औरंगाबाद, 08 मे : देशभरात कोरोनाचा कहर सुरू आहे. यासगळ्यात औरंगाबादमध्ये एक धक्कादायक घटना घडली. औरंगाबादमधील करमाड रेल्वे रुळावर झोपलेल्या तब्बल 16 कामगारांना चिरडलं. यात या 16 कामगारांचा जागीच मृत्यू झाला आहे. औरंगाबाद-जालना रेल्वे मार्गावर शुक्रवारी सकाळी 5:15 च्या सुमारास हा अपघात झाला. घटनेची माहिती मिळताच करमाड पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. तर, या अपघाताची चौकशी करण्याचे आदेश रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी दिले आहे. पंतप्रधान नरेंद मोदींनीही या अपघाताबाबत शोक व्यक्त केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत, महाराष्ट्रातील औरंगाबाद येथे झालेला हा रेल्वे अपघात व्य़थित करणारा आहे. रेल्वेमंत्री श्री पीयूष गोयल यांच्याशी बोललो असून, ते परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहेत. आवश्यक सर्व सहकार्य दिले जात आहे, असे सांगितले.
मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी 5.15 च्या सुमारास मालवाहू गाडी रुळावर झोपलेल्या कामगारांच्या अंगावरून गेली. दरम्यान हे सर्व हे सर्व प्रवासी मजूर छत्तीसगडमधील असून ते आपल्या घरी चालत चालले होते. दरम्यान, विश्रांती घेण्यासाठी रुळाजवळ थांबले होते, रुळावर झोपले असताना मालवाहू गाडीनं त्यांना चिरडलं. या घटनेनंतर स्थानिक प्रशासन आणि रेल्वे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर देशभरातील कामगार परराज्यात अडकले होते. जमेल त्या मार्गानं हे मजून घरी जाण्यासाठी प्रयत्न करत आहे. एकीकडे शासनाच्या वतीनं मजूरांसाठी ट्रेनसेवा सुरू करण्यात आल्या असल्या तरी हा असा प्रवास जीवघेणा आहे. लॉकडाऊनची घोषणा झाली तेव्हापासून लाखो कामगार पायी घरी निघाले होते. याआधी झालेल्या अपघातांमध्ये स्थलांतरित कामगारांनी आपले प्राण गमावले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.