• Home
  • »
  • News
  • »
  • news
  • »
  • गोव्यात मटका अधिकृत करा, भाजपच्या मंत्र्यांची वादग्रस्त मागणी!

गोव्यात मटका अधिकृत करा, भाजपच्या मंत्र्यांची वादग्रस्त मागणी!

गोव्यात अवैध मार्गाने चालणारा मटका व्यवसाय कायदेशीर केला तर गोवा सरकारच्या महसुलात दखलपात्र वाढ होणार असल्याचं लोबो यांनी विधान केलंय.

  • Share this:
 सिंधुदुर्ग, 02 फेब्रुवारी : गोवा सरकारचे ग्रामविकास मंत्री मायकल लोबो यांनी गोव्यात मटका अधिकृत करण्यासाठी आपण सरकारकडे पाठपुरावा करत असल्याचं विधान करुन एकच खळबळ उडवून दिलीय. गोव्यात अवैध मार्गाने चालणारा मटका व्यवसाय कायदेशीर केला तर गोवा सरकारच्या महसुलात दखलपात्र वाढ होणार असल्याचं लोबो यांनी विधान केलंय. यासाठी त्यांनी एक फॉर्म्युलाही सांगितला असून शंभर रुपयाच्या मटक्यावर बारा टक्के जीएसटी लावून तो पैसा सरकारच्या तिजोरीत जमा करता येईल असंही सुचवलं आहे. इतकंच नाही तर काही दिवसांपूर्वी गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी गोवेकरांना घातलेली  कॅसिनो बंदीही उठवण्याची विनंती आपण मुख्यमंत्र्यांना करणार असल्याचं म्हटलं आहे . काय आहे गोव्याचं हे मटका प्रकरण? तीन वर्षांपूर्वी गोव्याचे नागरिक काशिनाथ शेट्ये यांनी गोव्यातला अवैध मटका बंद करावा म्हणून हायकोर्टत याचिका केली होती. त्यासाठी त्यांनी रोज वृत्तपत्रात छापून येणाऱ्या मटक्यांच्या आकड्यांचे पुरावे दिले होते. त्या याचिकेवर कोर्टाने आदेश देऊन मटका बंद करण्यास सरकारला भाग पाडले होते. वृत्तपत्रांनाही हे असे आकडे छापणे बंद केले होते.  सरकारने कारवाई केली तरी अवैध मटका गोव्यात सुरूच होता, तसा तो आताही सुरू आहे. शेट्ये यांनी पुन्हा कोर्टात व्हिडिओ पुरावे देउन पुन्हा मटक्यावर कारवाई करण्यास भाग पाडले होते. त्यामुळे गोव्यात उघड उघड चालणाऱ्या मटक्याला बऱ्यापैकी खीळ बसली. तरीही चोरट्या मार्गाने  मटका सुरूच राहिला आहे. गोव्याचे हे मंत्री मायकल लोबो कलंगुट मतदारसंघातून भाजपाच्या तिकिटावर गेली अनेक वर्षे निवडून येतात. पर्रिकर सरकारमध्येही ते भाजपाचे आमदार होते. सनबर्न नावाच्या बहुचर्चित आणि वादग्रस्त बीच फेस्टीव्हलचे ते प्रणेते राहिले आहेत. पण कलंगुट आणि इतर भागात सुरू असलेल्या राजरोस मटक्यालाही खीळ बसली आहे. त्यातून सरकारला महसूल मिळेल हे कारण सांगून लोबो यांनी अधिकृत मटक्याचा विषय मांडून नव्या वादाला तोडं फोडलं आहे. गोवेकरांवरची कॅसिनो प्रवेशबंदी उठवा - लोबो  गोव्याच्या मांडवी नदीपात्रात असलेल्या तरंगत्या कॅसिनोंमध्ये दररोज लाखोंचा जुगार चालतो. या जुगारातून गोवा सरकारला भरपूर महसूल मिळतो. या कॅसिनोमध्ये गोवेकरांना जाण्यास मज्जाव करणारी अधिसुचना नुकतीच गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी काढली. या अधिसूचनेचाही फेरविचार व्हावा, असं मायकल लोबो यांचं म्हणणं आहे. लोबो यांच्या मटका आणि कॅसिनोबाबतच्या या विधानांवरुन गोव्यात भाजपावर जोरदार टीका होऊ लागली आहे. याचे पडसाद सोमवारपासून सुरू होणाऱ्या गोवा विधानसभेच्या अधिवेशनात उमटणार आहेत.
Published by:sachin Salve
First published: