटप ही झालेलं नाही. पण आदित्य ठाकरे यांच्यासाठी एक केबिन मात्र खास राखीव ठेवण्यात आली आहे. या केबिनवर आदित्य ठाकरे यांचं नाव देखील लिहिले आहे. या केबिनची पाहणी स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण मुख्यमंत्री कार्यालयासोबत केली. त्यावेळेस आदित्य ठाकरे देखील उपस्थित होते. मंत्रालयातील एका दालनाबद्दलच्या अफवेमुळं मंत्र्यांना भीती दरम्यान, सध्या मंत्रालयातील एका नको असलेल्या दालनाची चर्चा रंगली आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर आता सर्व मंत्र्यांना दालन देण्याचं काम सुरू झालं आहे. यामध्ये 602 नंबरच्या दालनाबाबत मात्र अनेकांकडून नकारघंटा वाजवली जात आहे. यामागे त्या दालनाबद्दल नेत्यांच्या मनात असलेली भीती आहे. 602 नंबरच्या या दालनाबद्दल एक समज पसरला आहे. तो म्हणजे इथं जो मंत्री बसतो तो आपला कार्यकाल पूर्ण करू शकत नाही. मंत्रालयाच्या 6 व्या मजल्यावर असलेलं हे दालन अद्याप कोणाला देण्यात आलेलं नाही. या दालनामध्ये एक कॉन्फरन्स रूम, कार्यलयीन कर्मचाऱ्यासाठी हॉल आणि दोन मोठ्या केबिन आहेत. सुरुवातीला या दालनात मुख्यमंत्री, वरिष्ठ मंत्री आणि मुख्य सचिव बसत होते पण आता मात्र याकडे नको असलेलं दालन म्हणून पाहिलं जातं. याआधीच्या भाजप सरकारमध्ये हे दालन एकनाथ खडसे यांना मिळाले होते. ते कृषी, महसूल आणि अल्पसंख्यांक कल्याण विभागाचं कामकाज बघायचे. पण खडसे यांना 2 वर्षातच राजीनामा द्यावा लागला. त्यांच्यानंतर कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांना हे कार्यालय दिलं गेलं. त्यांचा दोन वर्षांनी हृदयविकाराने मृत्यू झाला. यानंतर हे दालन कोणालाही देण्यात आलं नाही. 2019 मध्ये भाजपचे अनिल बोंडे यांच्याकडे कृषीमंत्रिपद देण्यात आलं. तेव्हा हेच दालन बोंडेना दिले होते. त्यानंतर झालेल्या विधानसभेत बोंडेंचा पराभव झाला. यानंतर 602 नंबरच्या दालनाबाबतचा समज आणखी वेगाने पसरला. महाविकास आघाडीत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतलेल्या अजित पवार यांनीही याआधी 602 क्रमांकाच्या दालनात बसून काम केलं आहे. त्यांनीसुद्धा इथं काम करण्यास नकार दिला आहे. याबाबत सामान्य प्रशासन विभागाने दालनाबद्दलच्या अफवा फेटाळल्या आहेत. सर्व मंत्र्यांना त्यांच्या आवडीनिवडीनुसार दालने दिली जात असून लवकरच हे दालनही एखाद्या मंत्र्याला दिलं जाईल असं प्रशासनाने म्हटलं आहे.स्मशानभुमि जवळ निवासस्थान मिळाले यापेक्षा आम्हाला काम महत्वाचे आहे. प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत आम्ही इथपर्यंत आलो व पुढेही काम करतच राहणार... pic.twitter.com/YfEkmll9Uv
— BACCHU KADU (@RealBacchuKadu) January 4, 2020
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bacchu kadu, BJP, Maharashtra cabinet expansion, Maharashtra CM, Shiv sena